आजपासून रशियात फिफा फुटबॉल विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. गेल्या ४ वर्षांपासून फुटबॉलचे चाहते ज्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर आज आलेला आहे. एकूण ३२ संघ या स्पर्धेत सहभागी होणार असून, या महत्वाच्या स्पर्धेसाठी गुगलनेही खास डुडल तयार करत फुटबॉलप्रेमींच्या आनंदात भर टाकली आहे. खेळाडू फुटबॉल खेळण्यासाठी तयार होत असून आजुबाजूला त्यांना चाहते जल्लोषात पाठींबा देत असल्याचं अॅनिमेटेड चित्र गुगलने डुडलच्या स्वरुपात तयार केलं आहे.
राजधानी मॉस्कोतील ल्युझनिकी स्टेडियमवर रात्री ८.३० वाजता (भारतीय प्रमाण वेळेनुसार) विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे बिगूल वाजणार आहे. दहशतवादी हल्ला आणि हुल्लडबाज प्रेक्षक हे दुहेरी आव्हान समोर असतानाही रशिया ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सज्ज झाला आहे. पोलिसांचा प्रचंड मोठा ताफा स्टेडियमभोवती तैनात करण्यात आल्याने एखाद्या छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. विश्वचषक स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत खेळण्याचा मान प्रथमच आशियाई देशाला मिळाला आहे. दुसरीकडे विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात यजमानांना सलामीच्या लढतीत एकदाही पराभव पत्करावा लागलेला नाही. त्यामुळे यजमान रशिया ही परंपरा कायम राखण्यासाठी, तर सौदी अरेबिया संधीचे सोने करण्यासाठी कंबर कसून मैदानात उतरणार आहे.
तुम्हाला हे माहीत आहे?
- विश्वचषक स्पर्धेत यजमान संघाला एकदाही सलामीच्या लढतीत पराभव पत्करावा लागलेला नाही. यामध्ये सहा विजयांचा समावेश आहे, तर तीन सामने बरोबरीत सुटले आहेत. १९७०च्या विश्वचषक स्पर्धेत सोव्हियत युनियन असलेल्या रशियाला सलामीच्या लढतीत यजमान मेक्सिकोने गोलशून्य बरोबरीत रोखले होते.
- आशियाई खंडातील यशस्वी संघांपैकी एक म्हणून सौदी अरेबिया ओळखला जातो. त्यांनी तीन वेळा आशियाई अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आहे आणि चौथ्यांदा विश्वचषक स्पर्धेची पात्रता निश्चित केली आहे. १९९४मध्ये ते प्रथम या स्पर्धेत सहभागी झाले होते.
- रशिया आणि सौदी अरेबिया या संघांतील खेळाडूंचे सरासरी वय २९ वष्रे आहे. या स्पर्धेतील तरुण संघांच्या यादीत हे संघ तळाशी राहतात