रणगाडय़ांनी युद्धतंत्रात अनेक बदल घडवून आणले. रणगाडे शक्यतो एकटे लढत नाहीत. त्यांच्या बरोबरीला पायदळ असणेही गरजेचे असते. पण रणगाडय़ांच्या गतीपुढे पायदळ मागे पडू लागले. त्यामुळे पायदळालाही रणगाडय़ांच्या जोडीने वेगवान हालचाली करता याव्यात आणि शत्रूच्या माऱ्यापासून संरक्षण मिळावे म्हणून चिलखती वाहने तयार झाली. त्यात आर्मर्ड पर्सोनेल कॅरियर (एपीसी) आणि इन्फन्ट्री कॉम्बॅट / फायटिंग व्हेईकल (आयसीव्ही किंवा आयएफव्ही) या प्रकारच्या चिलखती वाहनांचा समावेश होतो. ही वाहने दिसायला साधारण रणगाडय़ासारखीच असली तरी ते रणगाडे नव्हेत. यांचा वापर सैन्याला युद्धभूमीवर नेण्यासाठी चिलखती टॅक्सीसारखा केला जातो.
आर्मर्ड पर्सोनेल कॅरियरचे चिलखती आवरण रणगाडय़ापेक्षा खूप कमी असते. ते सैनिकांना माफक संरक्षण पुरवते. यातून सैनिक केवळ युद्धभूमीवर वाहून नेता येतात. प्रत्यक्ष लढण्यासाठी सैनिकांना वाहनातून उतरून बाहेर यावे लागते. मात्र त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या वाहनांची युद्धभूमीवर गरज भासू लागली. त्यातून इन्फंट्री कॉम्बॅट किंवा फायटिंग व्हेईकल तयार झाल्या. आयएफव्हीमध्ये संरक्षण आवरण थोडे अधिक जाडीचे असते. त्यावर लढण्यासाठी मशिनगन आणि माफक क्षमतेच्या तोफा बसवलेल्या असतात. तसेच आतील सैनिकांना बाहेर उतरून लढण्याची गरज नसते. ते वाहनात सुरक्षित बसूनही त्यांच्या बंदुकांनी बाहेर मारा करू शकतात.
अशा प्रकारची पहिली वाहने सोव्हिएत युनियनने सर्वप्रथम १९६० च्या दशकात वापरात आणली. त्यातील पहिले वाहन म्हणजे बोवाया मशिना पेखोता किंवा बीएमपी-१. ही वाहने १९६६ साली सोव्हिएत सैन्याला मिळाली. त्यावर मशिनगन, तोफ यासह सॅगर नावाचे रणगाडाभेदी क्षेपणास्त्रही बसवले होते. ते ३ किमी अंतरावर मारा करू शकते. बीएमपी-१ मध्ये ३ कर्मचाऱ्यांसह ८ सैनिक वाहून नेता येत. हे वाहन ८० किमी प्रतितास वेगाने ३०० मैलांचा प्रवास करू शकते. त्यात सुधारणा करून बीएमपी-२ आणि बीएमपी-३ ही वाहने तयार केली गेली. बीएमपी-१ आणि बीएमपी-२ भारताकडेही आहेत. बीएमपी-२ मध्ये ६ सैनिक मावतात आणि त्यावर स्पँड्रेल रणगाडाभेदी क्षेपणास्त्र आहे. बीएमपी वाहने पाण्यातूनही प्रवास करू शकतात.
अमेरिकेने बीएमपी वाहनांना प्रतिसाद म्हणून ब्रॅडले एम-२ ही वाहने विकसित केली. त्यात सुधारणा होत १९७० आणि १९८० च्या दशकात ब्रॅडले वाहने कार्यान्वित झाली. बीएमपीच्या तुलनेत ब्रॅडले आकाराने अधिक मोठी आणि चिलखती आवरण अधिक असलेली आहे. ब्रॅडलेही पाण्यातून प्रवास करू शकते. त्यावर ‘टो’ (टीओडब्ल्यू – टय़ूब लाँच्ड, ऑप्टिकली ट्रॅक्ड, वायर गायडेड) नावाचे रणगाडाभेदी क्षेपणास्त्र आहे. ब्रॅडलेला अधिकाधिक संरक्षण पुरवण्याच्या नादात त्याचे वजन प्रमाणाबाहेर वाढते आहे. त्याने गतिमानतेवर परिणाम होत आहे. इराक आणि अफगाणिस्तानमधील कारवायांत अॅब्राम्स रणगाडय़ांच्या जोडीने ब्रॅडलेने महत्त्वाची कामगिरी केली.
sachin.diwan@expressindia.com