जगातील कोणतेही संरक्षण दलाला सध्याच्या काळात हेलिकॉप्टर शिवाय कल्पनाच करता येणार नाही असं हेलिकॉप्टरचे अनन्य साधारण महत्व आहे. कोणत्याही वातावरणात संचार करणे, २० किलोमीटर उंचीपर्यंत उड्डाण करणे, विविध शस्त्रांसह लढणे, लष्कराच्या जवानांची, लष्करी साहित्याची वाहतुक करणे, कोणत्याही ठिकाणी उतरणे, हवेत स्थिर रहाणे अशी विविध क्षमता असलेली बहुउद्देशीय हेलिकॉप्टर जगात अनेक संरक्षण दलांकडे आहेत.
हेलिकॉप्टर मुळचे कुठले ?
Mi-17 हेलिकॉप्टरचे तंत्रज्ञान हे पुर्णपण सोव्हिएत रशियाचे होते. Mi म्हणजे Mikhail Mil या रशियन अभियंत्याने १९५० दशकांत हेलिकॉप्टरची निर्मिती केली. त्यांनी स्थापन केलेल्या कंपनीने Mikhail Mil यांच्या आद्यअक्षरावरुन हेलिकॉप्टरला Mi हे दिलं, या नावावरुन अनेक हेलिकॉप्टरची निर्मिती करण्यात आली आहे. तर याच श्रेणीतले Mi-17 हेलिकॉप्टर हे १९७७ ते रशियाच्या संरक्षण दलात दाखल झाले. मुळच्या Mi-8 या हेलिकॉप्टरची नवी आधुनिक आवृत्ती म्हणून Mi-17 कडे बघितलं जातं. लष्करापासून नागरी वापराकरता या हेलिकॉप्टरचा वापर करणे शक्य असल्याने जगात हे हेलिकॉप्टर लोकप्रिय आहे. म्हणूनच सध्या जगातील ६० पेक्षा जास्त देशांकडे Mi-17 हे हेलिकॉप्टर कार्यरत आहे. Mi-17 मधे बदलत्या काळानुसार विविध बदल करण्यात आले असून आत्तापर्यंत सुमारे १० हजार पेक्षा जास्त हेलिकॉप्टरची निर्मिती करण्यात आली आहे.
भारताकडे Mi-17
सध्या देशाच्या संरक्षण दलाकडे विविध हेलिकॉप्टर असून त्यापैकी Mi-17 हेलिकॉप्टर हा संरक्षण दलाचा कणा आहे. देशातील भौगोलिक विविधता बघता सर्व ठिकाणी संचार करण्याची, कार्यरत रहाण्याची या हेलिकॉप्टरची अनोखी अशी क्षमता आहे. या एकाच वेळी २४ पेक्षा जास्त लोकांना नेण्याची किंवा ४ टन वजनाचे लष्करी साहित्य वाहून नेण्याची या हेलिकॉप्टरची क्षमता आहे. जास्तीत जास्त २८० किलोमीटर प्रति तास या वेगाने हवेत संचार करण्याची तर एका दमात जास्तीत जास्त ८०० किलोमीटर अंतर पार करण्याची Mi-17 हेलिकॉप्टरची क्षमता आहे.
Mi-17 हेलिकॉप्टर बहुउद्देशीय
देशातील अति महत्त्वाच्या म्हणजे राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षणमंत्री, लष्कराचे वरिष्ठ अधिकारी यांना इच्छित स्थळी नेण्याची जबाबदारी ही Mi-17 वर आहे. याचबरोबर संरक्षण दलातील जवानांची, लष्करी साहित्याची ने-आण करण्यासाठी, विविध लष्करी कारवाईंसाठी याच Mi-17 चा वापर होतो. एवढंच नाही तर शोध आणि सुटकेच्या मोहिमेत तसंच पुर – अतिवृष्टीच्या काळात लोकांना वाचवणे, मदत पोहचवणे अशा नागरी मदत काळात अनेकदा Mi-17 हेलिकॉप्टरने अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे.
Mi-17 ची आधुनिक आवृत्ती Mi-17V5
साधारण १९९० च्या दशकात Mi-17 हेलिकॉप्टरचा संरक्षण दलात समावेश झाला. सध्या भारतीय वायू दलाकडे २०० पेक्षा जास्त Mi-17 कार्यरत आहे. यामध्येच Mi-17 ची आधुनिक आवृत्ती असलेले Mi-17V5 हे १०० पेक्षा जास्त आहेत. तर सीमा सुरक्षा दलाकडे एकुण आठ Mi-17 आहेत. साधारण २००८ नंतर Mi-17V5 या नव्या आणि आधुनिक हेलिकॉप्टरच्या आवृत्तीचा समावेश संरक्षण दलात करण्यात आला. रात्रीच्या वेळी किंवा दिवसा अत्यंत प्रतिकुल वातावरणात उड्डाण करण्याचे कसब हे Mi-17V5 कडे आहे.