मतदार ओळखपत्र हा कोणत्याही निवडणुकीचा आधार असतो. मतदार ओळखपत्र तयार झाले तरी मतदार यादीत नाव नाही, अशी समस्या अनेकदा दिसून आली आहे. त्यामुळे अनेक मतदारांना आपल्या मतदानाचा मौल्यवान अधिकार बजावता येत नाही. मात्र, आता तुम्हाला पुन्हा पुन्हा या समस्येचा सामना करावा लागणार नाही. लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलला होणार असून, त्याला अवघे दोन आठवडे उरले आहेत. तुमच्या मतदारसंघात लोकसभा किंवा राज्य विधानसभेसाठी गेल्या वेळी निवडणुका झाल्यानंतर मतदानाचे वय १८ वर्षे पूर्ण केले असल्यास तुम्ही मतदान करण्यासाठी स्वतःची नोंदणी करू शकता. मतदानाला पात्र असण्यासाठी १ एप्रिल २०२४ पर्यंत वय वर्ष १८ पूर्ण केलेले असावे. तुमच्याकडे मतदार ओळखपत्र असेल आणि तुमचे नाव मतदार यादीत नसेल तर काय करावे याची माहिती जाणून घेणार आहोत.
तुम्ही वयाने मोठे असाल आणि आधी मतदान केले असेल किंवा तुम्ही मतदान करण्यासाठी स्वतःची नोंदणी करून ठेवली असेल, तर तुमच्या मतदारसंघाच्या मतदार यादीत तुमचे नाव असले पाहिजे. जर तुम्ही शेवटचे मतदान केल्यानंतर दुसरीकडे राहायला गेला असाल आणि तुम्ही तुमचा पत्ता भारतीय निवडणूक आयोगाकडील मतदार ओळखपत्रामध्ये अद्ययावत केला नसेल, तर तुम्ही आता राहत असलेल्या मतदारसंघाच्या मतदार यादीत तुमचे नाव दिसणार नाही. तुमचे नाव अजूनही तुमच्या जुन्या मतदारसंघात दिसू शकते; खरं तर वार्षिक पुनरावृत्तीच्या तपासणीदरम्यान अनेक नावे यादीतून काढून टाकली जातात. बनावट नोंदी म्हणजे एकाच व्यक्तीच्या दोन वेगवेगळ्या पत्त्यांवरील नोंदीदेखील हटविल्या जातात. विशेष म्हणजे मतदार यादीतील आपले नाव तपासावे लागेल. तुम्ही हे ऑनलाइन तपासू शकता; कसे, आणि कुठे ते पाहू यात.
खरं तर तुम्ही मतदान केव्हा करणार याची तारीख तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणुका सात टप्प्यात होत आहेत. १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे, २५ मे आणि १ जून रोजी मतदान होणार आहे. अनेक राज्यांमध्ये टप्प्याटप्प्यांत मतदान होणार आहे. खरं तर वेगवेगळ्या भागानुसार संबंधित टप्प्यात मतदान होणार आहे. तुम्ही दिल्ली किंवा गुडगावमध्ये राहत असल्यास २५ मे रोजी फक्त सहाव्या टप्प्यात मतदान होणार आहे. तर तुम्ही नोएडातील गौतम बुद्ध नगर किंवा गाझियाबाद येथे राहत असल्यास तुम्ही दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलला मतदान करू शकता. तुम्ही निवडणूक मतदानाच्या तारखांचा अखिल भारतीय नकाशा https://www.eci.gov.in/newimg/ge2024.png भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) वेबसाइटवर पाहू शकता.
हेही वाचाः केदारनाथमध्ये पुन्हा प्रलय येऊ शकतो का? हिमनदी तलावफुटीच्या दुर्घटनांमध्ये होतेय वाढ; कारण काय?
मतदार यादीत आपले नाव आहे की नाही हे कसे तपासावे?
तुम्ही ECI च्या वेबसाइटवर जाऊन electoralsearch.eci.gov.in किंवा ECI च्या व्होटर हेल्पलाइन ॲपवर आपले नाव आहे की नाही ते तपासू शकता. वेबसाइटवर तुम्ही तुमचे नाव (१) तुमच्या मतदार आयडीद्वारे पाहू शकता, ज्याला ECI शब्दात EPIC म्हटले जाते म्हणजेच त्यात मतदारांचे फोटो ओळखपत्र असते (२) तुमच्या मोबाइल फोन नंबरद्वारे किंवा (३) तुमचा वैयक्तिक तपशील जसे की नाव, जन्मतारखेद्वारेही तुम्ही तपासू शकता. तुमच्याकडे तुमचे मतदार ओळखपत्र उपलब्ध असल्यास कार्डवरील क्रमांकाद्वारे तपासणे सर्वात सोपे आहे. तुमचा मोबाईल क्रमांक ECI वर नोंदणीकृत असल्यास तेही सोयीचे आहे. तुम्हाला तुमच्या फोनवर एक OTP मिळेल, जो तुम्हाला तपशील मिळविण्यासाठी द्यावा लागेल. तिसरा मार्ग म्हणजे वैयक्तिक तपशील तपासून घ्यावा लागेल. मतदार आयडीमध्ये चूक असल्यास तुम्ही मतदानापासून वंचितही राहू शकता. जसे की, तुमच्या वडिलांच्या/पतीच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये त्रुटी असल्यास तुम्ही ती चूक किंवा विसंगती सुधारली पाहिजे, परंतु येत्या निवडणुकीसाठी ते करणे काहींना कठीण जाऊ शकते.
हेही वाचाः इस्रायलने सीरियात इराणी जनरलला का मारले; कुड्स फोर्स कोण आहेत?
मतदार यादीत तुम्हाला कोणती माहिती मिळेल?
माहिती स्वतंत्र भागांमध्ये उपलब्ध आहे, जसे की, EPIC क्रमांक, नाव, वय, नातेवाईक (वडिलांचे/पतीचे) नाव, राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ, मतदान केंद्र यांचा समावेश असतो.
तुमचे नाव मतदार यादीत नसल्यास काय करू शकता?
ज्यांनी यापूर्वी मतदार नोंदणी केली आहे, परंतु आता त्यांची नावे यादीत सापडत नाहीत, त्यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या ३ ते ७ टप्प्यांसाठी मतदार होण्यासाठी अर्ज करण्यास अजून वेळ आहे. निवडणूक आयोग संबंधित टप्प्यासाठी नामांकनाच्या शेवटच्या तारखेपर्यंत मतदार यादी सातत्याने अद्ययावत करीत असते. पहिल्या टप्प्यासाठी नामांकनाची शेवटची तारीख ही २७ मार्च होती. तर दुसऱ्या टप्प्यासाठी नामांकनाची शेवटची तारीख ४ एप्रिल होती. आता तिसरा आणि चौथ्या, पाचवा, सहावा आणि सातव्या टप्प्यांसाठी नामांकनाची शेवटी तारीख अनुक्रमे १९ एप्रिल, २५ एप्रिल, ३ मे, ६ मे आणि १४ मे आहे. तुम्ही नामांकनाच्या शेवटच्या तारखेच्या किमान सात दिवस आधी तुमचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे, जेणेकरून फॉर्म प्रक्रियेसाठी पुरेसा वेळ मिळेल, असंही निवडणूक आयोगाकडून सांगितले आहे. मतदारांच्या विविध गरजांसाठी विविध फॉर्म आहेत. तुम्ही ECI च्या वेबसाइटच्या संबंधित पेजवर तुम्हाला लागू होणारा फॉर्म डाऊनलोड करू शकता. [https://voters.eci.gov.in/]
नव्या मतदाराने मतदार यादीत नाव कसे नोंदवावे?
मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी तुम्ही फॉर्म ६ भरला पाहिजे, जो इतर फॉर्मसह ECI वेबसाइटवर उपलब्ध आहे. तुमचा मोबाईल फोन नंबर किंवा ईमेल पत्ता वापरून साइन अप केल्यानंतर तुम्ही हा फॉर्म ऑनलाइन भरू शकता. नाव, लिंग, पत्ता, जन्मतारीख आणि नातेवाईक (वडील, आई, पती किंवा पत्नी) यासारखे तपशील भरण्याव्यतिरिक्त अर्जदाराला जन्मतारीख सिद्ध करण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही एका कागदपत्राची स्वयं-साक्षांकित प्रत द्यावी लागेल. जसे की, जन्म प्रमाणपत्र, आधार किंवा पॅन, वाहन चालविण्याचा परवाना, CBSE/ ICSE किंवा राज्य शिक्षण मंडळांनी जारी केलेले इयत्ता दहावी किंवा बारावीचे प्रमाणपत्र जर त्यात जन्मतारीख असेल. तसेच भारतीय पासपोर्टही चालू शकतो. पत्त्याच्या पुराव्याची स्वयं साक्षांकित प्रत देखील आवश्यक आहे. यासाठी अनेक कागदपत्रांपैकी एक सादर केले जाऊ शकते, ज्यामध्ये त्या पत्त्यासाठी किमान एक वर्षाचे पाणी, वीज, गॅस कनेक्शन बिल, राष्ट्रीयकृत/शेड्युल्ड बँक/पोस्ट ऑफिसचे वर्तमान पासबुक, भारतीय पासपोर्ट, नोंदणीकृत भाडेपट्टा कराराचा समावेश आहे.