ब्राझील आणि बेल्जियममध्ये खूप सुंदर सामना झाला. तुम्हाला फुटबॉल आवडत असेल तर तुम्ही हा सामना नक्की पाहिला पाहिजे. हा सामना पाहिल्यानंतर तुमच्या मनाला एक समाधान मिळेल असे ब्राझीलचे प्रशिक्षक टिटे पराभवानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. पराभवामुळे निश्चित दु:ख झाले आहे पण दोन्ही संघांनी उत्तम दर्जाचा खेळ केला. आमच्याकडे बराच वेळ चेंडूचा ताबा होता. आम्हाला संधी देखील बऱ्याच मिळाल्या पण बेल्जियमचा संघ मिळालेल्या संधीचे गोलमध्ये रुपांतर करण्यात आमच्यापेक्षा जास्त प्रभावी ठरला असे टिटे म्हणाले.
बेल्जियमच्या संघात अनेक अव्वल दर्जाचे खेळाडू आहेत असे टिटे म्हणाले. तुम्हाला फुटबॉल आवडत असेल तर तुम्ही हा सामना पाहिला पाहिजे. तुम्ही दोघांपैकी कोणाचेही समर्थक नसाल तटस्थ असाल तर व्हॉट ए मॅच नक्कीच बोलू शकता. जे कोणी फुटबॉलवर प्रेम करतात त्यांनी हा सामना पाहिला पाहिजे खूप सुंदर सामना होता असे टिटे म्हणाले.
पराभवानंतर आता तुमचे भवितव्य काय ? या प्रश्नावर ते म्हणाले कि, मी माझ्या भविष्याबद्दल आताच काही बोलणार नाही. ते योग्य ठरणार नाही. माझ्या डोक्यात अजूनही सामन्याचा विचार सुरु आहे असे टिटे म्हणाले. विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या बलाढय ब्राझीलवर बेल्जियमने २-१ गोल फरकाने मात केली.
पहिल्या सत्रातच बेल्जियमच्या संघाने २-० अशी आघाडी घेतली होती. दोन गोल झाल्यानंतर ब्राझीलने जोरदार आक्रमण केले. ब्राझीलचे खेळाडू वारंवार बेल्जियमच्या गोल क्षेत्रात धडक देत होते. पण बेल्जियमच्या भक्कम बचावफळीने त्यांचे गोल करण्याचे सर्व प्रयत्न उधळून लावले. बेल्जियमने हा सामना जिंकला असला तरी चेंडूवर ५७ टक्के नियंत्रण ब्राझीलचे होते.