सचिन दिवाण
दुसऱ्या महायुद्धातील १९४१-४२ नंतरचा काळ. हिटलरचे ब्रिटन आणि रशियावरील आक्रमण फसत चालले होते. जर्मन विमानांनी ब्रिटनवर अहोरात्र बॉम्बवर्षांव करूनही ब्रिटन हार मानायला तयार नव्हते. बॅटल ऑफ ब्रिटनमध्ये जर्मनीच्या विमानांचे आणि वैमानिकांचे नुकसान वाढत चालले होते. ब्रिटिश हवाई दलाने २८ मार्च १९४२ रोजी जर्मनीतील ल्युबेक शहरावर केलेल्या बॉम्बहल्ल्यात २०० एकर क्षेत्रफळातील इमारती पूर्ण नष्ट झाल्या. अशा हल्ल्यांनी चवताळलेल्या हिटलरने बदला घेण्याची शस्त्रे वापरण्यास परवानगी दिली. या शस्त्रांचे नाव होते फर्गेलतुंग्जवाफ-१ आणि २. जर्मन फर्गेलतुंग्जवाफ या शब्दाचा अर्थच बदल्याचे शस्त्र (व्हेंजन्स वेपन) असा होतो. हिच ती जगातील पहिली क्षेपणास्त्रे व्ही-१ आणि व्ही-२.
जर्मनीच्या उत्तरेला बाल्टिक समुद्राच्या किनाऱ्याजवळ पीनमुंड या ठिकाणी मिठाच्या जुन्या भूमिगत खाणीत हिटलरने त्याच्या गुप्त शस्त्रांचा कारखाना चालवला होता. वर्नर व्हॉन ब्राऊन आणि वॉल्टर डॉर्नबर्गर या शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखाली तेथे व्ही-१ आणि व्ही-२ क्षेपणास्त्रांची निर्मिती होत होती. व्ही-१ फ्लाइंग बॉम्ब म्हणजे जगातील पहिले क्रूझ क्षेपणास्त्र होते तर व्ही-२ हे पहिले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र होते. व्ही-१ दिसायला ड्रोनसारखे होते. त्याची लांबी ८ मीटर आणि रुंदी ५.५ मीटर होती. त्याच्यावर ८५० किलो स्फोटके बसवता येत. ते ताशी ५८० किमीच्या वेगाने २४० किमीपर्यंत मारा करू शकत असे. पॉल श्मि यांनी विकसित केलेल्या पल्स जेट इंजिनाद्वारे त्याला गती मिळत होती. या इंजिनांच्या आवाजामुळे त्याला बझ बॉम्ब किंवा डुडलबग म्हटले जात असे. १३ जून १९४४ ते २९ मार्च १९४५ या काळात जर्मनीने ब्रिटन आणि बेल्जियमवर ८००० व्ही-१ क्षेपणास्त्रांचा मारा केला. त्यापैकी केवळ २४०० क्षेपणास्त्रे लक्ष्यांच्या आसपास पडली. अनेक व्ही-१ हवेत पाडण्यात आली.
व्ही-२ क्षेपणास्त्राची पहिली यशस्वी चाचणी ३ ऑक्टोबर १९४२ साली पार पडली. व्ही-२ ची उंची १४ मीटर आणि वजन साधारण १३,००० किलो होते. ते साधारण १००० किलो स्फोटकांसह ३२० किमीवर मारा करू शकत असे. प्रवासादरम्यात ते ८० किमी उंची गाठत असे. त्यात अल्कोहोल आणि द्रवरूप ऑक्सिजन इंधन म्हणून वापरले होते. त्याचे नियंत्रण गायरोस्कोप आणि रेडिओद्वारे होत असे.
हिटलरने १९४४-४५ मध्ये ब्रिटन, फ्रान्स आणि बेल्जियमवर मोठय़ा प्रमाणात व्ही-२ क्षेपणास्त्रांचा मारा केला. मात्र व्ही-१ आणि व्ही-२ क्षेपणास्त्रांची अचूकता फारशी चांगली नव्हती. त्यांनी प्रत्यक्ष युद्धावर फारसा फरक पडला नाही. एका व्ही-२ क्षेपणास्त्राच्या माऱ्यात सरासरी १.७६ माणसे मरत होती. तर एका व्ही-२च्या निर्मितीसाठी ६ माणसे मरत होती. या प्रकल्पासाठी जर्मनीने कैद्यांच्या श्रमांचा वापर केला होता. त्यातील अनेक जण कामाच्या हलाखीच्या स्थितीमुळे मरण पावत. मात्र या क्षेपणास्त्रांनी शस्त्रास्त्रांचे नवे दालन उघडले.
sachin.diwan@ expressindia.com