दुसऱ्या महायुद्धादरम्यान उत्तर आफ्रिकेत जून १९४० पासून सुरू झालेली जर्मन सेनानी फील्ड मार्शल एर्विन रोमेल यांची झंझावाती आगेकूच १९४२ साली अल-अलामिन येथील संग्रामात थोपवली गेली. त्या युद्धात त्यांच्यासमोर उभी ठाकली होती ती ब्रिटिश फील्ड मार्शल बर्नार्ड लॉ माँटगोमेरी (माँटी) यांच्या नेतृत्वाखालील एट्थ आर्मी. अल-अलामिनचा संग्राम ब्रिटिश आणि मित्रराष्ट्रांसाठी दुसऱ्या महायुद्धाचे पारडे फिरवणारा ठरला. या युद्धात रणगाडय़ांइतकीच महत्त्वाची भूमिका बजावली होती ती ब्रिटिश २५ पौंडी तोफांनी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उत्तर आफ्रिकेतील युद्धात जर्मन चिलखती दलांचा मुकाबला करण्यासाठी ब्रिटनने प्रथम त्यांच्या २ पौंडी तोफा वापरून पाहिल्या. पण त्या खूपच कमी क्षमतेच्या असल्याने अपयशी ठरल्या. त्यानंतर ही जबाबदारी पेलण्यासाठी २५ पौंडी गोळा डागणाऱ्या तोफा या आघाडीवर तैनात करण्यात आल्या. त्यांनी जर्मन सैन्याला थोपवून धरण्यातच नव्हे तर परत पिटाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. माँटगोमेरी यांनी अल-अलामिनच्या रणभूमीवर २५ पौंडी गोळे डागणाऱ्या ८०० तोफा तैनात केल्या होत्या. ब्रिटिश चढाईच्या पहिल्या आठवडय़ात या तोफांनी जर्मन सैन्यावर दहा लाखांहून अधिक तोफगोळे डागले. तेथील कौतुकास्पद कामगिरीमुळे २५ पौंडी तोफेची ख्याती जगभर पसरली. तिचे अधिकृत नाव ऑर्डनन्स क्यूएफ २५-पाऊंडर गन असे होते.

दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला म्हणजे १९३९ सालापर्यंत ब्रिटनच्या ताफ्यातील जुन्या तोफा बदलण्याची गरज होती. त्या वेळी ब्रिटनकडे पहिल्या महायुद्धातील १८ पौंडी फील्ड कॅनन आणि ४.५ इंची हॉवित्झर्स वापरात होत्या. पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटनने कॅनन आणि हॉवित्झरचे गुणधर्म एकत्र असलेली तोफ विकसित करण्याचे प्रयत्न केले होते. पण युद्धोत्तर काळात ब्रिटनची अर्थव्यवस्था अडचणीत असल्याने तो प्रकल्प पुढे सरकला नव्हता. त्याऐवजी जुन्याच १८ पौंडी तोफेच्या कॅरेजवर थोडी जड बॅरल बसवून सुरुवातीच्या २५ पौंडी तोफ तयार केल्या होत्या.  ती आवृत्ती मार्क १ म्हणून ओळखली जात होती.  दुसऱ्या महायुद्धात १९४० साली फ्रान्समधील डंकर्क येथील कारवाईत ब्रिटनला माघार घ्यावी लागली. त्या वेळी ब्रिटिश खाडी पार करून सैन्य वाचवून मायदेशी नेताना त्या तोफांवर पाणी सोडावे लागले होते.

त्याच दरम्यान २५ पौंडी तोफेची मार्क २ ही सुधारित आवृत्ती तयार होत होती. ही तोफ बॅरल आणि कॅरेजसह स्वतंत्रपणे विकसित केली होती. ती २५ पौंडाचा तोफगोळा १२,२५२ मीटपर्यंत डागू शकत असे. तिच्या स्लायडिंग ब्रिचब्लॉक प्रणालीमुळे ती एका मिनिटात चार तोफगोळे डागू शकत असे. लवकरच ब्रिटिश कॉमनवेल्थच्या अनेक देशांच्या सैन्यांमध्ये ही तोफ वापरली जाऊ लागली. या तोफेच्या ऑस्ट्रेलियन मॉडेलमध्ये तोफेचे अनेक भाग सुटे करून जनावरांच्या पाठीवरून वाहून नेता येत असत. तर जंगलात वापरण्याच्या आणि विमानातून वाहून नेण्याच्या आवृत्तीत तोफेचे कॅरेज लहान आणि अधिक अरुंद केले होते.

ब्रिटिश २५ पौंडी तोफ दुसऱ्या महायुद्धातील आणि त्यानंतरच्याही काळातील जगातील सर्वात प्रसिद्ध तोफांपैकी एक होती. भारत, पाकिस्तानसह अनेक कॉमनवेल्थ देशांत ती १९७० च्या दशकापर्यंत वापरात होती.

sachin.diwan@expressindia.com