फुटबॉलच्या विश्वात ब्राझील या नावाचा एक दबदबा आहे. दक्षिण अमेरिकेतील या देशाने पेले, रोनाल्डो आणि आता नेमार असे एकाहून एक सरस फुटबॉलपटू जगाला दिले. पण मागच्या काही वर्षात ब्राझीलला आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००२ साली ब्राझीलने शेवटचा वर्ल्डकप जिंकला पण त्यानंतरच्या वर्ल्डकप स्पर्धांमध्ये ब्राझीलला आपला तो दबदबा, हुकूमत सिद्ध करता आलेली नाही.
प्रत्येक वर्ल्डकपमध्ये ब्राझीलच्या संघाची जोरदार चर्चा होते. हा संघ विजयासाठी सर्वांचा फेव्हरेट असतो पण उपांत्यपूर्व किंवा उपांत्यफेरीपुढे त्यांची गाडी जात नाही. मागच्या सलग चार विश्वचषक स्पर्धांच्या बादफेरीत युरोपियन देशांकडून पराभव झाल्यामुळे ब्राझीलचे आव्हान संपुष्टात आले आहे. एकेकाळी ब्राझीलची टीम युरोपियन देशांवर भारी पडायची. पण अलीकडे युरोपातल्या आघाडीच्या संघांसमोर ब्राझीलचा संघ हतबल ठरत असल्याचे दिसून आले आहे.
– २००६ सालच्या फुटबॉल वर्ल्डकपमध्ये उपांत्यपूर्वफेरीच्या सामन्यात फ्रान्सने ब्राझीलचा १-० गोलने पराभव केला.
– २०१० सालच्या फुटबॉल वर्ल्डकपमध्ये उपांत्यपूर्वफेरीच्या सामन्यात हॉलंडने ब्राझीलवर २-१ गोलने विजय मिळवला.
– २०१४ फुटबॉल वर्ल्डकपच्या उपांत्यफेरीच्या सामन्यात जर्मनीने ब्राझीलचा ७-१ असा धुव्वा उडवला होता.
– २०१८ फुटबॉल वर्ल्डकपच्या उपांत्यपूर्वफेरीत बेल्जियमने ब्राझीलवर २-१ असा विजय मिळवला.
सलग चौथ्या विश्वचषकात ब्राझिलचा युरोपियन देशाकडून पराभव, 2006 साली फ्रान्स, 2010 साली नेदरलँड्स, 2014 साली जर्मनी, 2018 साली बेल्जियम. @LoksattaLive@PrathmeshDixit2 @kridajagat @MarathiBrain #WorldCup #BraBel #Bra #Bel
— VIJAY SHINDE (@vijaymajha) July 6, 2018
प्रत्येक वर्ल्डकपमध्ये ब्राझीलला विजयासाठी सर्वाधिक पसंती दिली जाते. कारण या देशाचा फुटबॉल जगतातला लौकिक तसा आहे. आतापर्यंत पाचवेळा फुटबॉल वर्ल्डकप जिंकण्याची किमया या देशाने केली आहे. पण यापुढे ब्राझीलला ठोस काही तरी करुन दाखवावे लागले तरच त्यांचा फुटबॉल जगतातला दबदबा टिकून राहिल.