जर्मनी आणि मेक्सिकोमध्ये रविवारी सामन्याला सुरुवात झाली तेव्हा जर्मनीचा संघ विजयासाठी फेव्हरेट होता. मेक्सिको जिंकेल असे कोणालाही वाटले नव्हते. पण उत्तर अमेरिकेतील या संघाने यंदाच्या फुटबॉल वर्ल्डकपमधील पहिल्या धक्कादायक निकालाची नोंद केली आणि मेक्सिकोमध्ये कृत्रिम भूकंप आला.

छोटयाशा मेक्सिकोने बलाढय जर्मनीवर विजय मिळवल्यानंतर मेक्सिकोमध्ये इतके जोरदार सेलिब्रेशन झाले कि, त्यामुळे भूकंप मापक यंत्रावर कृत्रिम भूकंपाची नोंद झाली आहे. सामन्याच्या ३५ व्या मिनिटाला जेवियर हेर्नाडेझच्या पासवर २२ वर्षाच्या हरविंग लोझानोने गोल करत मेक्सिकोला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मेक्सिकोने ही आघाडी शेवटपर्यंत कायम टिकवून गतविजेत्या जर्मनीला पराभवाचा धक्का दिला.

जर्मनीवरील विजयानंतर मेक्सिकोमध्ये असे काही जोरदार सेलिब्रेशन झाले कि, त्यामुळे कृत्रिम भूकंप झाला. मेक्सिकोमध्ये भूकंपाची नोंद आणि विश्लेषण करणाऱ्या एसआयएमएमएसए या यंत्रणेने ही माहिती दिली आहे. सामन्याच्या ३५ व्या मिनिटाला हरविंग लोझानोने गोल केल्यानंतर मेक्सिको शहरात भूकंपाची नोंद झाल्याचे टि्वट एसआयएमएमएसएने केले आहे.

मेक्सिको शहरात भूकंपाची नोंद झाली असून हा कृत्रिम भूकंप आहे असे एसआयएमएमएसएने म्हटले आहे. मेक्सिकोच्या संघाने जर्मनीवर गोल केल्यानंतर आनंदाच्या भरात एकाचवेळी भरपूर लोकांनी उडया मारल्यामुळे भूकंप मापक यंत्रात या कृत्रिम भूकंपाची नोंद झाली आहे. हरविंग लोझानोने हा मेक्सिकोच्या फुटबॉल इतिहासातील मोठा विजय असल्याचे म्हटले आहे.

 

Story img Loader