रवि पत्की – sachoten@hotmail.com
ब्राझीलमध्ये एक म्हण आहे. तिला राष्ट्रगीताइतकेच महत्व आहे. ती म्हण आहे ‘फुटबॉलला उगाच जीवन मरणाचा प्रश्न करू नका. तो त्याच्यापेक्षा खूप मोठा आहे.’ ह्यात ब्राझील म्हणजेच फुटबॉल ह्याची साक्ष पटते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ब्राझीलचा संघ बचावाकरता लक्षात राहील असे कुणी म्हणले तर त्याला वेड्यात काढतील. ब्राझील म्हणजे कवीने प्रेयसीवर  घायाळ अवस्थेत लिहिलेली प्रेम कविता किंवा व्हॅन गॉगचे पेंटिंग. बचाव, टिकी-टाका, टोटल फुटबॉल वगैरे गद्य प्रकार ब्राझिलने कधीच पुरस्कृत केले नाहीत. ब्राझीलमध्ये खेळाडू कोचिंगने घडत नाही तर खेळाडू आणि फुटबॉलच्या प्रेमप्रकरणातून तो घडतो. कालच्या मेक्सिको विरुद्धच्या सामन्यात पहिल्या गोलच्या वेळेस नेयमार आणि विल्यनच्या जुगलबंदीतून जे घडले ते काव्यापेक्षा कमी नव्हते. प्रतिस्पर्ध्याच्या बॉक्समध्ये ब्राझिलचे खेळाडू अगदी ऐनवेळेस काय करतील त्या धकातंत्रात सगळे सौंदर्य सामावले आहे. ब्राझिलचे सौंदर्य दुसऱ्या संघाला सुतकात (मोरनिंग)मध्ये घेऊन जाते हा विरोधाभास मजेशीर आहे. डाव्या बाजूने शिरलेला नेयमार बॉक्समध्ये मध्यापर्यंत गेला. आता अजून थोडा उजवीकडे जाऊन गोल पोस्टचा वेध घेणार असं वाटत असतानाच अचानक टाचेने विल्यनला चेंडू फ्लिक केला. विल्यन अजून उस्ताद. गोल पोस्टमध्ये मारणार वाटले तर चकवून डाव्या कोपऱ्यात बॉल घेऊन गेला आणि नेयमारला पास देत गोल झाला. अद्वितीय पेंटिंग तयार झाले. नेयमारचा बॅक फ्लिक बघितल्यावर तृप्त मनाने काही रसिक आपापल्या देशात परतले तर आश्चर्य वाटायला नको. दुसरा गोल सुद्धा नेयमारचाच होता. फरमिनोने बॉलला पाय लावून ममं म्हणले एव्हढच.

ब्राझीलचा कोच टिटेने फक्तं शैलिदार आक्रमण जरी ब्राझिलची ओळख असली तरी अभेद्य बचावाशिवाय विश्वचषक जिंकता येणार नाही ही संस्कृती ब्राझिलियन फुटबॉलवर ठसवली आहे आणि नशिबाने ब्राझिल त्याचे ऐकत आहे. २०१४ साली जर्मनीकडून ७-१ मार खाणाऱ्या ब्राझिलवर टिटे कोच झाल्यापासून २५ सामन्यात फक्तं ६ गोल्स झाले आहेत. कालच्या सामन्यात लुईस, फॅगनर, सिलवा, मिरांडा या बाचावफळीनी अभेद्य भिंत उभी केली. त्यांच्या बहुतांशी टॅकल्स सुद्धा वैध होत्या. या बचावाने ब्राझिल आता जास्त मोठा दावेदार म्हणून समोर आला आहे.

मेक्सिकोचा गोलंकीपर ओचाने कमीतकमी तीन गोल रोखले. त्यात ४७ व्या मिनिटाचा कटिन्यूओचा आणि ६२ व्या मिनिटाचा विलियनचा रोखलेल्या शॉटबद्दल त्याला सलाम करायला हवा. नेयमारने फुटबॉल सम्राटाबरोबर नटसम्राट होण्याच्या दिशेने बरीच मजल मारली आहे हे त्याच्या व्हीवळण्याने पुन्हा सिद्ध केले. सुआरेझला तगडी स्पर्धा निर्माण झाली आहे हे खरे.

मराठीतील सर्व फिफा २०१८ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup 2018 neymar brazil beats mexico