इस्रायल, अमेरिका व इराक यांचा समावेश असलेल्या मोहिमेद्वारे ११ वर्षांच्या वयात अपहरण झालेल्या २१ वर्षीय याझिदी महिलेची गाझामधून सुटका करण्यात आली आहे. तिच्या सुटकेसाठी अनेक महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते. गाझावरील इस्रायली हवाई हल्ल्यात तिचा अपहरणकर्ता ठार झाल्यानंतर तिची सुटका शक्य झाल्याची माहिती मिळाली आहे. एका निवेदनात इस्रायली सैन्याने म्हटले आहे, “तिची नुकतीच गाझा पट्टीतून केरेम शालोम क्रॉसिंगद्वारे एका गुप्त मोहिमेंतर्गत सुटका करण्यात आली. इस्रायलमध्ये प्रवेश केल्यावर ती ॲलेनबी ब्रिज क्रॉसिंगद्वारे जॉर्डनला गेली आणि तिथून इराकमधील तिच्या कुटुंबाकडे परतली.” तीन देशांनी मिळून या महिलेला कसे वाचवले? कोण आहे ही याझिदी महिला? नेमके हे प्रकरण काय? जाणून घेऊ.

याझिदी महिलेला कसे वाचवण्यात आले?

इराकच्या परराष्ट्रमंत्री सिलवान सिंजरी यांनी सांगितले की, गाझामध्ये इस्रायल लष्कराची कारवाई सुरू होती. गाझामधील आव्हानात्मक सुरक्षा परिस्थितीमुळे या महिलेला वाचवण्यात अनेकदा अपयश आले. मात्र, अखेर चार महिन्यांच्या प्रयत्नांनंतर फौझिया अमीन सिडो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महिलेला वाचवण्यात यश आले. इराकी परराष्ट्र मंत्रालयाने तिच्या परत येण्याची पुष्टी केली आणि अमेरिका व जॉर्डन यांच्यातील भागीदारीची प्रशंसा केली. गाझा किंवा इस्रायलचा उल्लेख न करता मंत्रालयाने सांगितले की, महिला इराकला परतल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी तिला तिच्या कुटुंबीयांकडे सोपविण्यात आले. दरम्यान, वॉशिंग्टनमध्ये यूएस स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी सांगितले की, ती केवळ ११ वर्षांची होती जेव्हा इराकमधून ‘ISIS’ने तिचे अपहरण केले होते, तिला विकले होते आणि गाझामधील हमास सैनिकाशी लग्न करण्यास तिला भाग पाडले गेले होते. “गाझामध्ये तिच्या कैदकर्त्याच्या नुकत्याच झालेल्या मृत्यूमुळे तिला पळून येता आले. त्याबाबतची माहिती आम्हाला इराकी सरकारने दिली. अमेरिकेने तिला गाझामधून बाहेर काढण्यासाठी, तिला सुरक्षितपणे घरी पोहोचवण्यासाठी या प्रदेशातील अनेक भागीदारांबरोबर काम केले.”

तीन देशांच्या चार महिन्यांच्या प्रयत्नांनंतर फौझिया अमीन सिडो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महिलेला वाचवण्यात यश आले. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : भारत आणि पाकिस्तानच्या तांदूळ निर्यातीमुळे जागतिक बाजारातील तांदळाच्या दरात घसरण; कारण काय?

इस्रायलच्या को-ऑर्डिनेशन ऑफ गव्हर्न्मेंट ॲक्टिव्हिटीज इन द टेरिटरीज (COGAT)चे ब्रिगेडियर जनरल इलाड गोरेन यांनीही या महिलेच्या प्रवासाविषयी सांगितले. परंतु, तिला इराकमधून गाझा येथे कसे आणण्यात आले, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. इलाड गोरेन म्हणाले, “इसिसने तिला हमासमधील एका व्यक्तीला विकले होते; परंतु तिला हमासच्या एका गटाने ताब्यात घेतले.” इस्रायली अधिकाऱ्यांनी २००७ पासून गाझावर सत्ता गाजविणारा पॅलेस्टिनी अतिरेकी गट हमास आणि इसिस यांच्यात समांतरता असल्याचे पाहिले आहे. या गटांनी इराकच्या याझिदींसारख्या बिगर-मुस्लिम समुदायांनाच नव्हे, तर शिया मुस्लिमांनादेखील लक्ष्य केले आहे. गोरेनने माहिती दिली की, ती महिला शारीरिकदृष्ट्या निरोगी असली तरी तिला अनेक मानसिक आघातांचा सामना करावा लागला असल्याचे लक्षात आले.

याझिदी समुदाय

प्राचीन यझिदी समुदाय अल्पसंख्याक आहे; ज्यांची श्रद्धा झोरोस्ट्रियन धर्मावर आहे. हा समुदाय प्रामुख्याने इराक आणि सीरियामध्ये आहे. २०१४ मध्ये इस्लामिक स्टेट गटाने याझिदींविरुद्ध क्रूर मोहीम सुरू केली. त्या मोहिमेत पाच हजारांहून अधिक लोक मारले गेले आणि हजारो लोकांचे अपहरण करण्यात आले. या क्रूरतेचा उल्लेख संयुक्त राष्ट्रांनी (यूएन) नरसंहार म्हणून केला. उत्तर इराकमधील सिंजार येथील याझिदी समुदायावर इस्लामिक स्टेट गटाच्या हल्ल्यामुळे अनेक पुरुषांची कत्तल झाली आणि मुली व स्त्रियांना गुलाम करण्यात आले. या अत्याचारांनंतर सुमारे एक लाख याझिदींनी युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया व कॅनडामध्ये आश्रय घेतला, असे ‘यूएन’ने सांगितले आहे.

हेही वाचा : भारतात वॉन्टेड झाकीर नाईक पाकिस्तानात; मुस्लीम धर्मोपदेशकाचा पाकिस्तानला जाण्यामागे हेतू काय?

इराकी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ३,५०० हून अधिक याझिदींची सुटका करण्यात आली आहे; परंतु सुमारे २,६०० याझिदी अजूनही बेपत्ता आहेत. अनेक जण मृत झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, याझिदी कार्यकर्त्यांचा असा विश्वास आहे की, शेकडो लोक अजूनही जिवंत आहेत. इस्त्रायली सैन्य गाझामध्ये हमासच्या विरोधात लढत आहे. जवळजवळ एक वर्षापूर्वी इस्रायलवर हमासने मोठा हल्ला केला होता; ज्यामुळे १,२०५ लोक मारले गेले होते. इस्रायलने प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात गाझामध्ये कमीत कमी ४१,७८८ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे; ज्यात बहुतेक नागरिक आहेत, असे गाझामधील हमास संचालित आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे.