स्वदेश घाणेकर
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या चार-पाच दिवसांआधी न्यूयॉर्क येथील एका प्रसिद्ध मासिकाने बकरीसोबत छायाचित्रण केले. अर्थात तिच्यासोबत ख्यातनाम फुटबॉलपटू असल्याने ती बकरी रातोरात संपूर्ण जगभरात पोहोचली. त्यावेळी सोबत असलेला खेळाडू चर्चेचा विषय होता. ‘गोट’ (GOAT) म्हणजे मराठीत बकरी असा अर्थ असला तरी न्यूयॉर्कच्या त्या मासिकाने ‘ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम’ या आशयाने लिओनेल मेसीसोबत ते छायाचित्रण केले होते. जगातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून त्यांनी मेसीची निवड केली होती. त्यामुळे मेसी चाहत्यांना गगनही ठेंगणे वाटू लागले होते आणि आता याच छायाचित्रामुळे त्यांच्यावर तोंड लपवण्याची वेळ आली आहे. मेसीच्या अपयशाने समाजमाध्यमांवर सध्या खरा ‘गोट’ कोण, यावरच पैजा लागत आहेत.
क्लबस्तरावर मेसी कितीही अव्वल असला तरी राष्ट्रीय संघाकडून त्याला ती कामगिरी करता आलेली नाही. दिएगो मॅराडोना यांच्याशी सतत होत असलेली तुलना आणि त्यामुळे निर्माण झालेले अपेक्षांचे ओझे, याखाली मेसी पुरता दबला गेला आहे. रशियात तर तो प्रचंड दडपण घेऊनच आलेला होता आणि म्हणून त्याच्या वाटय़ाला अपयश आले. पण हे अपयश केवळ मेसीलाच आलेले नाही. इजिप्तचा मोहम्मद सलाह, ब्राझीलचा नेयमार, जर्मनीचा थॉमस म्युलर, उरुग्वेचा लुईस सुआरेझ अशी अनेक नावे रशियात अपयशी ठरली आहेत किंवा अजूनही त्यांना अपेक्षित सूर सापडलेला नाही. पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो, बेल्जियमचे रोमेलू लुकाकू व एडन हॅजार्ड, फ्रान्सचे पॉल पोग्बा व अँटोइनो ग्रिझमन, इंग्लंडचा हॅरी केन हे या अपयशी खेळाडूंमध्ये अपवाद ठरत आहेत.
२०१७-१८ च्या हंगामात क्लबस्तरावर गोलचा पाऊस पाडणारे खेळाडू देशाकडूनही तशीच कामगिरी करतील असे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात तसे झाले नाही. लिव्हरपूल क्लबच्या सलाहने लीगमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम केला आणि त्याने मेसीसह रोनाल्डोलाही मागे टाकले. पण चॅम्पियन्स लीगच्या अंतिम लढतीतील दुखापतीने त्याला पकडले. विश्वचषक स्पर्धेत त्याचा किती मोठा भुर्दंड इजिप्तला बसला, हे सगळ्यांनी पाहिलेच. कोपा डेल रे आणि ला लीगा जेतेपद पटकावणाऱ्या बार्सिलोनाच्या मेसीचीही हीच गत. मात्र रोनाल्डो याला अपवाद ठरला. क्लब आणि देश येथे त्याचे योगदान समसमान राहिले आहे. २०१७-१८ च्या हंगामात रेयाल माद्रिदसाठी ४४ सामन्यांत ४४ गोल करणारा रोनाल्डो रशियातील या स्पर्धेत गोल करणाऱ्या खेळाडूंमध्ये आत्तापर्यंत आघाडीवर आहे.
रोनाल्डोला सध्या टक्कर देतोय तो बेल्जियमचा रोमेलू लुकाकू आणि इंग्लंडचा हॅरी केन. मॅंचेस्टर युनायटेडच्या लुकाकूने ५१ सामन्यांत २१ गोल, टोदन्हॅमच्या केनने ४८ सामन्यांत ४१ गोल केले आहेत. यांच्याशिवाय रशियाचा डेनिस चेरीशेव्ह (व्हिलारेल; ३२ सामने ४ गोल ), स्पेनचा दिएगो कोस्टा (अॅटलेटिको माद्रिद; २३ सामने ७ गोल ), कोस्टा रिकाचा लुका मॉड्रिक (रेयाल माद्रिद; ४३ सामने २ गोल), ब्राझीलचा फिलिप कुटिनो (बार्सिलोना; २२ सामने १० गोल ), बेल्जियमचा एडन हॅजार्ड (चेल्सी ; ५१ सामने १७ गोल) असे अनेक खेळाडू जे क्लबकडून छाप पाडू न शकलेले विश्वचषक स्पर्धेत देशासाठी चांगली कामगिरी करत आहेत. सध्या तरी मेसीच्या त्या छायाचित्रणामुळे समाजमाध्यमांवर ‘‘तो ‘गोट’ नव्हे शेळी आहे,’’ असे विनोद चालले आहेत. स्पर्धेअखेरीस यापैकी सर्वोत्तम खेळाडू कोण ते स्पष्ट होईलच.
swadesh.ghanekar@expressindia.com