Fifa World Cup 2018 FRA vs AUS : फिफा विश्वचषक स्पर्धेत आज क गटातील पहिली लढत झाली. या लढतीत बलाढ्य फ्रान्सने ऑस्ट्रेलियाला २-१ असे पराभूत केले. फ्रान्सकडून अँटोनी ग्रीझमानने १ तर पॉल पॉग्बाने १ गोल केला. ऑस्ट्रेलियाकडून मात्र जेडीनाकने १ गोल केला. पॉग्बाच्या निर्णयक गोलमुळे फ्रान्सला ऑस्ट्रेलियावर मात करता आली.
फिफा विश्वचषक स्पर्धेतील हा सामना फ्रान्ससाठी महत्वाचा होता. क गटातील हा पहिलाच सामना असल्याने सलामीचा सामना जिंकून गटात अव्वल स्थान राखण्याचे फ्रान्सचे मनसुबे होते. त्यानुसार फ्रान्सने आक्रमक केहल करण्यास सुरुवात केली. परंतु, ऑस्ट्रेलियाच्या बचावाची फळी भेदण्यात त्यांना पूर्वार्धात यश आले नाही. बेहीच, मिलिगन, सन्सबरी आणि रिसडन या बचावाच्या फळीने पूर्वार्धात आपली भूमिका चोख पार पाडली. त्यामुळे मध्यंतरापर्यंत सामना ०-० अशा बरोबरीत सुटला.
उत्तरार्धात मात्र फ्रान्सने दुप्पट जोशाने आक्रमणाला सुरुवात केली आणि पेनल्टी किकच्या रूपाने फ्रान्सला गोल करण्याची संधी मिळाली. ५८ व्या मिनिटाला फ्रान्सकडून अँटनी ग्रीझमानने पेनल्टी किकचा फायदा उचलत पहिला गोल केला. या गोलमुळे फ्रान्सला १-०ची आघाडी मिळाली. संघ पिछाडीवर असल्याचे पाहून ऑस्ट्रेलियानेही आक्रमणाला सुरुवात केली. खेळातील या बदललेल्या पावित्र्याचा ऑस्ट्रेलियालाही फायदा झाला. ६२व्या मिनिटाला जेडीनाकने पेनल्टी किकच्या सहाय्याने गोल करत ऑस्ट्रेलियाला सामन्यात १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. त्यांनतर मात्र, १८ मिनिटांच्या खेळात एकही गोल होऊ शकला नाही.
हा सामना १-१ अशा बरोबरीत सुटणार असे वाटत असतानाच अनुभवी पॉल पॉग्बाने फ्रान्सला तारले. त्याने ८०व्या मिनिटाला गोल करत फ्रान्सला २-१ने आघाडी मिळवून दिली. पॉल पॉग्बाच्या गोलमुळे फ्रान्सला विजय मिळवता आला. जेराडने या गोलमध्ये सहाय्यक खेळाडूची भूमिका पार पाडली.
#FRA WIN!
A tough match for @FrenchTeam, but they get their #WorldCup campaign off to a winning start. #FRAAUS pic.twitter.com/kX6HnWwMZC
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) June 16, 2018
या विजयाबरोबरच फ्रान्सने क गटात ३ गुणांसह खाते उघडले असून अव्वल स्थान मिळवले आहे. तर १ गोलच्या फरकाने परबहुत झालेल्या ऑस्ट्रेलियाला ० गुणांसह गटाच्या तळाशी राहावे लागले आहे.