उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने हलाल प्रमाणपत्र असलेल्या वेगवेगळ्या उत्पादनांवर बंदी घातली आहे. कोणतेही उत्पादन हलाल प्रमाणपत्रासह विकता येणार नाही, असे या सरकारने आपल्या आदेशात म्हटले आहे. १७ नोव्हेंबर रोजी हजरतंगज पोलिस ठाण्यात एक तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनंतर योगी सरकारने हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय फक्त उत्तर प्रदेश राज्यापुरता मर्यादित असला तरी त्यावर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने काय निर्णय घेतला आहे? हलाल प्रमाणपत्र म्हणजे नेमके काय? हलालचा नेमका अर्थ काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ.
उत्तर प्रदेश सरकारने काय निर्णय घेतला?
हजरतगंज पोलिस ठाण्यात १७ नोव्हेंबर रोजी एका तक्रारींतर्गत एक गुन्हा दाखल करण्यात आला. काही कंपन्यांकडून वेगवेगळ्या उत्पादनांना हलाल प्रमाणपत्र दिले जात आहे. एका समुदायात उत्पादनाची विक्री जास्त व्हावी म्हणून असे केले जात आहे. हलाल प्रमाणपत्र देऊन लोकांच्या भावनांशी खेळ होत आहे, असे या तक्रारीत म्हटले गेले होते. या तक्रारीनंतर उत्तर प्रदेशमधील सरकारने हलाल प्रमाणपत्र असलेल्या उत्पादनांची विक्री करण्यावर बंदी घातली आहे. या निर्णयानंतर आता हलाल म्हणजे काय, असे विचारले जात आहे.
हलाल म्हणजे काय?
हलाल हा मूळचा अरेबिक शब्द आहे. याचे मराठीत भाषांतर करायचे झाल्यास ‘परवानगी असलेला’ असे म्हणता येईल. कुराणमध्ये हराम या शब्दाच्या विरुद्ध हलाल या शब्दाचा वापर करण्यात आलेला आहे. हराम म्हणजे निषिद्ध असलेला. म्हणजेच कुराणमध्ये काय निषिद्ध आहे आणि कशाला अनुमती आहे, हे सांगण्यासाठी अनुक्रमे हराम आणि हलाल असे शब्द वापरण्यात आले आहेत. हलाल हा शब्द विशेषत: इस्लाममध्ये आहारविषयक कायद्यांशी संबंधित आहे. ज्यू धर्मातही आहाराविषयी काही नियम आहेत. अशा आहाराला कश्रूत (Kashrut) आहार म्हटले जाते.
मांस हलाल आहे का, हे ठरवण्यासाठी वेगळे निकष
इस्लाममध्ये डुकराचे मांस आणि मादक पदार्थ (मद्य) या दोन गोष्टी हराम मानल्या जातात. त्यासह एखादे मांस हलाल आहे हे ठरवण्यासाठी मांसासाठी प्राण्याला कशा प्रकारे मारलेले आहे? त्यावर कशा प्रकारे प्रक्रिया केलेली आहे? अशा अनेक बाबींचा विचार केला जातो. सर्व निकष पूर्ण केल्यानंतरच ते मांस हलाल आहे की नाही, हे ठरवले जाते.
एखादे मांस हलाल आहे हे कसे ठरवले जाते?
भारताच्या संदर्भाने बोलायचे झाल्यास मुस्लिमांनी मांसासाठी एखाद्या प्राण्याला कशा प्रकारे मारले आहे? प्राण्याला मारण्याची पद्धत कशी आहे? हे सांगण्यासाठी हलाल या शब्दाचा वापर केला जातो. पशुधनाला किंवा कोंबडीला मारण्यासाठी कोणती पद्धत वापरली आहे यावर संबंधित मांस हलाल आहे की नाही हे ठरते. मांसासाठी एखाद्या प्राण्याची धारदार चाकूच्या मदतीने जुगुलार व्हेन (डोके आणि चेहऱ्याला रक्तपुरवठा करणारी, तसेच रक्त वाहून नेणारी रक्तवाहिनी) तसेच कॅरोटिड आर्टरी (हदयापासून मेंदूकडे किंवा मेंदूकडून हृदयाकडे रक्त वाहून नेणारी रक्तवाहिनी) एका झटक्यात कापलेली असावी. तसेच मांसासाठी कापलेला प्राणी हा जिवंत आणि निरोगी असावा. प्राण्याला कापल्यानंतर त्याच्या शरीरातून रक्त निघून गेलेले असावे. प्राण्याला मारताना प्रार्थना (शहादा प्रार्थना) म्हटलेली असावी, असे काही नियम आहेत. या सर्व नियमांचे पालन केलेले असेल, तरच ते मांस हलाल आहे, असे समजले जाते.
हिंदू आणि शीख धर्मात वेगळी पद्धत
हिंदू किंवा शीख धर्मात मांसासाठी प्राण्याला मारण्यासाठी ‘झटका’ पद्धत वापरली जाते. या पद्धतीत प्राण्यांच्या मानेवर एकच जोरदार वार केला जातो. एका झटक्यात प्राण्याचे शिर धडावेगळे व्हावे, असा यामागे उद्देश असतो. एखादे मांसविक्री करणारे दुकान मुस्लीमधर्मीय व्यक्तीच्या मालकीचे असेल, तर संबंधित मालक आमच्याकडे हलाल मांस दिले जाते, असे सांगतो. तर तेच मांसविक्री करणारे दुकान एखाद्या हिंदू किंवा शीख व्यक्तीच्या मालकीचे असेल, तर आमच्याकडील मांस झटका पद्धतीने मिळवलेले आहे, असे सांगितले जाते.
मांसाचा समावेश नसलेले पदार्थही हलाल असू शकतात का?
हलाल या शब्दाचा वापर मांसासंदर्भात केला जात असला तरी इस्लामिक कायद्यांनुसार या शब्दाचा अर्थ फक्त ‘परवानगी असलेला’ एवढ्यापुरताच मर्यादित आहे. हलाल या शब्दाचा मांसाशी कोणताही संबंध नाही. म्हणजेच शाहाकारी अन्नपदार्थदेखील (ज्यामध्ये मद्य मिसळलेले नसते) हलाल असू शकतात. याही पुढे जाऊन एखादा पदार्थ इस्लामिक कायद्याला धरून तयार करण्यात आलेला आहे की नाही, यावरून तो हलाल आहे की हराम हे ठरवता येते. उदाहरणार्थ- अनेक औषधांत प्राण्यांच्या अनेक भागांचा किंवा प्राण्यांपासून निर्माण होणाऱ्या अनेक गोष्टींचा उपयोग होतो. त्यामुळे अशा स्थितीत संबंधित औषध हलाल आहे की हराम हे मुस्लीम बांधव ठवतात. डुकराच्या चरबीचा समावेश असलेली कोणतीही वस्तू मुस्लीम वापरत नाहीत. पॅकेजिंग साहित्य, प्राण्यांसाठी दिले जाणारे खाद्य, स्वत:ची काळजी म्हणून वापरले जाणारे वेगवेगळे प्रॉडक्ट्स हेदेखील हलाल आहेत की हराम हे ठरवले जाते.
हलाल प्रमाणपत्र काय आहे? हे प्रमाणपत्र कोण देते?
एखादी वस्तू हलाल आहे की नाही, हे प्रमाणित करण्यासाठी हलाल प्रमाणपत्र दिले जाते. एखाद्या वस्तूला हलाल प्रमाणपत्र मिळालेले आहे म्हणजेच संबंधित वस्तूची निर्मिती करणाऱ्या संस्थेने सर्व नियमांचे पालन केलेले आहे, असा त्याचा अर्थ होतो. हलाल प्रमाणपत्राचा मांसाशी काहीही संबंध नाही किंवा हलाल प्रमाणपत्र आहे म्हणजे संबंधित वस्तूमध्ये मांस आहे, असा त्याचा अर्थ होत नाही.
भारतात एकही नियामक संस्था नसताना प्रमाणपत्र कसे मिळते?
हलाल प्रमाणपत्र देण्यासाठी किंवा त्याचे नियम करण्यासाठी भारतात कोणतीही नियमाक संस्था नाही. मात्र, आपल्या देशात असे प्रमाणपत्र देणाऱ्या अनेक एजन्सी असून, त्या संबंधित कंपनी, उत्पादन किंवा अन्नपदार्थांना हलाल प्रमाणपत्र देतात. या संस्थांना इस्लामिक देशांत तसेच मुस्लीम ग्राहकांकडून ग्राह्य धरले जाते. उदाहरण द्यायचे असेल, तर ‘हलाल इंडिया’ ही अशीच एक कंपनी आहे. या कंपनीच्या संकेतस्थळावर त्यांच्याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. प्रयोगशाळेत कठोरपणे प्रक्रिया केल्यानंतर आम्ही संबंधित वस्तूला हलाल असल्याचे प्रमाणपत्र देतो, असे या कंपनीच्या संकेतस्थळावर सांगितलेले आहे. हलाल इंडिया या कंपनीने दिलेले प्रमाणपत्र कतारचा सार्वजनिक आरोग्य विभाग, संयुक्त अरब अमिरातीचा उद्योग आणि तंत्रज्ञान मंत्रालय विभाग, मलेशियाचा इस्लामिक विकास विभाग ग्राह्य धरतो.