राजस्थानमधील बारमेर जिल्हा हा भारत-पाकिस्तान सीमेवरील एक मोठा आणि महत्त्वाचा जिल्हा. राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशातील दुसऱ्या क्रमांकाचा हा सर्वात मोठा जिल्हा आहे. ३२ लाख लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्याला २०१९ पासून एका गंभीर समस्येने ग्रासले आहे. २०२० साली जगभरात करोनाची साथ पसरली, पण बारमेर जिल्ह्यात एक वर्ष आधीच आत्महत्यांची साथ पसरली. मागच्या तीन ते चार वर्षांत एकाच पद्धतीने तरुण महिला विहिरीत उडी घेऊन अकाली मरणाला कवटाळत आहेत. यामध्ये नवीन लग्न झालेल्या, लहान मुले असलेल्या महिलांचा समावेश आहे. मागच्या पाच वर्षांत ५० प्रकरणांमध्ये महिलांनी आपल्या लहान मुलांसह आत्महत्या केल्याचे दुर्दैवी प्रकार घडले आहेत. फक्त महिलाच नाही तर तरुण पुरुषही आत्महत्येचा पर्याय निवडत आहेत. मात्र त्याची चर्चा महिलांच्या प्रकरणांच्या तुलनेत थोडी कमी होते. बारमेरमधील ही आत्महत्यांची साथ समाजशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, प्रशासन, आरोग्य विभाग, सरकार यांच्यासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. या विषयाचा घेतलेला हा आढावा.
‘द प्रिंट’ या संकेतस्थळाने बारमेर जिल्ह्यातील आत्महत्यांच्या प्रकरणांचा सविस्तर अभ्यास करून त्यातील कंगोरे उलगडून दाखविले आहेत. २७ वर्षीय हनुमान राम या तरुणाच्या २० वर्षीय पत्नी ममताने ९ एप्रिल रोजी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ज्या विहिरीत ममताने जीव दिला, ती विहीर प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी बंद केली होती. तरुण महिलांच्या आत्महत्या रोखण्यासाठी हा उपाय केला होता. तरीही विहिरीच्या आच्छादनाला असलेल्या एका छोट्या छिद्रातून ममताने विहिरीत उडी मारून आपले जीवन संपविले. ममताचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला दोन तास लागले.
प्रशासनाने घेतले खबरदारीचे उपाय
बारमेरचे जिल्हा न्यायदंडाधिकारी लोक बंधू यांनी महिलांच्या आत्महत्यांबद्दल चिंता व्यक्त केली. एप्रिल २०२१ मध्ये, करोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांची बदली बारमेर जिल्ह्यात झाली होती. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात २०१९ साली ४८, २०२० साली ५४ आणि २०२१ साली ६४ महिलांनी आत्महत्या केल्या आहेत. यांतील ६० टक्के आत्महत्या या विहिरीत उडी घेऊन झाल्या आहेत, अशी माहिती बंधू यांनी दिली. आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासनाने १० ऑक्टोबर २०२१ रोजी ‘अनमोल जीवन’ अभियान हाती घेतले. या अभियानांतर्गत २४ तास कार्यरत असणारी एक हेल्पलाईन तयार करण्यात आली आहे. ग्रामसेवकांना धोक्याचा इशारा देण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे, ग्रामपंचायतींना सर्व विहिरी झाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, तसेच बातम्या देणाऱ्या यूट्यूब चॅनेल्सनी आत्महत्येसारख्या संवेदनशील आणि दुर्दैवी प्रकरणांना सनसनाटीपणा देऊ नये, अशी विनंती करण्यात आली आहे.
हे वाचा >> आत्महत्यांचा इतिहास आणि आजचे गंभीर स्वरूप
या उपाययोजनांचे चांगले परिणाम लगेच दिसून आले. हेल्पलाईनच्या क्रमांकावर दर महिन्याला १५ ते २० फोन येत आहेत. यात महिला, पुरुष यांच्यासोबत लहान मुलेदेखील फोन करत आहेत. २०२२ सालात ३७ महिलांच्या आत्महत्यांची नोंद झाली. आधीच्या वर्षापेक्षा त्यात ४२ टक्क्यांची घट पाहायला मिळाली, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
आत्महत्यांची नक्कल आणि पुनरावृत्ती
भारतात अनेक ठिकाणी बारमेरसारखी आत्महत्येच्या प्रकाराची नक्कल होऊन त्याची पुनरावृत्ती झालेली पाहायला मिळाली आहे. बंगळुरूमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) या संस्थेने वसतिगृहातील खोल्यांमधील छताला असलेले सर्व पंखे काढून टाकले. त्याऐवजी भिंतीला टांगलेले पंखे बसविण्यात आले आहेत. जानेवारी ते मार्च २०२१ या काळात वसतिगृहातील चार मुलांनी पंख्याला लटकून आत्महत्या केली होती. त्यानंतर हा उपाय योजला गेला. असाच प्रकार दिल्ली मेट्रो स्थानकात घडला होता. जानेवारी २०१८ ते मे २०१९ या काळात मेट्रोच्या ट्रॅकवर उड्या घेऊन २५ लोकांनी आत्महत्या केली होती. त्यानंतर दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने ट्रकजवळ स्क्रीन डोअर बसविले आहेत.
उत्तर दिल्ली येथील यमुना नदीवर असलेल्या पुलाला जाळी लावण्याची विनंती पोलीस खात्याने पर्यटन विभागाला केली. १५४ मीटर उंच असलेल्या या पुलावरून उडी मारून दर महिन्याला तीन ते चार लोक आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. मागच्या वर्षी खासगी गाड्यांच्या चालकांनी ३० लोकांना उडी मारण्याच्या आधी वाचविल्याची नोंद करण्यात आली आहे.
बारमेर जिल्ह्यातही विहिरींमध्ये उडी मारण्याचे सत्र सुरू झाल्यानंतर जवळपास ६०० विहिरांना काँक्रिटचे झाकण बसवून पाणी काढण्यासाठी हँड पंप बसविण्यात आला आहे.
आत्महत्येची कारणे काय आहेत?
बारमेर जिल्ह्यातील गावांमध्ये शिक्षक आणि गावातील प्रमुख व्यक्तींनी केलेल्या सर्वेक्षणानुसार आंतरजातीय विवाह, विवाहबाह्य संबंध, बालविवाह, सासरी होणारा सुनेचा छळ आणि कौटुंबिक हिंसाचार अशी काही प्रमुख कारणे आत्महत्येमागे असल्याचे दिसले. हुंडा, दुष्काळ आणि कर्ज अशीही काही इतर कारणे आहेत, ज्यामुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जाते. अलीकडे माध्यमांकडून आत्महत्यांसारखी प्रकरणे सनसनाटी पद्धतीने प्रसारित केली जातात. या वेळी हेल्पलाईन क्रमांकही दाखविला जात नाही, हेदेखील आत्महत्या वाढण्याचे कारण असल्याचे डॉ. लक्ष्मी विजयकुमार यांनी सांगितले. चेन्नईमधील व्हॉलंटरी हेल्थ सर्विसच्या मानसोपचार विभागाच्या प्रमुख असलेल्या डॉ. लक्ष्मी म्हणाल्या की, बारमेरमधील महिलांना अधिकतर वेळ पाणी भरण्यासाठी विहिरीजवळ घालवावा लागतो. त्यामुळे आयुष्य संपवताना त्या विहिरीला कवटाळतात, असे लक्षात आले आहे.
ऑक्टोबर २०२२ मध्ये अनमोल जीवन (Anmol Jeevan) योजना स्थगित केल्यामुळे बारमेरमध्ये पुन्हा एकदा आत्महत्येच्या प्रकरणांनी डोके वर काढले आहे. वाढत्या प्रकरणांमुळे जिल्ह्यात शिक्षक आणि गावातील प्रमुख व्यक्तींची पथके तयार करून आत्महत्यांमागच्या कारणांचा शोध घेण्यास सुरुवात झाली. पण हे काम वाटते तितके सोपे नाही. बारमेरमधील कुटुंबपद्धत ही अतिशय खासगी स्वरूपाची बाब आहे, ते सहजासहजी घरातील गोष्टी बाहेर सांगत नाहीत. झाकली मूठ… असा घट्ट समज येथील लोकांमध्ये असल्यामुळे त्यांच्याकडून माहिती काढणे अवघड काम आहे, अशी प्रतिक्रिया शोभा गौर यांनी दिली. बारमेरमध्ये समुपदेशक म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे.
शिक्षक पारस पंडित, जे या सर्वेक्षणात सहभागी होते, ते म्हणाले की, आंतरजातीय लग्नाला कुटुंबातून असलेला विरोध हे आत्महत्या करण्याचे एक मोठे कारण असल्याचे आमच्यासमोर आले. कुटुंबाचा विरोध झुगारून जी मुले-मुली अशा प्रकारे लग्न करतात त्यांची समाजाकडून अवहेलना होते, त्यांचा छळ केला जातो. ज्यामुळे कंटाळून आत्महत्येचा पर्याय निवडला जातो.
विहिरीने पुरुषांना रोजगार दिला, महिलांना मृत्यू
ज्या विहिरीत ममताने आत्महत्या केली, ती विहीर रोजगार हमी योजनेतून (NREGA) बांधण्यात आली होती. ममताचा पती हनुमानसारख्या अनेक पुरुषांना अशा विहिरींनी रोजगार मिळवून दिला. १२ बाय १० फुटांची, पाच हजार लिटर पाणी-क्षमता असणारी विहीर बांधण्यासाठी १.५ लाखांचा खर्च येतो. २०२१-२२ मध्ये बारमेरमध्ये १६ हजार ४३३ विहिरी बांधण्यात आल्या. ज्यांमधून रोजंदारी करणाऱ्यांना किमान १०० दिवसांचा रोजगार देता आला. १.२१ लाख कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळाला.
एकाकीपण, बंदिस्त जीवन पद्धत, व्यक्त होण्यास मर्यादा…
वाळवंटी प्रदेश असलेल्या बारमेर जिल्ह्यातून तरुणांचे स्थलांतर होते. बेरोजगारी, दुष्काळ आणि त्यासोबत मानसिक आजार, असे काही गंभीर प्रश्न बारमेरच्या जनतेसमोर उभे आहेत. बारमेरचा भूगोल थोडा किचकट विषय आहे. येथील गावे विखुरलेली आहेत. घरांमधील अंतरही जास्त आहे. अनेक ठिकाणी हे अंतर काही किलोमीटरचे आहे. त्यामुळे मदत मिळणे किंवा मिळविणे अवघड होऊन बसते. सर्वेक्षण करत असताना जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आली. आदिवासीसदृश भिल समाजात गरिबी, कर्जबाजारीपणा अशा समस्यांमुळे आत्महत्येसारखे प्रकार घडत आहेत. अनुसूचित जातीमधील मेघवाल आणि इतर ओबीसी (जाट, बिश्नोई) समाजातदेखील हा धोका वाढत चालला आहे.
एकाकीपण, त्यातून कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीसोबत निर्माण झालेले प्रेमसंबंध हेदेखील आत्महत्येचे कारण असल्याचे समोर आले आहे. २०२२ मध्ये वृत्तपत्रातून समोर आलेल्या एका प्रकरणात वडील, मुलगा आणि सून अशा तिघांमध्ये प्रेमाचा त्रिकोण होता. दुसऱ्या एका प्रकरणात सासू आणि जावयाचे प्रेमसंबंध आढळले, ज्याची वाच्यता झाल्यानंतर त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले. बारमेरमधील बहुतेक तरुण पुरुष रोजगाराच्या शोधात महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांत स्थलांतर करतात, ज्यामुळे मागे राहिलेल्या महिलांच्या मनामध्ये एकाकीपणाची भावना घर करते. अशा भावनेतून समाजाने निषिद्ध मानलेली नाती तयार होतात.
लोभ, सोशल मीडिया आणि एका सुंदर आयुष्याची कल्पना
समाजातील लोकांची कमी होत असलेली सहनशीलता, मोबाइलचा अतिरेकी वापर, यूट्यूब आणि इतर माध्यमांतून दिसणाऱ्या सुंदर आयुष्याची कल्पना… अशीही काही कारणे आत्महत्येच्या विचारासाठी पूरक ठरतात. बारमेरमध्ये फक्त महिलाच नाही तर पुरुषांच्याही आत्महत्या वाढलेल्या आहेत. पण त्याची वाच्यता फारशी होत नाही. २०१९ मध्ये ८४, २०२० मध्ये ९८, २०२१ मध्ये १०७ आणि २०२२ मध्ये ११० आत्महत्या झालेल्या आहेत. भारतीय समाजात महिलेची आत्महत्या झाल्यावर तिच्याशी संबंधित वेगळ्या चर्चा केल्या जातात. मात्र पुरुषाने आत्महत्या केल्यानंतर फारशी कुजबूज होत नाही.
“महिला या दिवसेंदिवस अधिक लोभी होत चालल्या आहेत. जर एका महिलेने दुसऱ्या महिलेच्या अंगावर महागडे दागिने पाहिले, तर तिलाही तिच्या नवऱ्याकडून अशाच दागिन्यांची अपेक्षा असते,” अशी प्रतिक्रिया अत्ते सिंह यांनी दिली. बारमेरच्या चादर पंचायतीचे ते सदस्य आहेत. ५० वर्षीय अत्ते सिंहला तीन मुली आहेत. अत्ते सिंहची पत्नी म्हणते की, हल्ली नवऱ्याच्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाल्याची बातमी कानावर येत नाही. आम्ही आमच्या तीनही मुलींना राजपुती संस्कार आणि संस्कृतीत वाढवत आहोत, याचा आम्हाला अभिमान वाटतो.