FIFA World Cup 2018 Video : फिफा विश्वचषक स्पर्धेत बुधवारी बलाढ्य स्पेनने इराणवर १- ० ने मात केली. खूप संघर्ष केल्यांनतर स्पेनला हा विजय मिळाला. संपूर्ण सामन्यात केवळ स्पेनकडून एकमेव गोल करण्यात आला. आक्रमण फळीतील डिएगो कोस्टा याने हा गोल करत स्पेनला १-०ने आघाडी मिळवून दिली. ही आघाडी शेवटपर्यंत तशीच ठेवण्यात स्पेनला यश आले.

डिएगो कोस्टाने स्पर्धेतील सलग दुसऱ्या सामन्यात गोल केला. वर्ल्डकपमधील दुसऱ्या मॅचमध्ये त्याने हा तिसरा गोल केला. या विजयासह स्पेनने ब गटात पोर्तुगालबरोबर संयुक्तपणे अव्वलस्थानी झेप घेतली. कझान स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात इराणने स्पेनला चांगली टक्कर दिली. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांना एकही गोल मारता आला नाही. ५४ व्या मिनिटाला डिएगो कोस्टाने गोल मारुन संघाला १- ० अशी आघाडी मिळवून दिली. इराणची बचाव फळी आणि गोलकिपरने स्पेनला चांगलेच झुंजवले.

पण या सामन्यात स्पेनच्या खेळाडूंच्या भूतदयेचे दर्शन घडले. सामन्याच्या दरम्यान एक पक्षी उडत उडत मैदानावर आला. नेमका त्या वेळेसच बचाव फळीतील जेरार्ड पीक याचा तोल जाऊन त्याचा त्या पक्षाला धक्का लागला. पक्ष्याला थोडी दुखापत झालेली पाहताच स्पेनच्या मधल्या फळीतील इस्को या खेळाडूने त्या पक्षाला अगदी अलगदपणे उचलले आणि मैदानाबाहेर नेऊन ठेवले.

या व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला. त्यानंतर इस्कोच्या या सहानुभूतीपूर्वक वागणुकीचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.

Story img Loader