रशियात सुरु असलेल्या फिफा विश्वचषकात गतविजेत्या जर्मनीला पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का बसला आहे. मेक्सिकोने जर्मनीवर 1-0 ने मात करुन स्पर्धेत आपला पहिला विजय मिळवला आहे. सुरुवातीच्या काही मिनीटांमध्ये दोन्ही संघांनी सावध पवित्रा आजमावला होता. मात्र अर्धा तास उलटल्यानंत मेक्सिकोच्या खेळाडूंनी सामन्यात आक्रमक खेळाला सुरुवात केली.
फिफा विश्वचषकात मोठा उलटफेर, गतविजेत्या जर्मनीला सलामीच्या सामन्यात पराभवाचा धक्का, मेक्सिकोचा जर्मनीवर 1-0 असा विजय, एकसंध जर्मनीचा विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात पहिल्यांदाच पराभव @LoksattaLive @PrathmeshDixit2 @kridajagat #FIFAWorldCup #MEX #MEXGER @FIFAWorldCup
— VIJAY SHINDE (@vijaymajha) June 17, 2018
मेक्सिकोच्या आक्रमणामुळे जर्मनीची बचावफळी काहीशी बावरलेली दिसत होती. अखेर 35 व्या मिनीटाला जेवियर हेर्नाडेझच्या पासवर हरविंग लोझानोने गोल करत मेक्सिकोचं खातं उघडलं. पहिल्या सत्रात मेक्सिकोने घेतलेली ही आघाडी जर्मनीसाठी धक्कादायक होती. दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेल्या जर्मनीने मेक्सिकोवर आक्रमण करत सामन्यात बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. मात्र मेक्सिकोच्या गोलकिपरच्या अभेद्य बचावापुढे त्यांची डाळ शिजू शकली नाही. ओझिल, मुलर यांसारख्या तगड्या आक्रमक खेळाडूंचा मेक्सिकोच्या संघाने नेटाने सामना करत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
मेक्सिकोच्या राफेल मारक्वेझचा नवा पराक्रम, मारक्वेझ पाचव्यांदा विश्वचषकात सहभागी, मारक्वेझकडून मेक्सिकोच्या अॅन्टोनियो कारवाएल आणि जर्मनीच्या लोथर मथाएसच्या विक्रमाची बरोबरी @LoksattaLive @kridajagat @PrathmeshDixit2 #FIFAWorldCup @FIFAWorldCup #MEX #Marquez pic.twitter.com/PCmurT9rRq
— VIJAY SHINDE (@vijaymajha) June 17, 2018
दरम्यान मेक्सिकोच्या मारक्वेझने आजच्या सामन्यात अनोख्या विक्रमाची नोंद केली. मारक्वेझचा हा पाचवा विश्वचषक ठरला आहे. यासह मारक्वेझने मेक्सिकोच्या अॅन्टोनियो कारवाएल आणि जर्मनीच्या लोथर मथाएसच्या विक्रमाशी बरोबरी केली. या पराभवामुळे माजी विजेत्या जर्मनीसमोर स्पर्धेत आपलं आव्हान कायम राखण्याचं मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळे यापुढील सामन्यांमध्ये जर्मनीचा जगज्जेता संघ कसा खेळ करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.