मला घडय़ाळ घालायला खूप आवडते. ऑफिस, पार्टी, गेटटूगेदर अशा वेगवेगळ्या वेळी योग्य घडय़ाळ कसे निवडावे? तसेच घडय़ाळासोबत इतर अ‍ॅक्सेसरीज स्टाइल करता येतील?
– भावना पंडित, २३.

– घडय़ाळ दिसायला एक साधीशी अ‍ॅक्सेसरी वाटत असली, तरी योग्य रीतीने स्टायलिंग केल्यास ती इतर सर्व अ‍ॅक्सेसरीजना पुरून उरते. फॉर्मल लुकमध्ये तर घडय़ाळ महत्त्वाची अ‍ॅक्सेसरी असते. त्यासाठी पर्यायपण पुष्कळ आहे. सध्या मोठय़ा डायलची घडय़ाळे ट्रेंडमध्ये आहेत. अगदी मेन्स कलेक्शनमधलेही एखादे मोठय़ा डायलचे घडय़ाळ ट्राय करू शकतेस. मेटल किंवा लेदर स्ट्रॅप, सिंपल डायलची घडय़ाळे तुला ऑफिसमध्ये वापरता येतील. बेसिक काळ्या किंवा सफेद रंगाऐवजी नेव्ही, हिरवा, मरून, मस्टड यलो रंगाचे स्ट्रॅप वापरून पाहा. मेटलमध्ये सध्या रोझ गोल्ड, स्टील आणि गोल्डच्या कॉम्बिनेशनची घडय़ाळे ट्रेंडमध्ये आहेत. पार्टी किंवा इनफॉर्मल कार्यक्रमांसाठी थोडी फंकी, एक्स्पिरीमेंटल घडय़ाळे ट्राय करायला हरकत नाही. लहान डायलचे घडय़ाळ कडे किंवा ब्रेसलेटसोबत पेअर करता येऊ  शकते. सध्या हा फुल ट्रेंडमध्ये आहे. त्याच्यासोबतसुद्धा घडय़ाळ घालू शकतेस. घडय़ाळासोबत अंगठीची जोडी हिट आहे. वेगवेगळ्या आकाराच्या; पण एकाच रंगाच्या अंगठय़ा आणि त्याच रंगाचे घडय़ाळ घालू शकतेस. एकाच वेळी दोन वेगवेगळी घडय़ाळेसुद्धा घालून बघ. लुकला ट्विस्ट मिळतो.

सध्या मेटॅलिक टॅटूज पाहायला मिळतात. हे वापरायचे कसे?
– माधुरी काणे, १९.

– मेटॅलिक टॅटूजचा ट्रेंड आला तो हॉलीवूड स्टार्स आणि पॉप सिंगर्समुळे. हे टॅटूज दिसायला जितके कूल दिसतात, तितकेच ते वापरायला सोपे असतात. त्यामुळे ते लगेचच प्रसिद्ध झाले. जर तुला ज्वेलरी वापरायला आवडत नसेल किंवा त्यांच्यासाठी एक छानसा पर्याय हवा असेल तर हे टॅटूज नक्की वापरून बघ. शक्यतो, नेकपीस, कडा, बाजूबंद, कमरबंद, हातफुल, अंगठीच्या आकारात हे टॅटूज पाहायला मिळतात. तसेच पिसे, मोर, पोपट, हत्ती, वाघ, भौमितिक आकार, फुले, अशा विविध आकारांतील टॅटूजसुद्धा प्रसिद्ध आहेत. गोल्ड, सिल्व्हर, पांढऱ्या, निळ्या रंगातील टॅटूज प्रसिद्ध आहेत. मल्टी कलर टॅटूजसुद्धा पाहायला मिळतात. एकाच वेळी वेगवेगळे टॅटू वापरून मस्त ट्रायबल लुक मिळतो. रोज कॉलेजला जाताना किंवा पार्टीसाठी हे टॅटूज उत्तम आहेतच, पण योग्य पद्धतीने वापरल्यास पारंपरिक कार्यक्रमालासुद्धा वापरता येतात.

आवाहनफॅशनच्या संदर्भात तुमचे काही प्रश्न, शंका असल्यास जरूर पाठवा किंवा ‘लोकप्रभा’ला ई-मेल पाठवा. पाकिटावर किंवा ई-मेलच्या विषय रकान्यात ‘फॅशन पॅशन’ असा उल्लेख करावा.

मृणाल भगत – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader