१९०४-०५ साली झालेल्या युद्धात आशियातील जपानसारख्या उदयोन्मुख देशाने रशियासारख्या मोठय़ा पाश्चिमात्य देशाचा पराभव केला. त्यातील सुशिमा सामुद्रधुनीतील सागरी युद्ध अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यात मोठय़ा तोफांनी सज्ज युद्धनौका आणि टॉर्पेडो बोट्सची उपयुक्तता सिद्ध झाली. यातून एक बाब लक्षात आली होती की, शत्रूच्या टॉर्पेडोंच्या कक्षेबाहेर राहून त्यांच्यावर मारा करायचा असेल तर मोठय़ा आणि लांब पल्ल्याच्या तोफांनी युक्त युद्धनौकांना पर्याय नव्हता. त्यातून एका विलक्षण सागरी शस्त्रस्पर्धेला सुरुवात झाली आणि ड्रेडनॉट युद्धनौकांचे युग अवतरले. त्या आधीच्या युद्धनौका प्री-ड्रेडनॉट बॅटलशिप्स म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
या काळापर्यंत विनाशिका, क्रुझर, फ्रिगेट, कॉव्र्हेट आदी नौका तयार होत असल्या तरी नौदलाच्या ताफ्यातील मुख्य अस्त्र (कॅपिटल शिप) म्हणून मोठय़ा युद्धनौकाच (बॅटलशिप) गणल्या जात होत्या. याबाबतीत वेगवेगळे मतप्रवाह होते. अमेरिकी नौदल अधिकारी आणि संरक्षणतज्ज्ञ आल्फ्रेड थेयर महान यांनी १८८९ साली ‘द इन्फ्लुएन्स ऑफ सी पॉवर अपॉन हिस्टरी’ या पुस्तकातून त्यांच्या संकल्पना मांडल्या. त्या आजही जगभरातील सागरी युद्धतज्ज्ञांकडून अभ्यासल्या जातात. महान यांच्या मते शत्रूच्या व्यापारी जहाजांवर धाडी टाकणे (कॉमर्स रेडिंग) हे नौदलाचे दुय्यम काम आहे. नौदलाने आपली मुख्य भिस्त मोठय़ा तोफांनी सज्ज युद्धनौकांवर ठेवली पाहिजे आणि समोरासमोरील सागरी युद्धात प्रतिपक्षाच्या नौदलाला नेस्तनाबूत करण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे. याउलट ब्रिटिश अॅडमिरल जॉन फिशर यांच्या मते नौदलाने पाणबुडय़ा आणि पाणसुरुंगांच्या मदतीने किनारे व बंदरांचे रक्षण करावे आणि बॅटल क्रुझर्सच्या मदतीने व्यापारी नौकांचे रक्षण करावे. पण नंतर फिशर यांनीही महान यांच्याप्रमाणे मोठय़ा युद्धनौकांचा पुरस्कार केला आणि १९०६ साली एचएमएस ड्रेडनॉट युद्धनौकेची निर्मिती केली. पदार्पणातच ड्रेडनॉटने अन्य सर्व प्रकारच्या युद्धनौकांना निष्प्रभ करून टाकले.
त्या काळात ब्रिटिश आणि अन्य युरोपीय साम्राज्यशाहींमध्ये सत्तास्पर्धा शिगेला पोहोचली होती. राष्ट्रीय शक्तीचे प्रदर्शन नौदलाच्या माध्यमातून करण्याची अहमहमिका लागली होती. नागरिकांचे गट सरकारवर दबाव आणत होते. ब्रिटिश नागरिकांमध्ये ड्रेडनॉट युद्धनौकांच्या बाबतीत त्या काळी एक घोषणा गाजत होती – ‘वुई वॉन्ट एट अॅण्ड वुई वोन्ट वेट!’ या जनरेटय़ापुढे झुकून ब्रिटिश फर्स्ट लॉर्ड ऑफ अॅडमिराल्टी विंस्टन चर्चिल यांनीही महाकाय युद्धनौकांच्या बांधणीला चालना दिली.
sachin.diwan@ expressindia.com