पावसाने उष्णतेपासून दिलासा दिला असला तरी आता भारतावर एक नवीन विषाणूचे संकट निर्माण झाले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे साचलेल्या पाण्याने आणि ओलसर वातावरणामुळे भारतात झिका विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. झिका विषाणू प्रामुख्याने आफ्रिका, अमेरिका, दक्षिण आशिया आणि पश्चिम पॅसिफिकच्या उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये आढळून आला होता. २०१६ मध्ये पहिल्यांदाच भारतात गुजरातमध्ये झिकाचे रुग्ण आढळून आले होते. तेव्हापासून विविध राज्यांमध्ये या विषाणूचा उद्रेक दिसून आला.
आता या विषाणूने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. अलीकडील प्रकरणे देशातील विविध राज्यांमध्ये नोंदवली गेली आहेत. महाराष्ट्र आणि केरळमध्ये मोठ्या संख्येने याचे रुग्ण आढळून आले आहेत, तर हा विषाणू आता कर्नाटकातही पसरला आहे. परंतु, झिका विषाणूचा सर्वाधिक धोका कोणाला आहे? तुम्ही स्वतःचे संरक्षण कसे करू शकता? हा विषाणू किती धोकादायक आहे? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
झिकाचे संक्रमण कसे होते?
यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार झिका विषाणू प्रामुख्याने डास चावणे, रक्त संक्रमण, शारीरिक संबंध आणि मातांकडून त्यांच्या बाळांना स्तनपानाद्वारे प्रसारित होतो. एडिस प्रजातीच्या डासांमुळे पसरणाऱ्या संसर्गामुळे डेंग्यू आणि चिकनगुनियाचे विषाणूही पसरतात. जागतिक आरोग्य संघटनेने चेतावणी दिली आहे की, झिका विषाणू विशेषतः गर्भवती महिलांसाठी धोकादायक आहे. हा संसर्ग गर्भापर्यंत पोहोचू शकतो, ज्यामुळे मायक्रोसेफलीसारखे गंभीर जन्मदोष उद्भवतात. त्यामुळे लहान डोके आणि अविकसित मेंदू असलेली मुले जन्माला येतात.
या विषाणूचा संसर्ग गर्भापर्यंत पोहोचल्यास मृत बाळ, गर्भाला हानी आणि वेळेपूर्वी बाळ जन्माला येऊ शकते. प्रौढ आणि मोठ्या मुलांमध्ये झिका विषाणूच्या संसर्गामुळे ‘गुइलेन-बॅरे सिंड्रोम’ नावाचे न्यूरोलॉजिकल विकार होऊ शकतात; ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारकशक्ती कामुकवत होते, पेशींना नुकसान पोहोचते आणि त्यामुळे स्नायू कमकुवत होतात आणि कधीकधी लकवाही मारू शकते. झिका विषाणूमुळे न्यूरोपॅथी आणि मायलाइटिस (पाठीच्या कण्याला त्रास) देखील होऊ शकतो.
भारतातील वाढती प्रकरणे
अलीकडे, महाराष्ट्रातील पुण्यात झिका विषाणूच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे, सहा गर्भवती महिलांसह सुमारे १२ लोकांना झिकाची लागण झाली आहे. नागरी आरोग्य विभागाने ५० हून अधिक खाजगी रुग्णालयांची बैठक बोलावली आणि त्यांना झिका विषाणूची कोणतीही संशयित लक्षणे कळवण्याचे निर्देश दिले आहेत. पुणे महानगरपालिकेचे (पीएमसी) सहाय्यक मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, “झिका आणि इतर वेक्टर-जनित आजारांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आम्ही रुग्णालयांना काही पोस्टर्स प्रदर्शित करण्याचेही आवाहन केले आहे.
पीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, झिका विषाणूचा संशय असलेल्या गर्भवती महिलांचे ८३ नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडे पाठवण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील संगमनेर आणि कोल्हापूर येथे इतर प्रकरणे नोंदवली गेली आहेत. केरळमध्ये आरोग्य अधिकाऱ्यांनी २ जुलैपर्यंत झिका विषाणूची १४ प्रकरणे नोंदवली आहेत; ज्यात २४ वर्षीय गर्भवती महिलेचा समावेश आहे. आता वाढत्या संकटामुळे राज्यभर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कर्नाटकच्या शिवमोग्गा जिल्ह्यात परिस्थितीने गंभीर वळण घेतले आहे. झिका विषाणूमुळे येथे ७४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, प्रकरणांमध्ये वाढ होत असताना, कोलकातातील अनेक खाजगी रुग्णालयांनी झिका व्हायरससाठी अलर्ट जारी केला आहे.
केंद्राकडून यासाठी कोणती पावले उचलण्यात आली आहेत?
झिका विषाणूने देशभरात आपली पकड घट्ट केली असताना, केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. केंद्राकडून करण्यात आलेल्या आवाहनांमध्ये गर्भवती महिलांची तपासणी करणे आणि पॉझिटिव्ह आढळलेल्या महिलांच्या गर्भाची चाचणी करणे यावर विशेष भर देण्यात आला आहे. परिसर एडिस डासांपासून मुक्त ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याचेही यात म्हटले आहे. निवासी क्षेत्रे, कामाची ठिकाणे, शाळा, बांधकाम क्षेत्र, संस्थेतील आरोग्य सुविधांमध्ये अधिक लक्ष देण्याच्या सूचनाही राज्यांना देण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त, आढळलेल्या कोणत्याही प्रकरणांची इंटिग्रेटेड डिसीज सरव्हायलन्स प्रोग्राम (आयडीएसपी) आणि नॅशनल सेंटर फॉर वेक्टर बोर्न डिसीजेस कंट्रोल (NCVBDC) कडे त्वरित तक्रार करणे आवश्यक आहे.
झिका विषाणूची लक्षणे कोणती?
कोलकात्याच्या चारनॉक हॉस्पिटलमधील आपत्कालीन विभागाचे प्रमुख डॉ. निशांत अग्रवाल यांच्या मते, झिका विषाणूची लागण झालेल्यांपैकी बहुतेकांना कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, असे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे. ज्यांना लक्षणे दिसून येतात, ते सामान्यत: संसर्गानंतर तीन ते १४ दिवसांनी दिसतात आणि सामान्यतः ही लक्षणे सौम्य असतात, असे ते म्हणाले.
यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने केलेली लक्षणांची यादी :
-ताप
-पुरळ
-डोकेदुखी
-सांधे दुखी
-डोळे लाल होणे
-स्नायू दुखणे
पीअरलेस हॉस्पिटलचे अंतर्गत औषध सल्लागार डॉ. अजय कृष्ण सरकार यांच्या मते, ही लक्षणे डेंग्यूच्या लक्षणांसारखी असली तरी झिका विषाणू अधिक धोकादायक मानला जातो. “झिकाचा उद्रेक झाल्यास, रुग्णांना ओळखणे कठीण होऊ शकते. त्यामुळे ही लक्षणे असलेल्या सर्व रूग्णांची तपासणी करण्याची आमची योजना आहे,” असे त्यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला सांगितले. झिकाचा उपचार, डेंग्यूप्रमाणेच आहे. “विषाणूसाठी विशिष्ट औषध नाही. रुग्णांना ताप आणि वेदना दूर करण्यासाठी पॅरासिटामॉलची आवश्यकता असते. यात डेंग्यूप्रमाणेच रक्तदाब, हृदय गती आणि महत्त्वाच्या अवयवांचे कार्य यासारख्या बाबींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे,” असे डॉ. साहा यांनी सांगितले.
स्वतःला सुरक्षित कसे ठेवायचे?
झिका प्रकरणांमध्ये होणारी वाढ निश्चितच चिंतेचे कारण आहे, विशेषतः गर्भवती महिलांसाठी. विषाणूच्या संसर्गाचा धोका लक्षणीयरीत्या कमी करण्याचे अनेक मार्ग आहेत. या विषाणूपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सतर्क राहणे आणि सार्वजनिक आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे.
हेही वाचा : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आता चहाही महागणार? कारण काय?
मार्गदर्शक तत्वांमध्ये काय?
-दारे आणि खिडक्या बंद ठेवा, विशेषत: डासांचा प्रादुर्भाव असलेल्या भागात.
-पूर्ण बाह्यांचे कपडे घाला, विशेषतः घराबाहेर जाताना.
-घरे, शाळा आणि रुग्णालयांभोवती असणार्या फुलांच्या कुंड्या आणि झाडांमध्ये साचलेले पाणी काढा
-बाहेरचे अन्न टाळा
-तुमचे घर आणि घरातील जागा हवेशीर असल्याची खात्री करा.
-नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा, विशेषत: बाहेर पडल्यानंतर.
-तुमची रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
-स्वच्छता राखा आणि वारंवार हात धुवा.
-विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शारीरिक संबंधादरम्यान कंडोमचा वापर करा.