FIFA World Cup 2018 BRA vs CRC : फिफा विश्वचषक स्पर्धेत आज ब्राझीलने कोस्टा रिकाचा २-० असा पराभव केला. ९० मिनिटाच्या नियमित वेळेत दोनही संघांना एकही गोल करता आला नाही. त्यामुळे यंदाच्या विश्वचषकातील गोलशून्य बरोबरीत सुटणारा हा पहिला सामना ठरणार, अशी शंका उपस्थित झाली होती. मात्र, नियमित वेळेनंतर देण्यात आलेल्या ६ मिनिटांच्या अतिरिक्त वेळेत पहिल्या मिनिटाला कुन्टिन्होने आणि शेवटच्या मिनिटाला नेमारने गोल करत ब्राझीलला लौकिकाला साजेसा विजय मिळवून दिला. नेमारचा हा कारकिर्दीतील ५६ वा गोल ठरला.
फिफा विश्वचषक स्पर्धेत आज इ गटात ब्राझील आणि कोस्टा रिका यांच्यात सामना रंगला. ब्राझीलचा पहिला सामना स्वित्झर्लंडशी बरोबरीत सुटला होता. त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्याच्या दृष्टीने ब्राझीलला त्यांना हा सामना जिंकणे आवश्यक होते. ५ वेळा विश्वविजेता असलेला ब्राझीलचा संघ आत्मविश्वासाने मैदानात उतरला आणि त्यांच्या आक्रमण फळीने कोस्टा रिकाच्या गोलपोस्टवर हल्ला चढवला. पण कोस्टा रिकाच्या गोलकिपरने पूर्वार्धातच नव्हे तर उत्तरार्धातही त्यांचे सर्व हल्ले समर्थपणे रोखले. त्यामुळे सामन्याच्या ९० मिनिटाच्या नियमित वेळेत दोनही संघांना एकही गोल करता आला नाही.
आतापर्यंत झालेल्या यंदाच्या विश्वचषकातील एकही सामना अद्याप गोलशून्य बरोबरीत सुटलेला नसल्याने असा बरोबरीत सुटणारा हा पहिला सामना ठरणार का, अशी शंका काही काळ उपस्थित झाली होती. तशातच, ८०व्या मिनिटाला ब्राझीलला मिळालेली पेनल्टी VAR मुळे रद्द करण्यात आली. त्यामुळे ब्राझीलचे नशीब त्यांना साथ देत नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र, नियमित वेळेनंतर ६ मिनिटांचा अतिरिक्त कालावधी देण्यात आला. या वेळेत पहिल्याच मिनिटाला कुन्टिन्होने गोल करत ब्राझीलला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यामुळे गोलशून्य बरोबरी राखणारा सामना ठरण्याची नामुष्की टळली. त्यानंतर शेवटच्या मिनिटाला अनुभवी नेमारने लौकिकाला साजेसा खेळ केला आणि ब्राझीलला २-० असा विजय मिळवून दिला.
नेमारचे ‘अब तक ५६’
ब्राझीलचा अनुभवी आक्रमक खेळाडू नेमार याच्यासाठी हा सामना महत्वाचा ठरला. नेमारने सामन्यातील अतिरिक्त वेळेच्या शेवटच्या मिनिटाला गोल करत कारकिर्दीतील ५६ वा गोल कमावला. या गोलबरोबरच नेमारने ब्राझीलची बाद फेरी गाठण्याची शक्यता वाढवली.
या विजयामुळे ब्राझीलचे इ गटात ४ गुण झाले असून काही काळासाठी ब्राझील गटात अव्वल राहणार आहे. आजच्या दिवसातील दुसरा सामना हा याच गटातील सर्बिया आणि स्वित्झर्लंड यांच्यात खेळण्यात येणार आहे. सर्बियाने हा सामना जिंकला तर सर्बिया गटात अव्वल स्थानी विराजमान होत बाद फेरीचे तिकीट मिळवू शकते.