माझं काम बऱ्यापैकी फिरतीचं असतं. त्यामुळे दिवसभर केस सांभाळणं कठीण जातं. त्यात कित्येकदा घामामुळे केस गुंतणे, चिकट होणे नेहमीचे आहे. माझे केस मध्यम उंचीचे आहेत. मी सुटसुटीत पण सुंदर दिसतील अशा कोणत्या हेअरस्टाइल कॅरी करू शकते?
– रुचिरा तांडेल, २१.
कॉलेजमध्ये असताना वेगवेगळ्या हेअरस्टाइल्स करून मिरवणं कित्येकींना आवडतं, पण एकदा नोकरी सुरू झाली की हे सगळं मागे पडतं. रुचिरा तुझ्यासोबत पण तसंच होतंय ना. विशेषत: तुझ्यासारख्या फिरतीचं काम असलेल्यांना हेअरस्टाइलकडे लक्ष देण्याचा वेळ बिलकूल मिळत नाही. मग इच्छा नसतानाही कंटाळवाणा वाटणारा पोनीटेल घालावा लागतो. पण रुचिरा, याच कंटाळवाण्या पोनीटेलला थोडा तुझा टच देऊन तू छान हेअरस्टाइल्स करू शकतेस. त्यासाठी सगळ्यात सोप्पं म्हणजे तू तुझं हेअर बो, बटरफ्लाय क्लिप्सचं कलेक्शन वाढव. तुझे पोनीटेल आपसूक आकर्षक दिसतील. बरं पोनीटेलमध्ये पण किती तरी प्रकार आहेत. हाय पोनीटेल, लो पोनीटेल, एका बाजूला घेतलेला पोनीटेल, क्लीन लुक पोनीटेल, मेसी लुक पोनीटेल. सोबत छोटा स्कार्फ, रिबीन बांधूनसुद्धा त्याचं लुक बदलता येतं. तुझे केस मध्यम उंचीचे आहेत त्यामुळे वेणी बांधायच्या फंदात सध्या तरी पडू नकोस. कधी तरी केसाचा बन बांधायला पण हरकत नाही. तुझ्या केसांना फ्लिक्स असतील तर त्याने तुझी हेअरस्टाइल अजूनच खुलून दिसेल. त्यामुळे प्रयोग करायला मागे-पुढे पाहू नकोस.
माझे खांदे रुंद आहेत, त्यामुळे काही कपडय़ांमध्ये मी जाड दिसते. माझी उंची ५.३ आहे. मी कोणत्या स्टाइलचे कपडे घातल्यास जाड दिसणार नाही?
– मीनल राव, २१.
मीनल, खांदे रुंद असलेल्यांना हा प्रश्न नेहमीच सतावतो. खांद्यांचा भाग सर्वाधिक फोकसमध्ये येतो. त्यामुळे तो जाड वाटला, की आपण जाड वाटायला लागतो. हे टाळण्यासाठी काही ट्रिक्स तुला वापरायला लागतील. सर्वप्रथम तुझ्या कपडय़ांच्या गळ्यांकडे लक्ष दे. प्लन्जिंग नेकलाइन म्हणजेच झुकलेल्या गळ्यांचे कपडे घालणे टाळ. नेकलाइन जितकी मोठी तितकी तुझी बॉडी अजून जाड वाटेल. त्यामुळे शक्यतो बोटनेक, गोल गळा, शर्ट कॉलर, चायनीज कॉलर तुला शोभून दिसतील. तुझ्या शरीरयष्टीवर शर्ट्स छान खुलून दिसतील, त्यामुळे ते नक्की वापर. गळ्याभोवती एम्ब्रॉयडरी, डिटेलिंग असलेले कपडे टाळ. तसेच तुझी उंची छान आहे, त्यामुळे तुझ्या ड्रेसिंगचा फोकस पायांवर टाकायचा प्रयत्न कर. त्यासाठी नॅरो फिट जीन्स, स्कर्ट्स, प्रिंटेड लेगिंग्स वापर. यामुळे खांद्यांवरचा फोकस कमी होईल.
आवाहनफॅशनच्या संदर्भात तुमचे काही प्रश्न, शंका असल्यास जरूर पाठवा किंवा ‘लोकप्रभा’ला ई-मेल पाठवा. पाकिटावर किंवा ई-मेलच्या विषय रकान्यात ‘फॅशन पॅशन’ असा उल्लेख करावा.
मृणाल भगत – response.lokprabha@expressindia.com