सचिन दिवाण sachin.diwan@expressindia.com
पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युद्धनौकांचा आकार आणि त्यांच्यावरील तोफांची मारक क्षमता खूप वाढली होती. मात्र क्षेपणास्त्रांच्या विकासानंतर युद्धनौकांवरील तोफांचे महत्त्व कमी होऊ लागले. शत्रूच्या युद्धनौका नष्ट करण्यासाठी क्षेपणास्त्रांचा वापर होऊ लागला. युद्धनौकाविरोधी क्षेपणास्त्रे (अँटि-शिप मिसाइल्स) युद्धनौका, पाणबुडय़ा, विमाने, हेलिकॉप्टर किंवा जमिनीवरील तळावरून डागता येतात. ती शत्रूच्या रडारला चकवा देण्यासाठी बहुतांशी समुद्राच्या पृष्ठभागाजवळून प्रवास करतात. त्याला क्षेपणास्त्राची ‘सी-स्किमिंग अॅबिलिटी’ म्हणतात. तर काही क्षेपणास्त्रे ‘ओव्हर द होरायझन’ प्रकारे प्रवास करतात.
जर्मनीने दुसऱ्या महायुद्धात वापरलेले हेन्शेल एचएस-२९३ हे पहिले युद्धनौकाविरोधी गायडेड क्षेपणास्त्र मानले जाते. शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत युनियनचे पी-१५ टर्मिट (नाटो संघटनेने दिलेले नाव एसएस-एन-२ स्टिक्स) युद्धनौकाविरोधी क्षेपणास्त्र प्रसिद्ध होते. भारतीय नौदलाच्या ओसा वर्गातील नौकांनी १९७१ च्या युद्धात कराची बंदराजवळ पाकिस्तानी युद्धनौकांविरुद्ध त्यांचा प्रभावी वापर केला होता.
फ्रान्सचे एक्झोसेट हे प्रभावी युद्धनौकाविरोधी क्षेपणास्त्र आहे. अटलांटिक महासागरातील फॉकलंड बेटांच्या मालकीवरून १९८२ साली ब्रिटन आणि अर्जेटिना यांच्यात युद्ध झाले. त्यात अर्जेटिनाच्या विमानांनी एक्झोसेट क्षेपणास्त्र डागून ब्रिटनची एचएमएस शेफिल्ड नावाची विनाशिका बुडवली होती. या एक्झोसेट क्षेपणास्त्रांची सुधारित आवृत्ती भारत फ्रान्सच्या सहकार्याने बांधत असलेल्या स्कॉर्पिन पाणबुडय़ांवरही बसवली जात आहे. फ्रान्सने १९७० च्या दशकात विकसित केलेले एक्झोसेट क्षेपणास्त्र ७० ते १८० किमीच्या टप्प्यात शत्रूच्या युद्धनौकांचा अचूक वेध घेऊ शकते.
अमेरिकेचे हार्पून क्षेपणास्त्र १९७७ साली सेनादलांत सामील झाले. ते ६७ सागरी मैल (१२४ किमी) अंतरावरील लक्ष्यांचा वेध घेऊ शकते. आधुनिक काळातील ते एक नावाजलेले युद्धनौकाविरोधी क्षेपणास्त्र आहे. पाकिस्तानी नौदलाने हार्पून क्षेपणास्त्रे मिळवल्यानंतर भारतानेही ती विकत घेतली आहेत. भारतीय सेनादले जग्वार आणि पी-८ आय विमाने आणि शिशुमार वर्गातील पाणबुडय़ांवर हार्पून क्षेपणास्त्रे बसवत आहेत.
रशियाचे कॅलिब्र (एसएस-एन-२७ सिझलर) हे अत्याधुनिक युद्धनौकाविरोधी क्षेपणास्त्र आहे. ते १९९४ पासून रशियाच्या सेवेत असून त्याच्या विविध आवृत्तींचा पल्ला ५० ते २५०० किमी आहे. ही क्षेपणास्त्रे घनरूप इंधन आणि टबरेजेट इंजिनावर चालतात. सुरुवातीच्या टप्प्यात त्याचा वेग ध्वनीपेक्षा काहीसा कमी असतो, नंतर ते स्वनातीत (सुपरसॉनिक) वेगाने लक्ष्यावर मारा करते.