जपानचा संघ बेल्जियमविरुद्धच्या लढतीसाठी सज्ज

रोस्तोव ऑन डॉन : यंदाच्या विश्वचषकात अपराजित राहतानाच सर्वाधिक गोल झळकावलेल्या बेल्जिअमच्या संघाला पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत पोहोचून इतिहास घडवणार, की बाद फेरीच्या पहिल्याच सामन्यात पराभूत होऊन ‘सायोनारा’ करत मायदेशी परतणार, हे जपानच्या मंगळवारी होणाऱ्या लढतीत स्पष्ट होईल.

बेल्जियमने साखळी फेरीत पनामा, टय़ुनिशिया आणि इंग्लंड या तिन्ही संघांना पराभूत करताना तब्बल ९ गोल लगावले आहेत. त्यात विश्वचषकात आतापर्यंत चार गोल केलेला आक्रमक रोमेलू लुकाकूचे योगदान महत्त्वाचे आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात दुखापतीमुळे खेळू न शकलेला लुकाकू तंदुरुस्त होऊन पुन्हा परतला असल्याने बेल्जियमची बाजू अधिक भक्कम झाली आहे. बेल्जियमचा संघ १९८६ साली म्हणजे तब्बल ३२ वर्षांपूर्वी उपांत्य फेरीपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाला होता. त्या विक्रमाच्या पुनरावृत्तीसह त्यापेक्षाही चमकदार कामगिरी करण्याच्या इराद्याने बेल्जियमचा संघ मैदानात उतरणार आहे.

दुसरीकडे चांगल्या खेळासह सुदैवाने मिळालेल्या बाद फेरीतील प्रवेशानंतर जपानचा संघ विजयासह उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. यापूर्वी जपानचा संघ केवळ २००२ आणि २०१० सालीच उपउपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचू शकला होता. जपानचे प्रशिक्षक अकिरो निशिनो यांनी संघाला गेल्या सामन्यातील घडामोडींवरील लक्ष हटवून केवळ बेल्जियमच्या सामन्यातील विजयावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले आहे, तर जपानचा कर्णधार माकोटो हासेबेने विजयासाठीच खेळणार असल्याचे म्हटले आहे.

हे तुम्हाला माहीत आहे?

* विश्वचषकात पाच वेळा दोन्ही संघ एकमेकांशी भिडले आहेत. यापैकी २ सामन्यांमध्ये जपानचा आणि एका सामन्यात बेल्जियमचा विजय झाला आहे, तर २ सामने बरोबरीत सुटले.

* बेल्जियमचा संघ सहा वेळा बाद फेरीपर्यंत पोहोचला आहे.

* बेल्जियमने तीन साखळी सामन्यांमध्ये सर्वाधिक नऊ गोल मारले आहेत.

संभाव्य संघ

बेल्जियम : थिबॉ कोरटॉइस, जॅन व्हेरटोनघेन, विन्सेंट कोम्पॅनी, टोबी अल्डरविएरलेड, अ‍ॅक्सल विटसेल, केव्हिन डे ब्रुयने, यानिक कॅरॅस्को, थॉमस मेयुनिअर, ड्राइस मेरटेन्स, एडेन हॅझार्ड आणि रोमेलू लुकाकू.

जपान : इजी कावाशिमा, हिरोकी सकाई, माया योशिदा, जेन शोजी, युटो नागाटोमो, माकोटो हसेबे, गाकू शिबासाकी, जेनकी हारागुची, शिंजी कागावा, ताकाशी इनुई, युया ओसाका.