सचिन दिवाण
शीतयुद्धादरम्यान अमेरिका आणि सोव्हिएत युनियन त्यांच्यात प्रत्यक्ष युद्धाची ठिणगी पडली नव्हती. कारण दोन्ही देशांना माहिती होते की, एकाने अण्वस्त्रहल्ला केला तर दुसरा देशही तितक्याच ताकदीने प्रतिहल्ला करू शकतो आणि त्यात दोन्ही देशांचा किंबहुना पृथ्वीचा विनाश अटळ होता. याला ‘म्युच्युअली अॅशुअर्ड डिस्ट्रक्शन’ (मॅड) म्हणत. तो खरोखरच मूर्खपणा ठरला असता. पण त्याने जगात शांतता आणि सत्तासंतुलनही राहिले होते.
ही कोंडी फोडण्यासाठी दोन्ही देशांचे प्रयत्न सुरू होते. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रीगन हे या ‘मॅड’ संकल्पनेचे विरोधक होते. रीगन यांनी २३ मार्च १९८३ रोजी अमेरिकेच्या टेलिव्हिजनवरून केलेले भाषण खूप गाजले. त्यात त्यांनी म्हटले होते की, शास्त्रज्ञांनी आपल्याला अण्वस्त्रांच्या रूपात अमोघ अस्त्रे मिळवून दिली. आता शास्त्रज्ञांनी त्यांच्या उत्तम बुद्धिमत्तेचा वापर करून शत्रूची अण्वस्त्रे निष्प्रभ ठरवणारी अस्त्रेही विकसित करावीत. तत्पूर्वी अमेरिकी हायड्रोजन बॉम्बचे जनक मानले जाणारे अणुशास्त्रज्ञ एडवर्ड टेलर यांनी दिलेल्या व्याख्यानांमधून यासंदर्भात काही संकल्पना मांडल्या होत्या. अण्वस्त्रे आणि अन्य तंत्रज्ञान वापरून शत्रूची अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रे हवेतच पाडणे शक्य असल्याचे मत त्यांनी मांडले होते. रीगन यांनी त्यावर आधारित ‘स्ट्रॅटेजिक डिफेन्स इनिशिएटिव्ह’ (एसडीआय) किंवा ‘नॅशनल मिसाइल डिफेन्स’ (एनएमडी) हा कार्यक्रम जाहीर केला. डेमोक्रॅटिक पक्षाचे सिनेटर टेड केनेडी यांनी जॉर्ज ल्युकास यांच्या १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘स्टार वॉर्स’ नावाच्या चित्रपटावरून या प्रकल्पाचे नाव ‘स्टार वॉर्स’ असे ठेवले. अमेरिकी आणि जगभरच्या प्रसारमाध्यमांनी ‘एसडीआय’ऐवजी ‘स्टार वॉर्स’ हेच नाव अधिक उचलून धरले. या प्रकल्पाला ‘लेयर्ड डिफेन्स’ असेही म्हणतात, कारण त्यात शत्रूची क्षेपणास्त्रे पाडण्यासाठी जमिनीवर, पाण्यात आणि अंतराळात वेगवेगळ्या उंचीवरील थरांमध्ये (लेअर) लेझर किरण, गतिज ऊर्जेवर आधारित शस्त्रे (कायनेटिक एनर्जी वेपन्स), ती डागणारे कृत्रिम उपग्रह, क्षेपणास्त्रभेदी क्षेपणास्त्रे आदी शस्त्रास्त्रे तैनात केली जाणार होती.
सोव्हिएत युनियनची अण्वस्त्रधारी आंतरखंडीय क्षेपणास्त्रे अमेरिकेपर्यंत पोहोचण्यास साधारण ३० मिनिटांचा अवधी लागत असे. तितक्या वेळेत ते क्षेपणास्त्र शोधून नष्ट करणे गरजेचे होते. क्षेपणास्त्र डागल्यानंतर लगेच शोधण्यासाठी टेहळणीसाठीचे कृत्रिम उपग्रह आणि विमाने, जगभर पसरलेली जमिनीवरील आणि समुद्रातील रडार केंद्रे आदींचा वापर केला जाणार होता. एकदा क्षेपणास्त्रांचे स्थान आणि दिशा निश्चित झाली की त्यांना पाडण्याची यंत्रणा कार्यान्वित होणार होती. क्षेपणास्त्रांच्या प्रवासमार्गाची तीन टप्प्यांत विभागणी होते – बूस्ट फेज, मिड कोर्स आणि टर्मिनल फेज. क्षेपणास्त्र डागल्यानंतर वातावरणात ठरावीक उंची गाठेपर्यंत साधारण १० मिनिटे बूस्ट फेज चालते. त्यात त्याचा सुगावा लागणे कठीण असले तरी तेव्हाच ते पाडणे फायद्याचे असते. नंतर साधारण १५ मिनिटांच्या मधल्या टप्प्यात क्षेपणास्त्रभेदी यंत्रणांना चकवण्यासाठी क्षेपणास्त्रावर खऱ्या अण्वस्त्रांसह काही खोटी शस्त्रे (डेकॉय वॉरहेड्स) बसवलेली असतात. त्या पुंजक्यातून खरी अण्वस्त्रे ओळखून नष्ट करणे अवघड असते. अण्वस्त्रे वातावरणात पुन्हा प्रवेश करताना (री-एंट्री) खोटी शस्त्रे हवेशी घर्षणाने जळून जातात तर खरी अण्वस्त्रे उष्णतारोधी आवरणामुळे (हिट शिल्ड) वाचून लक्ष्यावर पडतात. ही टर्मिनल फेज ४ ते ५ मिनिटांत संपते. इतक्या कमी वेळेत अतिवेगवान अण्वस्त्राला नष्ट करण्याचे मोठे आव्हान होते.