रशियातील खासगी लष्कर असलेल्या ‘वॅग्नर ग्रुप’चे प्रमुख येवजेनी प्रिगोझिन यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. येवजेनी प्रिगोझिन हे रशियातील श्रीमंतांपैकी एक होते. दरम्यान, त्यांच्या मृत्यूनंतर रशिया आणि युक्रेन युद्धाचे काय होणार? वॅग्नर ग्रुपची भविष्यातील वाटचाल कशी असणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या…
प्रिगोझिन यांचा मृत्यू म्हणजे घातपात?
येवजेनी प्रिगोझिन यांच्या मृत्यूचे वृत्त समोर आल्यानंतर रशियात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या मृत्यूबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. येवजेनी प्रिगोझिन यांचा मृत्यू हा विमान अपघातामुळे झाला असला तरी कट रचून त्यांना मारण्यात आले, अशी शंका अनेकजण व्यक्त करत आहेत. ऑस्ट्रेलियन राजकीय तज्ज्ञ गेरहार्ड मॅनगॉट यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे, “रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आदेशानुसार हा कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा प्रकार वाटतोय. प्रिगोझिन यांच्या वॅग्नर ग्रुपने केलेल्या बंडाचा सूड म्हणून हे कृत्य केलेले असावे,” असे मॅनगॉट म्हणाले.
वॅग्नरच्या सहसंस्थापकांचाही विमान अपघातात मृत्यू
प्रिगोझिन यांच्यासह वॅग्नर ग्रुपचे सहसंस्थापक दिमित्री उटकीन हेदेखील अपघातग्रस्त विमानातून प्रवास करत होते. त्यांचाही या अपघातात मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. हे विमान मॉस्कोवरून सेंट पिटर्सबर्ग येथे जात होते. जून महिन्यात झालेल्या बंडाळीला थोपवण्यासाठी पुतिन आणि प्रिगोझिन यांच्यात काही करार झाले होते. या करारांतर्गत प्रिगोझिन यांना कोणत्याही कारवाईविना बेलारूसमध्ये जाण्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर प्रिगोझिन आणि पुतिन यांच्यातील वाद मिटला असावा, असा अंदाज बांधला जात होता. विशेष म्हणजे या बंडानंतर प्रिगोझिन हे खुलेपणाने वावरताना दिसत होते. आफ्रिकेत लष्करी कारवाई करण्यासाठी ते आपल्या वॅग्नर ग्रुपमध्ये सैन्यभरती करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. मात्र, आता प्रिगोझिन यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याचे म्हटले जात असल्यामुळे अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.
पुतिन यांना मिळालेल्या आव्हानामुळे रशिया थक्क
या वर्षाच्या जून महिन्यात प्रिगोझिन यांच्या वॅग्नर ग्रुप या खासगी लष्कराने पुतिन सरकारविरोधात बंड केले होते. या बंडामध्ये वॅग्नर ग्रुपने रोस्तोव-ऑन-डॉन या शहरातील कमांड सेंटरवर ताबा मिळवला होता. तसेच प्रिगोझिन यांच्या आदेशानुसार या सैन्याने मॉस्कोकडे कूच केले होते. या बंडादरम्यान आपल्या मोहिमेच्या आड येणाऱ्या हेलिकॉप्टर, लढाऊ विमानांवर वॅग्नर ग्रुप हल्ले करत होता. मात्र, पुतिन आणि प्रिगोझिन यांच्यात करार झाला आणि कोणतीही कारवाई न करण्याचे आश्वासन देऊन प्रिगोझिन यांना बेलारूस येथे जाण्यास सांगण्यात आले. प्रिगोझिन यांचे बंड म्हणजे पुतिन यांची राजवट; तसे तेथील जनतेसाठी मोठा धक्का होता.
प्रिगोझिन यांनी दिले होते थेट आव्हान
रशियाने युक्रेनविरोधात युद्ध छेडले होते. रशियाने आपले संपूर्ण लष्करी सामर्थ्य या युद्धात लावलेले होते. असे असतानाच वॅग्नर ग्रुपने पुतिन यांच्याविरोधात बंड केले. प्रिगोझिन यांनी थेट आपल्या सैनिकांच्या माध्यमातून पुतिन यांनाच आव्हान दिले होते. या बंडानंतरच्या काही तासांत संपूर्ण रशियात खळबळ उडाली होती. कारण पुतिन आणि प्रिगोझिन यांच्यात जवळचे संबंध होते. मात्र, या बंडामुळे सुरुवातीच्या काही तासांत पुतिन यांची असमर्थतता समोर आली होती. या घटनेच्या काही महिने अगोदर प्रिगोझिन आणि रशियन लष्कर यांच्यातील संबंध बिघडले होते. विशेषत: रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु आणि रशियन लष्कराचे चीफ ऑफ द जनरल स्टाफ व्हॅलेरी गेरासिमोव्ह यांच्याशी त्यांचे मतभेद निर्माण झाले होते. याच मतभेदांतून प्रिगोझिन यांनी अनेकवेळा व्हॅलेरी आणि सर्गेई यांच्यावर टीका केली होती. लष्करी अक्षमतेचा आरोप त्यांनी केला होता. त्यांनी पुतिन यांच्या युद्धासंबंधीच्या तर्कावरही अप्रत्यक्षपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
प्रिगोझिन आणि पुतिन यांच्यात होते जवळचे सबंध
एकेकाळी प्रिगोझिन हे पुतिन यांच्या खूप जवळचे मानले जायचे. विशेष म्हणजे प्रिगोझिन हे पुतिन यांच्याप्रति खूप प्रामाणिक आहेत, असेही वाटायचे. सुरुवातीच्या काळात प्रिगोझिन यांच्या वॅग्नर ग्रुपने रशियाच्या लष्कराला वेगवेगळ्या कारवायांत सहाकार्य केले. युक्रेनच्या युद्धातही या ग्रुपने वेगवेगळ्या मोहिमा राबवल्या. १९९० च्या दशकापासून प्रिगोझिन आणि पुतिन यांच्यात सख्य होते. याच कारणामुळे पुतिन यांनी प्रिगोझिन यांना खासगी लष्कर उभारण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर मध्य पूर्व, युक्रेन तसेच आफ्रिकेत वॅग्नर ग्रुपने अनेक लष्करी कारवाया केल्या.
युक्रेनच्या युद्धावर काय परिणाम पडणार?
प्रिगोझिन यांच्या मृत्यूमुळे रशियाला युक्रेनविरुद्धच्या युद्धात फटका बसू शकतो, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. प्रिगोझिन यांच्या मृत्यूमुळे वॅग्नर ग्रुप कमकुवत होऊ शकतो. गेल्या तीन महिन्यांपासून रशियन लष्कर वॅग्नर ग्रुपची मदत घेऊन युक्रेनविरोधात लढत होते. मात्र, आता प्रिगोझिन यांच्या वॅग्नर ग्रुपकडून रशियन लष्कराला तेवढ्याच क्षमतेने मदत मिळणार का? अशी शंका उपस्थित केली जात आहे. “आफ्रिकन देशात रशियाचा प्रभाव वाढावा म्हणून वॅग्नर ग्रुपने रशियन सरकारसाठी खूप काम केले. मात्र, आता प्रिगोझिन नसल्यामुळे वॅग्नर ग्रुपच्या आफ्रिकेच्या मोहिमेचे काय होणार? असा प्रश्न आहे,” असे मॅनगॉट म्हणाले.
पुतिन संरक्षणमंत्र्यांना हटवणार का?
दरम्यान, प्रिगोझिन यांनी रशियन सरकारविरोधात बंड केले. रशियाचे संरक्षणमंत्री तसेच चीफ ऑफ द जनरल स्टाफ यांच्याशी असलेल्या मतभेदातूनच हे बंड घडले होते. संरक्षणमंत्री सर्गेई शोइगु यांना पदावरून हटवावे, अशी मागणी फक्त प्रिगोझिनच नव्हे, तर इतरही बड्या व्यक्तींकडून करण्यात आली होती. त्यामुळे पुतिन नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.