सचिन दिवाण sachin.diwan@ expressindia.com
पारंपरिक स्फोटके, अण्वस्त्रे, रासायनिक आणि जैविक अस्त्रे ही विध्वंसक सामग्री शत्रूपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक साधने लागतात. त्यात तोफा, विमाने आणि क्षेपणास्त्रांचा प्रामुख्याने समावेश होतो. त्यांना वेपन्स डिलिव्हरी व्हेइकल्स किंवा सिस्टीम म्हणतात. त्यांच्याशिवाय नुसती स्फोटके कुचकामी ठरतात. अण्वस्त्रांनी शस्त्रांना सर्वाधिक संहारकता मिळवून दिली. लेझर गायडेड बॉम्बने अचूकता दिली, तर क्षेपणास्त्रांनी शस्त्रांचा पल्ला हजारो किलोमीटपर्यंत वाढवला. स्वत:च्या वैमानिकांचा जीव धोक्यात न घालता शत्रुप्रदेशात खोलवर, खात्रीशीर हल्ले करण्याची क्षमता दिली.
एखाद्या वस्तूला पुढे ढकलण्यासाठी पुरेशी ऊर्जा (थ्रस्ट) दिली, की ती वस्तू पृथ्वीच्या कक्षेत किंवा गुरुत्वाकर्षणाच्या मर्यादेपलीकडे नेऊन ठेवता येऊ शकते हे शास्त्रज्ञांना तात्त्विकदृष्टय़ा माहीत झाले होते. न्यूटनच्या गतीविषयक तिसऱ्या नियमानुसार प्रत्येक क्रियेला तितकीच आणि उलट दिशेने प्रतिक्रिया होत असते. या तत्त्वाचा येथे वापर होतो. मात्र प्रत्यक्ष तसे करण्यात अनेक अडचणी होत्या. इतकी ऊर्जा निर्माण करणारी रसायने, त्यांच्या ज्वलनातून निर्माण होणारी प्रचंड उष्णता हाताळू शकणारे धातू, या शक्तीतून तयार होणारा वेग आणि दाब सहन करू शकणारी अवकाश वाहने, त्यांच्यासाठी नियंत्रण, दिशादर्शन आणि संदेश यंत्रणा तयार करणे ही मोठी आव्हाने होती.
या आव्हानांवर मात करण्यासाठी जगात अनेक शास्त्रज्ञ प्रयत्न करत होते. त्यात रशियातील कॉन्स्टंटिन त्सिओलकोव्हस्की, जर्मनीतील हर्मन ऑबर्थ आणि अमेरिकेतील रॉबर्ट गोडार्ड यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागते. ऑरविल आणि विल्बर राइट बंधू १९०३ साली विमानाचे उड्डाण करत होते त्याच काळात रशियात त्सिओलकोव्हस्की यांनी अंतराळ प्रवासाची बरीच सैद्धांतिक मांडणी केली होती. अग्निबाणाच्या रचनेत टप्प्यांचा (स्टेजेस) वापर करता येईल, त्यात द्रवरूप हायड्रोजन आणि ऑक्सिजन वापरता येऊ शकेल अशी अनेक तत्त्वे त्यांनी मांडली. गोडार्ड यांनी अग्निबाणाची सुरुवातीची मॉडेल्स बनवली आणि त्यांच्या चाचण्या घेतल्या. गोडार्ड यांचे पहिले द्रवरूप इंधनावर चालणारे रॉकेट १९२६ साली केवळ ४१ फूट उंच उडू शकले. मात्र त्यांनी १९३० मध्ये २००० फूट आणि १९३५ मध्ये ७५०० फुटांपर्यंत मजल मारली. याच दरम्यान खगोलशास्त्रज्ञ जोहान्स केपलर, विज्ञानकथा लेखक ज्यूल्स व्हर्न यांच्या लिखाणातून समाजात अंतराळप्रवासाबद्दल उत्सुकता निर्माण होत होती. युरोप, रशिया, अमेरिकेत अनेक शहरांत हौशी लोकांनी स्पेस आणि रॉकेट क्लब स्थापन केले होते. जर्मनीतील सोसायटी फॉर स्पेस ट्रॅव्हलने १९३१-३२ सालात बर्लिनच्या उपनगरात हौशी रॉकेट निर्मात्यांसाठी कार्यक्रम आयोजित केले. त्यात १०० च्या आसपास रॉकेट उडवली गेली. ती हवेत साधारण दीड किलोमीटर उंचीवर पोहोचली. ही प्रात्यक्षिके पाहण्यास जर्मन सेनादलांचे अधिकारीही उपस्थित होते. या हौशी रॉकेटनिर्मात्यांना निरीक्षणाखाली ठेवण्याच्या उद्देशाने जर्मन लष्कराने त्यांना कार्यक्रम आखून दिला. त्या उत्साही तरुणांमध्ये एक नाव होते- वर्नर व्हॉन ब्राऊन. हाच पुढे नाझी जर्मनीच्या आणि जगातील पहिल्या व्ही-१ आणि व्ही-२ या क्षेपणास्त्रांचा जनक बनला.