History of Zardozi embroidery in India: इसवी सन पूर्व ३००० वर्षांपूर्वी सिंधू नदीच्या खोऱ्यातील लोकांनी एक जादू केली. इथे कोणत्याही जादूच्या मंत्राचा वापर केलेला नाही. तर त्याहूनही अधिक काहीतरी आकर्षक ते करत होते. भारताच्या कापड उद्योगाच्या इतिहासाला हजारो वर्षांची परंपरा आहे आणि इथल्या प्रत्येक धाग्यात एक वेगळी कथा विणली गेली आहे. याच कथेची पाळंमुळं आपल्याला थेट सिंधू संस्कृतीपर्यंत मागे घेऊन जातात. सुती, मलमल, रेशीम अशा अनेकविध कापडांनी भारताची गौरवगाथा समृद्ध केली. किंबहुना मुघल सम्राटांसारखे शासक देखील या कापडांच्या प्रेमात पडले. त्यांनी सूर्यास्ताला लाजवेल अशा तेजस्वी रंगांमध्ये कापडाला रंगवले आणि सोनेरी धाग्यांनी-तारांनी (ज़रदोज़ीसारख्या भरत कामाने) सौंदर्यात भर घातली.

ऋग्वेदापासून मुघल वैभवापर्यंत ज़रदोज़ीचा इतिहास

ज़रदोज़ीची कहाणी ही भारताच्या वस्त्र इतिहासाशी जोडली गेलेली गोष्ट आहे. अनेकजण मानतात की, ज़रदोज़ी भारतात पर्शियातून आली, परंतु वर्ल्ड युनिव्हर्सिटी ऑफ डिझाईन (WUD) मधील फॅशन स्कूलचे प्राध्यापक जॉन वर्गीस यांच्या मते, या कलेचा उगम ऋग्वेदाच्या काळापर्यंत मागे शोधता येतो. तर मुघल सम्राट अकबराच्या काळात ही कला अधिक विकसित झाली, आणि त्याबरोबर पर्शियन प्रभावही या कलेवर निर्माण झाला. हाच प्रभाव ज़रदोज़ीच्या डिझाईन्स आणि नावामध्ये स्पष्ट दिसतो, असे त्यांनी सांगितले. ज़रदोज़ी हा शब्दच पर्शियन प्रभावाची साक्ष देतो. पर्शियन भाषेत ‘झर’ म्हणजे सोनं आणि ‘दोज़ी/दोसी’ म्हणजे भरतकाम. ज्यामुळे ज़रदोज़ीचा अर्थ ‘सोन्याचे भरतकाम’ असा होतो, असे प्रसिद्ध डिझायनर जोडी अबू जानी- संदीप खोसला यांनी स्पष्ट केले. त्यांनी या वस्त्रकलेवर अनेक वर्षे काम केले आहे.

Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे पाटील यांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “टिकली लावलेला…”
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Nagpur Rural SP Harsh Poddar
Anil Deshmukh Injured: अनिल देशमुख यांच्या हल्ल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी सांगितला घटनाक्रम; म्हणाले, “घटनेमागील तथ्य…”
The Golden Road: How Ancient India
China Silk Road weapon: चीनकडून ‘सिल्क रोड’ या ऐतिहासिक संकल्पनेचा शस्त्रासारखा वापर; भारतीय इतिहासकार कुठे चुकले?
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 Updates: निवडून येताच डोनाल्ड ट्रम्प यांचं टीकाकारांना उत्तर; म्हणाले, “मी युद्ध घडवून आणणार नाही, तर…”
Sumit Wankhede Arvi Constituency, Sumit Wankhede,
भाग्य फळफळले! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दोन सचिवही निवडणुकीच्या रिंगणात
china leftover men reason
‘या’ देशात लग्नासाठी मुलांना मुलीच मिळेनात; ३.५ कोटी मुलांवर एकटे राहण्याची वेळ? कारण काय?
A House from 8,000 Years Ago Found in Serbia
8,000-year-old dwelling found:८,००० वर्षांपूर्वीचे नवाश्मयुगीन शेतकऱ्याचं घर नेमका काय इतिहास सांगतं?
ज़रदोज़ी: विकिपीडिया

ज़रदोज़ीची समृद्ध कला

ही आकर्षक भरतकामाची कला रेशीम, ब्रोकेड, वेल्वेट, सॅटिन आणि जॉर्जेटसारख्या विविध प्रकारच्या कपड्यांवर केली जाते. अबू आणि संदीप यांच्या मते सम्राट अकबराने ज़रदोज़ीला राजेशाही पोशाखाचा भाग म्हणून प्रोत्साहन दिले. ज़रदोज़ीच्या डिझाइन्समध्ये निसर्गातील फुले-झाडे आणि प्राणी यांचे अप्रतिम दर्शन घडते आणि सोन्या-चांदीच्या धाग्यांसह मोती, मणी, सिक्विन्स आणि मौल्यवान दगडांचा वापर करून ती तयार केली जाते. इतिहासात ज़रदोज़ी भरतकामाचा उपयोग राजदरबारातील भिंती, राजवाड्यांचे तंबू, कोर्टरूम्स, तलवारींची म्यान, भिंतींवरील पडदे, तसेच राजवटीतील घोडे आणि हत्तींच्या सजावटीसाठी केला जात असे.

ज़रदोज़ीची विकास यात्रा

सुरुवातीला ज़रदोज़ी कारागीर खऱ्या सोन्या-चांदीच्या धाग्यांसह मोती आणि मौल्यवान दगडांचा वापर करत, असे दिवानी कुट्युरच्या सान्या धीर यांनी सांगितले. धीर या कलेच्या संवर्धनाचे काम करतात. ही भरतकामाची परंपरा वैभव आणि प्रतिष्ठेचे प्रतीक ठरली होती तसेच या कलेने सम्राट व राजघराण्यांच्या पोशाखांचे सौंदर्य वाढवले, असे डिझायनर अर्चना जाजू यांनी सांगितले. काळानुसार, ज़रदोज़ीने बदलत्या आवडीनुसार स्वतःला जुळवून घेतले. नवीन साहित्य आणि डिझाइन्स आत्मसात केली आणि अधिक आकर्षक होत गेली. ज़रदोज़ी ही केवळ भरतकामाची कला नाही, तर भारतीय वस्त्र परंपरेतील एक अमूल्य वारसा आहे, ज्याने भारतीय इतिहासात वैभवशाली पान लिहिले आहे.

अधिक वाचा: History of Ikat: इजिप्तच्या पिरॅमिडमध्ये भारतीय कापड; काय सांगते इकतची प्राचीन परंपरा?

ज़रदोज़ी कशी तयार केली जाते आणि तिच्या निर्मितीतील आव्हाने काय आहेत?

ज़रदोज़ी निर्मिती प्रक्रिया: ज़रदोज़ी भरतकाम ही अत्यंत श्रमप्रधान प्रक्रिया आहे, ज्यामध्ये बारकाईने काम करणे आणि तपशीलांकडे लक्ष देणे गरजेचे असते. ही प्रक्रिया पुढीलप्रमाणे असते:

डिझाईन निवडणे आणि रेखाटन:

डिझाईनची निवड केल्यानंतर ती कापडावर तात्पुरत्या खुणांच्या माध्यमातून (चॉक किंवा पाण्यात विरघळणाऱ्या शाईने) रेखाटली जाते.

भरतकाम सुरू करणे:

कुशल कारागीर, ज्यांना ‘कारिगर’ म्हणतात, डिझाईनची बाह्यरेषा सूक्ष्म सुई आणि सोन्या किंवा चांदीच्या धाग्यांनी काढतात. ही बाह्यरेषा पुढील सजावटींसाठी पाया तयार करते.

सजावट प्रक्रिया:

डिझाईनमधील जागा भरण्यासाठी मेटालिक धागे, मणी, सिक्विन्स, आणि कधीकधी मौल्यवान दगड वापरले जातात.

विशेष टाक्यांचा वापर:

सॅटिन स्टिच, चेन स्टिच, आणि कौचिंग सारख्या विशेष टाक्यांचा उपयोग करून भरतकामात पोत आणि खोली निर्माण केली जाते. हा टप्पा भरतकामाला त्याचे बारकावे आणि आकर्षकता प्रदान करतो.

प्रत्येक घटक थरावर थर चढवून तयार करणे:

कारिगर अत्यंत संयमाने आणि कौशल्याने प्रत्येक घटक व्यवस्थितपणे जोडतात, जेणेकरून अपेक्षित सौंदर्य निर्माण होईल.

वेळ आणि प्रयत्न:

डिझाईनच्या गुंतागुंतीनुसार आणि कपड्याच्या आकारानुसार ज़रदोज़ी तयार करायला काही दिवसांपासून ते काही महिन्यांपर्यंत वेळ लागू शकतो. मोठ्या किंवा अधिक विस्तृत तुकड्यांसाठी अनेक कारागीर एकत्रित काम करतात.

Drawing of Delhi gold embroiderers at work in 1870, by John Lockwood Kipling
विकिपीडिया

ज़रदोज़ी तयार करण्यातील आव्हाने:

कुशलतेची गरज:

ज़रदोज़ी ही एक अत्यंत बारकाईने केली जाणारी कला आहे, ज्यासाठी कौशल्य आणि बारकाईने लक्ष हवे. अर्चना जाजू यांच्या मते, “ही कला इतकी जटिल आहे की तंत्र शिकण्यासाठी वेळ आणि सराव आवश्यक आहे.”

धातूचे धागे आणि नाजूक साहित्य:

सोन्या-चांदीच्या धाग्यांसह नाजूक साहित्य वापरणे आव्हानात्मक ठरते. धागा तुटण्याची किंवा साहित्य खराब होण्याची शक्यता असल्याने ते हाताळताना खूप काळजी घ्यावी लागते.

साहित्य खरेदीची अडचण:

उच्च दर्जाचे आणि अस्सल साहित्य मिळवणे कधी कधी कठीण ठरते. उत्कृष्ट दर्जाच्या कामासाठी गुणवत्तेवर तडजोड करता येत नाही.

वेळखाऊ प्रक्रिया:

विशेषतः गुंतागुंतीच्या डिझाईन्ससाठी ज़रदोज़ी तयार करणे खूप वेळखाऊ आहे.

सकारात्मकता:

सर्व आव्हानांनंतरही, ज़रदोज़ीची सौंदर्यपूर्णता आणि सांस्कृतिक महत्त्व या कलेला प्रोत्साहन देणारे आहेत. जाजू यांच्या मते, ज़रदोज़ी ही प्रतिष्ठा आणि वैभवाचे प्रतीक आहे, ती सम्राटांपासून ते आजच्या फॅशनपर्यंत पोहोचली आहे. आव्हाने असली तरी ही कला साध्य करणे खूप समाधानकारक आहे.

अधिक वाचा: History of Bandhani: सिंधू संस्कृती ते अजिंठा; पाचहजार वर्षांच्या बांधणी-गाठी उलगडतात तेव्हा!

एक नाजूक वारसा धोक्यात:

अबू-संदीप, ज्यांनी १९८० च्या दशकात आपल्या प्रवासाची सुरुवात केली, त्यांच्या मते, तो काळ निराशाजनक होता. बाजार दर्जाहीन आणि सर्जनशीलतेचा अभाव असलेल्या स्वस्त ज़रदोज़ीने भरला होता. त्यांनी सांगितले की, बाजारातील बनावट ज़रदोज़ीमुळे त्यांची सुरुवात कठीण होती. नजाकत आणि कल्पकतेचा अभाव असलेल्या व अनघड टाक्यांनी एकेकाळी राजेशाही असलेल्या या कलेला साधारण दर्जाचे ठरवले गेले. आम्ही त्या चळवळीचा भाग होतो ज्याने ज़रदोज़ीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी स्वतःला समर्पित केले,” असे त्यांनी सांगितले.

बनावट ज़रदोज़ी कशी ओळखावी?

हस्तनिर्मित ज़रदोज़ीची गुणवत्ता:

ज़रदोज़ी हाताने तयार केली जाते आणि तिच्यासाठी उच्च दर्जाचे धातूचे धागे वापरले जातात, असे शांती बनारसचे क्रिएटिव्ह डायरेक्टर खुशी शाह सांगतात. बनावट ज़रदोज़ी जास्त एकसंध दिसते आणि तिच्यात बारकावे कमी असतात.

तपशील आणि असमानतेचा शोध:

अस्सल ज़रदोज़ीमध्ये हलकीशी असमानता असते, जी तिच्या कलेचे वैशिष्ट्य ठरते. बनावट झरदोसी मशीनद्वारे तयार केली जाते, ज्यामुळे ती जास्त एकसंध आणि कमी तपशीलवार असते. म्हणूनच भरतकामाच्या मागील बाजूची तपासणी करा.

विश्वासार्ह ब्रँड्स आणि विक्रेत्यांकडून खरेदी:

विश्वासार्ह ब्रँड्स किंवा कारागीर संस्थांकडून खरेदी केल्यास बनावट ज़रदोज़ी खरेदी करण्याचा धोका कमी होतो.

मूलभूत साहित्य आणि टिकाऊपणा:

प्राध्यापक वर्गीस यांनी स्पष्ट केले की, अस्सल झरदोसीची वैशिष्ट्ये म्हणजे तिचे सूक्ष्म, तपशीलवार भरतकाम आणि उच्च दर्जाचे साहित्य, जसे की अस्सल धातूचे धागे आणि सजावट, जे कालांतराने जुने होऊ शकते पण खराब होत नाहीत.

ग्राहक म्हणून आपण काय करू शकता?

दिवानी कुट्युरच्या सान्या धीर यांच्या मते, मोठे बदल घडवणे महत्त्वाचे आहेच, परंतु लहान पावले देखील मोठा परिणाम करू शकतात. आपल्या आजीच्या जुन्या वस्त्रसंपदेला नवीन रूप देणे, आपल्या आईच्या साड्या पुन्हा परिधान करणे किंवा तिच्या लग्नातील पोशाखाला पुन्हा जिवंत करणे अशा लहान गोष्टींनी सुरुवात करू शकता. अशा लोकांकडून खरेदी करा, जे या कलेचा आदर करतात आणि तिचा प्रचार करतात. आपल्या आसपासच्या लोकांमध्ये या कलेविषयी जागृती करा. धीर म्हणतात, “एखाद्या कलेचे संवर्धन करणे हा एक दीर्घ प्रवास आहे; तो कधीच थांबत नाही. ज़रदोज़ीसारख्या कलेला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न आणि परिश्रम सातत्याने करावे लागतात.” स्वस्त, मशीनवर तयार केलेल्या ज़रदोज़ीला नकार द्या. ज़रदोज़ी ही एक नाजूक आणि राजेशाही परंपरा आहे. तिच्या अस्सलतेचे रक्षण करणे हे या कलेच्या वारशाचे संवर्धन करण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

अधिक वाचा: Harappa ‘या’ उत्खननात सापडले, ४००० वर्षे प्राचीन भारतीय मल्टिग्रेन हाय प्रोटिन डाएट लाडू! संशोधन काय सांगते?

इतिहास जपणे:

पूर्वी ज़रदोज़ीत खऱ्या सोन्या-चांदीच्या धाग्यांचा वापर होत असे. आज तांब्याच्या तारांना सोन्या-चांदीच्या पॉलिशने लेप दिला जातो, ज्यामुळे खर्च आणि वजन कमी झाले आहे. तरीही, ज़रदोज़ी ही कलेची एक महागडी पद्धत आहे कारण हाताने तयार करण्यासाठी लागणारा वेळ आणि बारकावे यासाठी कौशल्य लागते. शांती बनारसच्या खुशी शाह सुचवतात की, अस्सल, हस्तनिर्मित झरदोसी उत्पादनांना पाठिंबा द्या आणि अशा ब्रँड्सकडून खरेदी करा जे कारागीरांना प्रोत्साहन देतात. अबू आणि संदीप यांचे म्हणणे आहे की, ग्राहकांनी या कलेला स्वीकारले पाहिजे आणि कारागीरांना प्रोत्साहन दिले पाहिजे. “गेल्या काही वर्षांत बाजारात मशीन आणि संगणकावर तयार केलेल्या भरतकामाने मोठ्या प्रमाणात भर घातली आहे. आपण या कलेच्या खऱ्या मूल्यमापनासाठी जबाबदार आहोत. या कला आपली राष्ट्रीय ठेव आहेत, आणि त्यांचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.