सिद्धेश्वर डुकरे

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयातर्फे दरवर्षी प्रत्येक राज्यात ‘मतदार याद्यांसाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम’ राबवला जातो. यामध्ये नवमतदारांच्या नोंदणीवर लक्ष केंद्रित केलेले असते. आयोगाकडून यंदाही कार्यक्रम राबवण्यात येत आहे. मात्र तरुण मतदारांनी त्या प्रमाणात नोंदणी करण्यास उदासीनता दाखवल्याचे चित्र आहे. त्यामुळे, यामागील कारणे शोधून तरूण मतदारांची नोंदणी करवून घेण्यासाठी आयोगाचे कार्यालय बरेच परिश्रम घेत आहे.

‘विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम’ – म्हणजे काय?

मतदानासाठी पात्र असलेल्या राज्यातील नागरिकांची एका विशिष्ट तारखेपर्यंतची एकूण संख्या ठरवणारा कार्यक्रम म्हणजे ‘विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम’. दरवर्षी हा कार्यक्रम राबविला जातो. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२४ या अर्हता तारखेवर पात्र ठरणाऱ्या नागरिकांसाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये पूर्व-पुनरीक्षण उपक्रम व पुनरीक्षण उपक्रम असे दोन टप्पे असतात. पूर्व-पुनरीक्षण उपक्रमात मतदार यादी संदर्भातील सर्व कायदे आणि मार्गदर्शक सूचना, तांत्रिक माहिती संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना देण्याचे काम असते. पुनरीक्षण उपक्रमात घरोघरी भेट देऊन पडताळणी करणे, मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण/ प्रमाणीकरण,  मतदार यादीतील वा मतदार ओळखपत्रातील त्रृटी दूर करणे, आयोगाच्या मानकानुसार छायाचित्रे आहेत की नाही याची खातरजमा करून मग मतदार यादीत सुधारणा करणे अशी कामे अधिकारी/ कर्मचाऱ्यांना करावी लागतात.

मतदार नाव नोंदणीसाठी अट आहे का?

आतापर्यंत १ जानेवारी ही अर्हता तारीख असायची. म्हणजे १ जानेवारी किंवा त्या अगोदर १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकाला मतदार नोंदणी करता येत असे. मात्र २०२३ पासून १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै अथवा १ ऑक्टोबर किंवा त्याअगोदर ज्या नागरिकांची १८ वर्षे पूर्ण होतील, त्यांना मतदार नोंदणी करता येणार आहे.

राज्यात नवमतदारांची किती नोंदणी झाली?

वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या कोणत्याही तरुण-तरुणीस आपले नाव मतदार यादीत नोंदवता येते. राज्यात १८ ते १९ वयोगटातील तरुणांची संख्या यंदा ४२ लाख ९८ हजार ७५६ इतकी गृहीत धरली असून ३० एप्रिल २०२३ पर्यंत प्रत्यक्ष नोंद सात लाख ९९ हजार २१० इतकी झाली आहे. नवमतदार सोडले तर इतर नागरिकांसाठी १० वर्षांच्या फरकाने गट केले आहेत. म्हणजे २० ते २९ या वयोगटापासून ८० वर्षे ते त्यापेक्षा जास्त या गटापर्यंत. सध्या ९ कोटी ३ लाख २ हजार ६२ इतक्या मतदारांची ३० एप्रिलपर्यंत नोंद झाली आहे.

कमी नोंदणीमागील कारणे काय?

आयोगातील जाणकारांच्या माहितीनुसार नवमतदारामध्ये मतदार नोंदणीबाबत जागृतीचा अभाव, बदलत्या राजकीय वातावरणात मतदान करण्याविषयी असलेली कमालीची उदासीनता, त्यात भरच घालणारा राजकारणाविषयी नकारात्मक बातम्यांचा प्रभाव, मतदार नोंदणीबाबत आळस करणे.. अशा कारणांमुळे नोंदणी रोडावली आहे.

मग नोंदणी वाढवण्यासाठी उपाय काय?

राज्यात १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी आयोगाचे कार्यालय विविध उपक्रम राबवते. तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, नेहरू युवा केंद्र संघटन, भारत स्काऊट आदी संघटनांच्या मदतीने राज्यभर मतदार नोंदणीची शिबिरे राबवण्यात येणार आहेत. तरुणांमध्ये मतदार नोंदणीसाठी जाणीवजागृती निर्माण होण्यासाठी ‘मतदान रथ’ शाळा, महाविद्यालये येथे फिरवला जाणार आहे. मतदार नोंदणी आणि मतदान करणे याचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी कलापथकांची मदत घेतली जाणार आहे. तसेच लोकशाही, लोकशाही प्रक्रियेतील विविध अंगे याची माहिती राज्यातील तरुण-तरुणींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. मतदार नोंदणी वाढवण्यासाठी महिला, दिव्यांग, वंचित घटक, तृतीयपंथी नागरिक, घर नसलेले भटक्या व विमुक्त जातीचे नागरिक यांच्या नाव नोंदणीसाठी राज्यभर विशेष शिबिरे घेतली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ही सोय ‘ऑनलाइन’ आहे?

मतदारांना नाव नोंदणी ऑनलाइन करता येते, तसेच मतदान ओळखपत्रातील माहितीत काही बदलदेखील ऑनलाइन करता येतात. यासाठी https://Voters.eci.gov.in/  या संकेतस्थळाला भेट देणे गरजेचे आहे. 

siddheshwar.dukare@expressindia.com

Story img Loader