FIFA World Cup 2018 : विश्वचषक स्पर्धा केवळ एका दिवसावर आली असताना आज स्पेनच्या फुटबॉल संघटनेने संघाचे मुख्य प्रशिक्षक जुलेन लोपेतेगुई यांची हकालपट्टी केली आहे. रियल माद्रिद संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी जुलेन लोपेतेगुई यांची नियुक्ती झाल्याची घोषणा झाल्यानंतर स्पेनकडून हा निर्णय घेण्यात आला. स्पेनचा परवा पोर्तुगाल या संघाशी सामना होणार आहे. या दरम्यान, हा निर्णय घेण्यात आल्यामुळे स्पेन फुटबॉल संघासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

जुलेन लोपेतेगुई यांच्या रियाल माद्रिदच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती होण्याबाबत संघटनेला विश्वासात न घेतल्याबद्दल स्पेनच्या फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष लुईस रूबियल्स यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘आम्ही लोपेतेगुई यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेतला आहे. आज स्पेनच्या संघाने जे यश कमावले आहे, ते प्रशिक्षकांच्या आणि खेळाडूंच्या परिश्रमामुळे शक्य झाले. मात्र लोपेतेगुई हे माद्रिदला रवाना होण्यासाठी निघण्याच्या पाच मिनिटेआधी आम्हला त्याच्या रियाल माद्रिदच्या प्रशिक्षकपदाची बातमी समजली’, अशी त्यांनी माहिती दिली.

या संर्दभात त्यांनी रियल माद्रिद व्यवस्थापनावरही टीका केली. त्या क्लबला सर्वोत्तम प्रशिक्षकाची गरज होती, हे मला मान्य आहे. त्याबाबत मला काहीही बोलायचे नाही. पण क्लब व्यवस्थापनाने याबाबत आम्हाला कल्पना द्यायला हवी होती. आमच्या संघटनेतील कोणाशीही चर्चा करायची असेल, तर त्याआधी संघटनेला विश्वासात घेणे गरजेचे आहे. पण क्लबने याबाबत आम्हाला काहीही विश्वासात घेऊन सांगितले नाही. त्यामुळे आम्ही त्याच्या या कृतीबाबत दुखावले गेलो आहोत, अशा शब्दात त्यांनी आपला रोष व्यक्त केला.

Story img Loader