सचिन दिवाण
भारताने १९८३ साली हाती घेतलेल्या एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमांतर्गत पृथ्वी, अग्नि, नाग, त्रिशुळ आणि आकाश ही क्षेपणास्त्रे विकसित केली जात होती. ही क्षेपणास्त्रे बॅलिस्टिक प्रकारातील आहेत. दरम्यान, १९९१ साली अमेरिकेच्या नेतृत्वाखालील बहुराष्ट्रीय फौजांनी इराकच्या तावडीतून कुवेतच्या मुक्ततेसाठी ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म नावाने लष्करी कारवाई केली. त्यात अमेरिकेच्या टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्रांनी मोलाची कामगिरी बजावली. त्यानंतर भारतासह अनेक देशांना क्रूझ क्षपणास्त्रांचे महत्त्व पटले आणि भारताने रशियाच्या सहकार्याने ब्रह्मोस हे सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र विकसित करण्यास प्रारंभ केला. आज ते जगातील सर्वोत्तम क्रूझ क्षेपणास्त्र समजले जाते.
ब्रह्मोस हे नाव भारतातील ब्रह्मपुत्रा आणि रशियातील मॉस्क्वा या दोन नद्यांच्या नावांतील सुरुवातीची अक्षरे एकत्र करून बनवले आहे. ब्रह्मोसची रचना रशियाच्या पी-८०० ओनिक्स या क्षेपणास्त्रावर आधारित आहे. ब्रह्मोसच्या निर्मितीसाठी भारत आणि रशिया यांनी ब्रह्मोस एरोस्पेस लिमिटेड या संयुक्त कंपनीची स्थापना केली आहे.
ब्रह्मोसचे ६५ टक्के भाग रशियात तयार होतात. त्यात बुस्टर, रॅमजेट इंजिन, टार्गेट सीकर, होमिंग डिव्हाइस, कॅनिस्टर आदी भागांचा समावेश आहे. ब्रह्मोस हे दोन टप्प्यांचे (स्टेजेस) क्षेपणास्त्र आहे. त्यातील पहिला टप्पा घनरूप इंधनावर आधारित बुस्टरचा आहे. तर दुसरा टप्पा द्रवरूप इंधनावर आधारित रॅमजेट इंजिनाचा आहे. त्याला दिशादर्शनासाठी इनर्शिअल नेव्हिगेशन सिस्टिम आणि जीपीएस, ग्लोनास किंवा भारतीय गगन या कृत्रिम उपग्रहांवर आधारित प्रणाली वापरल्या जातात.
ब्रह्मोसचा पल्ला २९० किमी असून त्यावर ३०० किलो वजनाची पारंपरिक स्फोटके किंवा अण्वस्त्रे बसवता येतात. ब्रह्मोस सध्या जगातील सर्वात वेगवान आणि अचूक क्रूझ क्षेपणास्त्र मानले जाते. त्याचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा २.८ ते ३ पट आहे. म्हणजे ब्रह्मोस एका सेकंदात १ किमी अंतर पार करते. तसेच त्याची नेम चुकण्याची क्षमता (सक्र्युलर एरर प्रॉबेबिलिटी – सीईपी) १ मीटरपेक्षा कमी असल्याचा दावा केला जातो. म्हणजेच त्याची अचूकता ९९.९९ टक्के आहे. क्रूझ क्षेपणास्त्र असल्याने ब्रह्मोस जमिनीपासून कमी उंचीवरून प्रवास करून शत्रूच्या रडारला चकवा देऊ शकते. तसेच मार्ग बदलून क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणांपासून बचाव करून घेऊ शकते. ब्रह्मोस जमीन, पाणी तसेच हवेतून डागता येते. भारताच्या तिन्ही सेनादलांत आणि रशियाच्या सैन्यात ब्रह्मोस तैनात केले जात आहे.
मिसाइल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिजिम (एमटीसीआर) नावाच्या जागतिक करारानुसार ३०० किमीपेक्षा अधिक पल्ल्याच्या आणि ५०० किलोपेक्षा अधिक स्फोटके वाहून नेणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या तंत्रज्ञानाच्या प्रसाराला मनाई आहे. भारत या कराराचा सदस्य नव्हता. त्यामुळे ब्रह्मोसचा पल्ला २९० किमी सांगितला जात असे. २०१६ साली भारताला ‘एमटीसीआर’चे सदस्यत्व मिळाले. त्यानंतर ही बंधने संपली. आता भारत आणि रशिया ब्रह्मोसचा पल्ला ६०० ते ८०० किमीपर्यंत वाढवण्याचे तसेच त्याचा वेग माक-६ ते माक-७ इतका (म्हणजे ध्वनीच्या वेगापेक्षा ६ ते ७ पट अधिक) करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ब्रह्मोसची पुढील आवृत्ती हायपरसॉनिक असेल. सध्या ब्रह्मोसची ‘ईआर’ (एक्स्टेंडेड रेंज) आवृत्ती तयार केली असून तिचा पल्ला ४५० किमी आहे. व्हिएतनाम, फिलिपीन्स, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, ओमान आदी देश ब्रह्मोस विकत घेण्यास उत्सुक आहेत.
sachin.diwan@ expressindia.com