फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत काल क्रोएशियाने इंग्लंडला पराभूत केले आणि अंतिम फेरीत स्थान मिळवले. आता रविवारी त्यांची फ्रान्सशी जगज्जेतेपदासाठी झुंज होणार आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत फ्रान्स, बेल्जीयम, क्रोएशिया आणि इंग्लंड हे ४ संघ पोहोचले होते. मात्र आता फ्रान्स आणि क्रोएशिया यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे.
क्रोएशियाचा संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथमच पोहोचला आहे, तर दुसरीकडे फ्रान्सने २० वर्षात तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे सर्वांचे या सामन्यांकडे लक्ष आहे. पण या दरम्यान, भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने आपल्या ट्विटने एका वेगळ्या गोष्टीकडे लक्ष वेधले आहे.
सेहवागने एका व्यक्तीचा व्हिडीओ आपल्या ट्विटर आणि इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओतील माणूस हा पन्नाशीच्या आसपासचा दिसत आहे. मात्र या व्हिडिओत त्याने केलेले करामत पाहून सेहवागला सर्व काही विसरायला लावले आहे. सेहवागने या व्हिडिओला कॅप्शन देत ‘फ्रान्स, इंग्लंड, क्रोएशिया…सारं काही विसरा’ असं सांगितलं आहे. यासह त्याने ट्विटरवर #FRABEL हा हॅशटॅग वापरला आहे. तर इंस्टाग्रामवर याच व्हिडिओमध्ये ‘मेसी का चाचा’ हा हॅशटॅग वापरला आहे.
त्याने पोस्ट केलेली हि व्हिडीओ आणि ट्विट प्रचंड व्हायरल झालं असून या सामन्यात नेटकरी त्याच्या विनोदबुद्धीचे कौतुक करत आहेत.