कोरिया आणि व्हिएतनामच्या युद्धांत जमिनीवर लढणाऱ्या सैन्याच्या मदतीसाठी वापरलेल्या विमानांच्या (क्लोझ एअर सपोर्ट एअरक्राफ्ट) मर्यादा लक्षात आल्या होत्या. त्यामुळे शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत रशियाच्या चिलखती दलांकडून पश्चिम युरोपवर मोठय़ा संख्येने होणाऱ्या संभाव्य आक्रमणाचा सामना करण्यासाठी अमेरिकेला विशेष विमानाची गरज जाणवत होती. ही गरज लक्षात घेऊन सोव्हिएत रणगाडय़ांना थोपवण्याच्या उद्देशाने अमेरिकेच्या फेअरचाइल्ड रिपब्लिक या कंपनीने १९७०च्या दशकात ए-१० थंडरबोल्ट-२ या विमानाची निर्मिती केली.
शत्रूच्या रणगाडय़ांची फळी नष्ट करण्यासाठी या विमानाला कमी उंचीवरून आणि कमी वेगाने उड्डाण करावे लागणार होते. त्यामध्ये शत्रूच्या विमानवेधी तोफा, मशिनगन आणि क्षेपणास्त्रे यांच्यापासून गंभीर धोका असतो. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी थंडरबोल्टच्या रचनेत अचूक आणि प्रभावी नेमबाजी आणि शत्रूच्या माऱ्यापासून बचावण्याची क्षमता या बाबींवर विशेष लक्ष दिले होते.
या विमानाच्या पंखांची रचना त्याला अधिक चांगला उठाव (लिफ्ट) मिळवून देण्यासाठी केली होती. त्याची दोन जनरल इलेक्ट्रिक टीएफ-३४ जीई-१०० टबरेफॅन इंजिने जमिनीवरून होणाऱ्या माऱ्यापासून संरक्षणासाठी फ्युजलाजच्या मागील भागात, वरील बाजूवर बसवली होती. अन्य जेट इंजिनांच्या तुलनेत टबरेफॅन इंजिने कमी उष्णता निर्माण करतात. त्यामुळे उष्णतावेधी क्षेपणास्त्रांपासून बचाव करण्याच्या उद्देशाने या विमानासाठी टबरेफॅन इंजिने निवडली होती. इंधनाच्या टाक्यांवर खास आग प्रतिबंधक फोमचे आवरण होते. विमानावरच्या चिलखती आवरणामुळे ते २३ मिमी व्यासाच्या चिलखतभेदी किंवा अति स्फोटक रसायनयुक्त तोफगोळ्यांच्या माऱ्यापासूनही बचावू शकत असे. आपत्कालीन स्थितीसाठी विमानाला दुहेरी नियंत्रण प्रणालीची सोय होती.
या विमानाच्या पुढील भागात बसवलेली ३० मिमी व्यासाची कॅनन सेकंदाला ३५ इतक्या वेगाने डिप्लिटेड युरेनियमयुक्त १३५० गोळ्या झाडू शकत असे. प्रत्येक गोळीत एक किलोमीटरवरून रणगाडा भेदण्याची क्षमता होती. थंडरबोल्ट ७२६४ किलो बॉम्ब तसेच मॅव्हरिक आणि साइडवाइंडर क्षेपणास्त्रे वाहून नेऊ शकत असे. थंडरबोल्टचा वापर शीतयुद्धाच्या अखेरीस १९९१च्या आखाती युद्धात झाला. त्या युद्धात वापरलेल्या १४४ थंडरबोल्ट विमानांनी सद्दाम हुसेनच्या इराकचे १००० रणगाडे, १२०० तोफा आणि २००० लष्करी वाहने नष्ट केली. इराकवरील २००३ सालच्या कारवाईतही ही विमाने वापरली गेली.
sachin.diwan@expressindia.com