सचिन दिवाण
संगणक, मोबाइल फोन आणि इंटरनेटच्या प्रसाराने जग बरेच एकत्र आले आहे. जगभरातील अब्जावधी नागरिक या साधनांनी जोडले गेले आहेत. संपर्क, दूरसंचार, दळणवळण, व्यापार, उद्योग,अभियांत्रिकी, शेअर बाजार, बँकिंग आणि अन्य वित्तसेवा, पाणी आणि वीजपुरवठा, वैद्यकीय सेवा, संशोधन, संरक्षण व्यवस्था अशा सर्वच क्षेत्रांत संगणकांचा आणि इंटरनेटचा मोठय़ा प्रमाणावर वापर होत आहे. मात्र या सुविधांच्या वाढत्या वापराबरोबर नवे धोकेही उत्पन्न होत आहेत. संगणक, मोबाइल फोन किंवा इंटरनेटवर आधारित सेवा-सुविधा यांची सुरक्षा व्यवस्था भेदून त्यावर संगणक व्हायरसद्वारे हल्ला करता येतो आणि त्याने शत्रूच्या आर्थिक, व्यापारी, औद्योगिक तसेच सुरक्षा व्यवस्थेचे मोठे नुकसान घडवता येते. अशा प्रकारच्या युद्धाला सायबर युद्ध म्हणतात.
सायबर युद्ध हे नेहमीच्या युद्धासारखे दृष्य स्वरूपात लढले जात नाही आणि त्यात रक्तरंजित कारवायाही होत नाहीत. मात्र त्याचे परिणाम तितकेच भयानक असू शकतात. शत्रूचे संगणक, अन्य उपकरणे आणि इंटरनेट सेवा व्हायरस हल्ला करून नष्ट किंवा निकामी करणे, त्यायोगे त्याचे आर्थिक, सामरिक नुकसान करणे असे सायबर युद्धाचे उद्दिष्ट असू शकते. तसेच शत्रूची गुप्त माहिती चोरणे, हेरगिरी करणे, प्रॉपगंडा (अपप्रचार) करून सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेत ढवळाढवळ करणे, सरकारविरुद्ध जनमत बनवणे असेही त्याचे हेतू असतात.
शत्रूची बस, रेल्वे, विमान आदी वाहतूक व्यवस्था नियंत्रित करणाऱ्या यंत्रणेवर सायबर हल्ला केला तर अनेक अपघात घडू शकतात. बँका, शेअर बाजार, विमा आणि अन्य वित्तीय सेवा यांच्याशी निगडित व्यवस्थेवर हल्ला केला तर आर्थिक व्यवहार कोलमडून मोठे नुकसान होऊ शकते. संगणक व्यवस्थेवर आघात करून शत्रूचा पाणी किंवा वीजपुरवठा प्रभावित करता येऊ शकतो. वैद्यकीय सेवांच्या संगणकीय जाळ्यात अफरातफर करून हजारो रुग्णांच्या जिवाशी खेळता येते. उद्योगधंद्यांच्या संगणकीय प्रणालीत फेरफार करून औद्योगिक उत्पादनावर परिणाम करता येऊ शकतो. राजकीय नेत्यांच्या ई-मेल हॅक करून निर्णयप्रक्रियेत व्यत्यय आणता येतो.
सायबर हल्ल्याचे तंत्र थेट संरक्षण व्यवस्थेविरुद्धही वापरता येते. सध्या अनेक देशांच्या लष्करी व्यवस्था, त्यांची निर्णय प्रक्रिया, संदेशवहन, शस्त्रास्त्रांचे संचालन, दिशादर्शन आही बाबी संगणक, कृत्रिम उपग्रह आणि इंटरनेटवर आधारित आहेत. त्यामध्ये संगणक व्हायरस सोडल्यास शत्रूच्या लढण्याच्या क्षमतेवर थेट परिणाम होतो. क्षेपणास्त्रे आणि अन्य शस्त्रास्त्रे लक्ष्यापासून भरकटू शकतात.
या सर्व गोष्टी आता केवळ शक्यतेच्या पातळीवर राहिल्या नसून त्यांचा दररोज कोठे ना कोठे वापर केला जात आहे. अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन, इस्रायल, भारत आदी देश त्यावर अधिकाधिक संशोधन करत असून आपापल्या क्षमता वाढवत आहेत. सीरिया, इराण, उत्तर कोरियासारखे देश आणि दहशतवादी संघटना जगभरात सायबर हल्ले करण्याचे कट रचत आहेत. इराणमधील नतान्झ येथील युरेनियम शुद्धीकरण प्रकल्पावर २०१० साली स्टक्सनेट नावाच्या संगणक व्हायरसचा हल्ला झाला. त्याने इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावार मोठा परिणाम झाला. हा हल्ला अमेरिका आणि इस्रायलने केल्याचे मानले जाते.
भविष्यात सर्वच प्रमुख देशांना अशा हल्ल्यांपासून बचावाची आणि गरज भासल्यास असे हल्ले करण्याची यंत्रणा उभी करावी लागणार आहे.
sachin.diwan@ expressindia.com