FIFA World Cup 2018 : ही विश्वचषक स्पर्धा उद्यापासून सुरु होणार आहे. यादरम्यान, २०२६च्या विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद हे अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या तीन देशांना देण्यात आल्याचे आज ‘फिफा’ने जाहीर केले. २०२६च्या वर्ल्डकप स्पर्धेसाठी मोरोक्को हा देशही आपला जोर लावून होता. मात्र, अखेर या स्पर्धेसाठी अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या देशांना ही संधी मिळाली आहे.

आज झालेल्या मतदानात मोरोक्कोला केवळ ६५ मते मिळाली, तर अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या तीन देशांना एकत्रितपणे १३४ मते मिळाली. त्या आधारावर आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने म्हणजेच फिफाने या तीन देशांकडे २०२६च्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद सुपूर्द करण्याचा निर्णय दिला.

प्रथमच या विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद तीन देश एकत्रित येऊन भूषवणार आहेत. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तिन्ही देशांना या यजमानपदाबाबत शुभेच्छा दिल्या आहेत.

२०२६चा वर्ल्डकप आतापर्यंतचा सर्वात मोठा वर्ल्डकप ठरणार आहे. या वर्ल्डकपमध्ये ४८ देश सहभागी होणार असून ३४ दिवस चालणाऱ्या या वर्ल्डकपमध्ये ८० सामने होणार आहेत. यातील ६० सामने अमेरिकेत तर प्रत्येकी १०-१० सामने मेक्सिको आणि कॅनडात होणार आहेत.

Story img Loader