FIFA World Cup 2018 BRA vs CRC : फिफा विश्वचषक स्पर्धेत आज इ गटात ब्राझील आणि कोस्टा रिका यांच्यात सामना रंगला. ब्राझीलचा पहिला सामना स्वित्झर्लंडशी बरोबरीत सुटला होता. त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्याच्या दृष्टीने ब्राझीलला हा सामना जिंकणे आवश्यक होते. ५ वेळा विश्वविजेता असलेला ब्राझीलचा संघ आत्मविश्वासाने मैदानात उतरला आणि त्यांच्या आक्रमण फळीने कोस्टा रिकाच्या गोलपोस्टवर हल्ला चढवला. पण कोस्टा रिकाच्या गोलकिपरने पूर्वार्धातच नव्हे तर उत्तरार्धातही त्यांचे सर्व हल्ले समर्थपणे रोखले. त्यामुळे सामन्याच्या ९० मिनिटाच्या नियमित वेळेत दोनही संघांना एकही गोल करता आला नाही.
पण नियमित वेळेनंतर देण्यात आलेल्या ६ मिनिटांच्या अतिरिक्त वेळेत पहिल्या मिनिटाला कुन्टिन्होने आणि शेवटच्या मिनिटाला नेमारने गोल करत ब्राझीलला लौकिकाला साजेसा विजय मिळवून दिला.
ब्राझीलचा अनुभवी आक्रमक खेळाडू नेमार याच्यासाठी हा सामना महत्वाचा ठरला. या सामन्यात नेमारने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ५६ वा गोल झळकावला. संपूर्ण सामन्यात नेमारने अनेकदा गोलपोस्टवर हल्ला चढवला. पण, त्याला त्याचे गोल मध्ये रूपांतर करता आले नाही. अखेर, सामन्यातील अतिरिक्त वेळेच्या शेवटच्या मिनिटाला त्याला ती संधी मिळाली. डग्लस कोस्टा याने पास केलेल्या फुटबॉलवर गोल केला. त्याने कारकिर्दीतील ५६ वा गोल कमावला. या गोलबरोबरच तो ब्राझीलचा तिसरा सर्वाधिक गोल मारणारा खेळाडू ठरला आहे.
56 – Neymar is now the outright third top goalscorer for Brazil, trailing only Pelé (77) and Ronaldo (62). Icon.#BRACRC #BRA #WorldCup pic.twitter.com/jrydQyiDoS
— OptaJoe (@OptaJoe) June 22, 2018
या यादीत महान खेळाडू पेले हा ७७ गोलसह पहिल्या स्थानी, तर रोनाल्डो लुईझ नाझारिओ डी लिमा हा ६२ गोलसह दुसऱ्या स्थानावर आहे. नेमार आणि रोनाल्डोमध्ये केवळ ६ गोलचे अंतर आहे. सध्याचा नेमारचा फॉर्म पाहता लवकरच तो रोनाल्डोचा विक्रम मोडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
रोनाल्डो लुईझ नाझारिओ डी लिमा
दरम्यान, ब्राझीलचा साखळी फेरीतील उर्वरित सामना सर्बियाशी होणार आहे.