ब्राझील म्हटलं की एकच गोष्ट डोळ्यासमोर येतो तो फुटबॉल..आणि फुटबॉल म्हटलं की डोळ्यासमोर नावं येतात ती पेले, गारिन्चा, वावा, झिको, डुंगा, रोमारियो, सॉक्रेटिस, रोनाल्डो, रिवाल्डो, रोनाल्डिनियो आणि काफू यांच्यासारख्या अनेक फुटबॉलवीरांची.. कारण फुटबॉल हा ब्राझीलच्या या महान खेळाडूंशिवाय पूर्णच होऊ शकत नाही.

ब्राझीलमध्ये एक फेमस वाक्य बोललं जातं ते म्हणजे, फुटबॉलसाठी तुमचं आयुष्य फुकट घालवू नका, कारण तो तुमच्या आयुष्यापेक्षा खूप मोठा आहे. पण याच ब्राझीलच्या सिंहासनाला फिफा विश्वचषकात पुन्हा एकदा धक्का बसला..फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमनं ब्राझीलचं कडवं आव्हान 2-1 असं मोडून काढलं. त्यामुळे ब्राझीलला पुन्हा एकदा रिकाम्या हातांनी मायदेशी परतावं लागलं. एक काळ असा होता की जेव्हा ब्राझीलनं अवघ्या फुटबॉलविश्वावर आपली सत्ता गाजवली. ब्राझीलला हरवणं हे जगातल्या भल्याभल्या संघांच्या आवाक्याबाहेरचं होतं. 1958 ते 1970 आणि 1994 ते 2002 हा ब्राझीलच्या फुटबॉल इतिहासातला सुवर्णकाळ मानला जातो. याच काळात ब्राझीलनं फुटबॉलविश्वावर आपल्या कामगिरीची मोहोर उमटवली. असं म्हणतात की ब्राझीलियन खेळाडूंनी फुटबॉलला गोल्डन टच देण्याच काम केलंय. पण आज ब्राझीलचा तोच गोल्डन टच कुठंतरी हरवत चालल्याचं दिसतंय.

ब्राझीलचा संघ हा 1930 सालापासून आजवर झालेल्या प्रत्येक म्हणजेच 20 विश्वचषकात खेळला आहे. त्यात सर्वाधिक पाचवेळा ब्राझीलनं वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान मिळवलाय. ब्राझीलनं 1958, 1962, 1970, 1994 आणि 2002 साली फिफा विश्वचषकावर आपलं नाव कोरलंय. फिफा विश्वचषकाशिवाय ब्राझीलनं आठवेळा कोपा अमेरिका जिंकण्याचा पराक्रम गाजवलाय. ब्राझीलला अखेरचं मोठं यश मिळालं ते 2007च्या कोपा अमेरिकात ..पण त्यानंतर ब्राझीलला आजवर एकही मोठी स्पर्धा जिंकता आलेली नाही. 2006 आणि 2010च्या विश्वचषकात ब्राझीलचं आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आलं होतं. तर 2014च्या विश्वचषकात ब्राझीलनं उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. त्या विश्वचषकात ब्राझीलला जर्मनीकडून 1-7 असा मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागला होता. त्या पराभवाच्या जखमा पूर्णपणे भरुनही निघाल्या नव्हत्या, त्याचवेळी ब्राझीलला 2015च्या कोपा अमेरिकात उपांत्यपूर्व फेरीत पॅराग्वेकडून हार पत्करावी लागली होती. 2016च्या कोपा अमेरिका स्पर्धेत तर ब्राझीलला साखळी फेरीतूनच आपला गाशा गुंडाळावा लागला. एकेकाळी अव्वल स्थानावर चिटकून असलेला ब्राझीलचा संघ आता दुसऱ्या स्थानावर आहे. जुलै 2010 सालानंतर ब्राझीलला एप्रिल 2017 साली अव्वल स्थान गाठता आलं होतं. फुटबॉलविश्वात अनेक स्टार शिलेदार ब्राझीलच्या क्षीतिजावर उदयास आले. पण याच ब्राझीलच्या संघात सध्या वर्ल्ड क्लास खेळाडूंची वाणवा जाणवतेय. एक काळ असा होता की ब्राझीलच्या एकाच संघात रोनाल्डो, रिवाल्डो, रोबेर्टो कार्लोस आणि रोनाल्डिनियोसारखे रथीमहारथी होते. त्यांच्यात कोणत्याही संघाला चारीमुंड्या चीत करण्याची ताकद होती. मात्र हे सर्व खेळाडू निवृत्त झाल्यानंतर ब्राझीलच्या संघाला गळती लागली. सध्या नेमारचा अपवाद वगळता ब्राझीलच्या संघात एकही असा खेळाडू नाहीय ज्याच्यात प्रतिस्पर्धी संघांवर हावी होण्याची ताकद आहे. पण यंदाच्या विश्वचषकातही त्याला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. बोटावर मोजता येईल इतक्याच ब्राझीलियन खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा अनुभव आहे. नेमारचं अपयश ब्राझीलच्या मुळावर?

विश्वचषकात ब्राझीलला सर्वात जास्त अपेक्षा होत्या त्या नेमारकडून. पण नेमार या संपूर्ण विश्वचषकात खेळापेक्षा दिखावाच जास्त करत असल्याचं जाणवत होतं. त्यासाठी सोशल मीडियावर तो ट्रोलही झाला. नेमारला विश्वचषकाच्या पाच सामन्यांत केवळ दोनच गोल करता आले. पण विश्वचषकादरम्यान नेमारनं तीनवेळा आपली हेयरस्टाईल बदली केली. इतकच नाही तर मेक्सिको आणि बेल्जियमविरुद्ध सामन्यात नेमारनं जाणूनबुझून डाईव्ह मारण्यापेक्षा खेळावर अधिक लक्ष दिलं असतं तर ब्राझिलचा संघ उपांत्य फेरीत दिसला असता. नेमार हा एक गुणी खेळाडू आहे यात काही वाद नाही. पण हेच गुणी खेळाडू मोक्याच्या क्षणी माती खातात याला इतिहासही साक्षीदार आहे. ब्राझील, अर्जेन्टिना, उरुग्वे हे दक्षिण अमेरिकेतले बलाढ्य संघ आहेत. पण या तिघांचंही आव्हान संपुष्टात आल्यानं फिफा विश्वचषकात पुन्हा एकदा युरोपचं वर्चस्व सिद्ध झालं. 1990नंतर म्हणजेच गेल्या 28 वर्षांत दक्षिण अमेरिकेतल्या केवळ एकाच संघाला म्हणजेच ब्राझीलचा फिफा विश्वचषक जिंकता आला आहे. त्यामुळे फुटबॉलवेड्या दक्षिण अमेरिकन देशांना लागलेली ही उतरती कळा खरोखरंच विचार करण्यासारखी आहे.

vijay.majha@gmail.com
यावर तुमच्या प्रतिक्रिया कळवा

Story img Loader