FIFA World Cup 2018 KOR vs MEX : फिफा विश्वचषक स्पर्धेच्या आजच्या दुसऱ्या सामन्यात मेक्सिकोने कोरियाला २-१ने पराभूत केले आणि बाद फेरीत पात्र ठरण्यासाठी आपले स्थान भक्कम केले. पहिल्या सामन्यात गतविजेत्या जर्मनीला धूळ चारणाऱ्या मेक्सिकोने या सामन्यात २ गोल केले. तर कोरियाला मात्र एकच गोल करता आला. मेक्सिकोच्या आजच्या विजयामुळे जर्मनीची बाद फेरीत पोहोचण्याची वाट अधिक बिकट झाली असून स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी त्यांना स्वीडनविरुद्ध विजय आवश्यक आहे.
कोरियाविरुद्धच्या सामन्यात आज मेक्सिकोच्या संघ आत्मविश्वासाने उतरला. सामन्यात सुरुवातीपासून मेक्सिकोने गोल पोस्टवर हल्ला चढवला. मात्र कोरियाच्या ली यांग,ह्यून-सू, याँग-ग्वान आणि मीन-वू या बचाव फळीने त्यांची आक्रमणे रोखली. पण सामन्याच्या २६व्या मिनिटाला पेनल्टीचा फायदा मेक्सिकोला मिळाला. वेलाने पेनल्टी किकचे गोलमध्ये रूपांतर केले आणि संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मात्र पूर्वार्धात त्यांना एकही गोल करता आला नाही. पण उत्तरार्धात ६६ व्या मिनिटाला लोझानोने पास केलेल्या फुटबॉलवर हर्नांडिसने दुसरा गोल केला. हाविएर हर्नांडेझचा हा मेक्सिकोसाठी ५०वा गोल ठरला. या गोलबरोबरच गोलचे अर्धशतक करणारा तो पहिला मेक्सिकन खेळाडू ठरला.
फिफा विश्वचषकातच मेक्सिकोचा सलग दुसरा विजय, जर्मनीपाठोपाठ दक्षिण कोरियालाही चारली धूळ, मेक्सिकोचा दक्षिण कोरियावर 2-1 असा विजय, हाविएर हर्नांडेझचा मेक्सिकोसाठी 50वा गोल, गोलचं अर्धशतक करणारा पहिला मेक्सिकन खेळाडू #WorldCup #MEX #MEXKOR #KOR pic.twitter.com/BQ4kUQSyTU
; VIJAY SHINDE (@vijaymajha) June 23, 2018
या सामान्यांच्या नियमित वेळेत सामना मेक्सिकोच्या बाजूने होता. अतिरिक्त वेळेत कोरियाकडून चांगला संघर्ष पाहायला मिळाला. त्याचे फळंही त्यांना मिळाले. या अतिरिक्त वेळेत ह्यूंग मिन याने गोल करत कोरियाला आशेचा किरण दिला. पण अखेर सामना संपेपर्यंत दुसरा गोल न करता आल्याने कोरियाला पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे कोरियाचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.