FIFA World Cup 2018 : फिफा वर्ल्डकप स्पर्धा ही सध्या रोमांचक वळणावर आहे. प्रत्येक सामन्यात काही ना काही घटना घडत आहेत. काही महत्वाचे खेळाडू आपली चमक दाखवण्यात अयशस्वी ठरत आहेत, तर काही नवोदित खेळाडू प्रकाशझोतात आले आहेत. पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो हा सध्या उत्तम फॉर्मात आहे. त्याने पहिल्या दोन सामन्यात एकूण ४ गोलची कमाई केली. पण इराणविरुद्धच्या सामन्यात मात्र रोनाल्डोला गोल करता आला नाही. पण रोनाल्डो हा या सामन्यातील एका वेगळ्या कारणासाठी सध्या चर्चेत आहे.
इराण आणि पोर्तुगाल यांच्या दरम्यान सोमवारी सामना झाला. हा सामना १-१ असा बरोबरीत सुटला. इराणने बलाढ्य पोर्तुगालला बरोबरीत रोखणे, हे त्यांच्यासाठी एक मोठं यश आहे. पण तरीदेखील एका कारणावरून इराणचे प्रशिक्षक हे प्रचंड चिडले. त्यांनी आपला राग व्यक्त करत सामन्याचे रेफरी, टीव्ही रेफरी यांच्यावर प्रशचिन्ह उपस्थित केले आहे. स्पर्धेतील सामनाधिकारी, रेफरी आणि VAR प्रक्रियेत सहभागी असलेले सर्व अधिकारी यांच्यावर इराणचे प्रशिक्षक कार्लोस क्वीरोझ यांनी टीका केली आहे.
सामना सुरु असताना रोनाल्डोच्या धक्क्याने इराणचा एक खेळाडू दुखापतग्रस्त झाला. हा धक्का रोनाल्डोने मुद्दाम दिला असल्याचे म्हणत इराणने VARची मदत घेतली. VAR मध्ये रोनाल्डोच्या कोपराने तो खेळाडू दुखापतग्रस्त असल्याचे दिसत होते. पण, याबाबत त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात आली नाही. हि बाब इराणचे प्रशिक्षक कार्लोस यांना रुचली नाही.
‘VAR साठी चालू खेळ थांबवण्यात आला. त्यावेळी रोनाल्डोने कोपराने प्रतिस्पर्धी खेळाडूला मारल्याचे स्पष्ट दिसत होते. नियमानुसार कोपराने प्रतिस्पर्धी खेळाडूला मारल्यास त्याला रेड कार्ड दाखवले जाते. पण मेसी, रोनाल्डोसारख्या खेळाडूंपुढे नियम धाब्यावर बसवले जात आहेत’, अशी टीका त्यांनी केली. ”रोनाल्डो हे खूप मोठे नाव आहे. कदाचित या कारणासाठी त्याला रेड कार्ड दाखवण्यात आले नसावे. रोनाल्डोला रेड कार्ड का दाखवण्यात आले नाही? हे मला माहित नाही. पण हे का घडले हे देखील आम्हाला समजायला हवे.