सचिन दिवाण
दुसऱ्या महायुद्धानंतर रणगाडय़ांचे युद्धभूमीवरील महत्त्व अधोरेखित झाले होते. त्याच वेळी रणगाडे नष्ट करणारी शस्त्रेही विकसित होत होती. त्यात नंतर क्षेपणास्त्रांचाही समावेश झाला. सुरुवातीची क्षेपणास्त्रे बरीच मोठी आणि बोजड होती. पण त्यांच्यात सुधारणा होत जाऊन ती अधिक लहान आणि कार्यक्षम होत गेली. त्यामुळे हवेतून हवेत मारा करणारी आणि रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे तयार होऊ लागली. रणगाडाभेदी क्षेपणास्त्रांमध्ये जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी आणि हवेतून जमिनीवर मारा करणारी अशी दोन प्रकारची क्षेपणास्त्रे अस्तित्वात आहेत. रणगाडय़ांचे समोरील चिलखत बरेच जाड असते. ते भेदण्यास कठीण असते. त्या तुलनेत मागील आणि वरील पृष्ठभागावरील चिलखत कमी जाडीचे असते. त्यामुळे हवेतून क्षेपणास्त्र डागून रणगाडा नष्ट करणे हा युद्धातील एक प्रभावी पर्याय ठरतो. त्या दृष्टीने हवेतून जमिनीवर मारा करणारी रणगाडाभेदी क्षेपणास्त्रे तयार झाली.
अमेरिकेचे ‘टो’ (टीओडब्ल्यू- टय़ूब लाँच्ड, ऑप्टिकली ट्रॅक्ड, वायर गायडेड) हे १९७०च्या दशकात वापरात आलेले आणि बराच प्रसार झालेले रणगाडाभेदी क्षेपणास्त्र आहे. ते जमिनीवरून जमिनीवर ३ ते ४ किमी अंतरावर मारा करू शकते. ही क्षेपणास्त्रे प्रथम व्हिएतनाम युद्धात वापरली गेली. त्यानंतर १९८२ चे लेबॅनन युद्ध, अरब-इस्रायली युद्ध, अफगाणिस्तान, इराण-इराक, सीरिया आदी संघर्षांतही त्यांचा वापर झाला. टो हे गायडेड मिसाइल असून त्याचा मार्ग रणगाडय़ाच्या मार्गाप्रमाणे बदलता येतो. त्यामुळे ते अधिक प्रभावी बनले आहे.
अमेरिकेने १९७० च्या दशकात विकसित केलेले एजीएम-६५ मॅव्हरिक हे हवेतून जमिनीवर मारा करणारे रणगाडाभेदी क्षेपणास्त्र आहे. ते रणगाडय़ांशियावाय जमिनीवरील अन्य लक्ष्ये टिपण्यासाठीही वापरता येते. त्याचा पल्ला २२ किमी आहे. ते १९७३ चे अरब-इस्रायलमधील योम किप्पूर युद्ध, ११९१ चे आखाती युद्ध, लिबियातील युद्ध आदी संघर्षांत वापरले गेले.
अमेरिकेचे हेलफायर हे हवेतून जमिनीवर मारा करणारे अत्याधुनिक क्षेपणास्त्र आहे. ते हेलिकॉप्टर किंवा ड्रोनवरून डागता येते. त्याचा पल्ला ५०० मीटर ते ८ किलोमीटर इतका आहे. त्यावर अतिज्वालाग्राही स्फोटके बसवता येतात. हेलफायर हे रणागाडे आणि जमिनीवरील अन्य लक्ष्यांविरुद्ध वापरता येणारे प्रभावी अस्त्र आहे.
सोव्हिएत युनियननेही अनेक प्रभावी रणगाडाभेदी क्षेपणास्त्रे तयार केली. त्यात (अँटि-टँक) एटी-१ स्नॅपर, एटी-२ स्व्ॉटर, एटी-३ सॅगर, एटी-४ स्पिगॉट आणि एटी-५ स्पँड्रेल या मालिकेचा समावेश आहे. त्यातील सॅगर (रशियन नाव ९-एम-१४ माल्युत्का) हे क्षेपणास्त्र विशेष गाजले. ते अनेक देशांसह भारतीय सेनादलांतही वापरात होते. इजिप्तने १९७३ च्या योम किप्पूर युद्धात त्यांचा इस्रायली रणगाडय़ांविरोधात प्रभावी वापर केला होता. त्यानंतर इस्रायलने मर्कावा रणगाडा विकसित केला आणि त्यात सुरक्षेला अधिक महत्त्व दिले. रशियाचे ९-एम-१३३ कॉर्नेट (नाटो नाव एटी-१४ स्प्रिगन) हे अत्याधुनिक रणगाडाभेदी क्षेपणास्त्र आहे. ते १९९८ साली वापरात आले. त्यात थर्मोबॅरिक वॉरहेड, फायर अँड फर्गेट सिस्टम अशा अनेक अत्याधुनिक यंत्रणा वापरल्या आहेत.
sachin.diwan@ expressindia.com