लोक विमानात दारूचे सेवन का करतात (मद्यपान) याची असंख्य कारणे आहेत. बरेच प्रवासी सुट्टीची सुरुवात किंवा शेवट म्हणून दारू पितात, तर अनेक प्रवासी लांब प्रवासात चांगली झोप यावी म्हणून दारू पितात. काहींचे म्हणणे आहे की, विमान प्रवासाची भीती असल्यामुळेही अनेकजण दारूचे सेवन करतात. विशेषतः आंतरराष्ट्रीय प्रवासात प्रवाश्यांना दारू दिली जाते. परंतु, विमान प्रवासादरम्यान दारूचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक असल्याची धक्कादायक माहिती एका संशोधनात समोर आली आहे. जर्मन एरोस्पेस सेंटर (डीएलआर) आणि आचेन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी प्रकाशित केलेल्या नवीन अहवालानुसार, विमान प्रवासात दारूचे सेवन करणे विशेषतः वृद्ध प्रवाशांसाठी किंवा वैद्यकीय समस्या असलेल्या लोकांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. विमान प्रवासात दारूचे सेवन केल्यास आरोग्यावर काय परिणाम होतात? याविषयी जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कमी ऑक्सिजन, हृदयाची अनियमित गती

उड्डाणादरम्यान विमानातील हवेचा दाब कमी होतो. विमान जवळ जवळ २,५०० मीटर उंचीवर असते. त्यामुळे विमानातील हवेचा दाब समुद्रसपाटीवरील हवेच्या दाबाशी सुसंगत नसतो. विमानाची उंची जितकी जास्त तितका हवेचा दाब कमी होत जातो. हवेचा दाब जितका कमी होतो, तितके रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. थोरॅक्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार ऑक्सिजनचे प्रमाण सुमारे ९० टक्क्यांपर्यंत कमी होते. ऑक्सीजनचे प्रमाण याहून घटल्यास स्नायू आणि अवयवांना पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. कारण, शरीर मेंदूला ऑक्सिजन पुरवण्याचा प्रयत्न करत असतो. ऑक्सिजनच्या या कमतरतेमुळे चक्कर येणे किंवा मळमळ होणे यांसारखे लक्षणे जाणवू शकतात. रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यास किंवा एखादा आजार असल्यास, श्वास घेण्यासदेखील त्रास होऊ शकतो. झोपेच्या वेळी दारूच्या सेवनामुळे हृदयाचे ठोके वाढले तर अधिक ऑक्सिजनची कमतरता होऊ शकते.

हेही वाचा : पंतप्रधान मोदींचे दरमहा वेतन किती? कोणत्या जागतिक नेत्याचे वेतन सर्वाधिक?

दारूचे सेवन केल्यास ऑक्सिजनच्या पुरवठ्यात

या विषयाचे संशोधन दोन गटांना विभागून करण्यात आले. एक संशोधन ‘स्लिप लेबोरेटरी’मध्ये सामान्य हवेचा दाब असलेल्या ठिकाणी करण्यात आले, तर दुसरे विमानाच्या केबिन प्रमाणेच हवेचा उच्च दाब असलेल्या ठिकाणी करण्यात आले. या चाचणीदरम्यान काहींनी दारूचे सेवन केले, तर काहींनी केले नाही. या अभ्यासात असे दिसून आले आहे की, सिम्युलेटेड एअरक्राफ्ट केबिनमध्ये मद्यपान केलेल्या चाचणीत लोकांच्या हृदयाची सरासरी गती ८८ बीट्स प्रति मिनिटापर्यंत वाढली, तर त्यांचे ऑक्सिजनचे प्रमाण सुमारे ८५ टक्क्यांपर्यंत खाली घसरले. सरासरी त्यांच्या हृदयाचे ठोके दुसर्‍या गटातील लोकांपेक्षा जास्त होते. वृद्ध किंवा आजारी लोकांसाठी कमी ऑक्सिजन पुरवठा आणि हृदयाची अनियमित गती जीवघेणी ठरू शकते, असे संशोधकांनी सांगितले.

हेही वाचा : रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेट ‘जैसे थे’, कारण काय? जीडीपी वाढीचा अंदाज का वर्तविण्यात आला?

विमानात दारू बंदी असावी का?

उड्डाणांमध्ये दारूवर बंदी घालावी का, हा प्रश्न अनेक दशकांपासून चर्चेत आहे. या अभ्यासातून आरोग्याचे धोके समोर आले असले तरी यातून कोणते थेट निष्कर्ष काढता येणे कठीण आहे. कारण- ही चाचणी अत्यंत लहान गटात करण्यात आली आहे. असे असले तरी, संशोधकांना आशा आहे की या अभ्यासामुळे या विषयावर अधिक संशोधनाला चालना मिळेल. अभ्यासाचे परिणाम असे सूचित करतात की, दारूचे अतिसेवन केल्यास आणि उड्डाण करताना झोपल्यास तरुण आणि निरोगी लोकांमध्येही हृदयासंबंधित आजार उद्भवू शकतात, असे संशोधकांनी लिहिले आहे. वृद्ध लोकांमध्ये आणि हृदय किंवा फुफ्फुसासंबंधित आजार असलेल्यांमध्ये ही लक्षणे आणखी गंभीर असू शकतात. संशोधकांनी विमानांतील विद्यमान नियमांमध्ये बदल करणे आणि विमानात दारूचे सेवन मर्यादित करण्याविषयीही आपली सहमती दर्शविली आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: You should avoid alcohol on flights rac
Show comments