सचिन दिवाण
शौर्य हे भारताचे हायपरसॉनिक, म्हणजे ध्वनीच्या गतीच्या पाचपटपेक्षा अधिक वेगाने प्रवास करणारे क्षेपणास्त्र आहे. पाणबुडीतून डागता येणाऱ्या के-१५ सागरिका या क्षेपणास्त्राची ही जमिनीवरून डागता येणारी आवृत्ती असल्याचे मानले जाते. शौर्यचा पल्ला ७०० किमी असून तो गाठण्यास त्याला ५०० ते ७०० सेकंद लागतात. त्यावर पारंपरिक स्फोटके किंवा अण्वस्त्रे बसवता येतात. हे क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून (डीआरडीओ) विकसित केले जात आहे.
शौर्यच्या निर्मितीत अनेक अत्याधुनिक यंत्रणांचा वापर केला आहे. त्याचा आकार खूप आटोपशीर आहे. त्याचा व्यास कमी असल्याने त्याला हवेचा अवरोध कमी होतो. ते एकाच ट्रकवर बसून डागता येते. त्यामुळे वाहतुकीस सुलभ आहे आणि शत्रूला सहजपणे दिसत नाही. ते कॉम्पोझिट फायबर ग्लासपासून बनवलेल्या विशेष कॅनिस्टरमधून डागले जाते. त्यासाठी उच्च दाब असलेले वायू वापरले जातात. त्यानंतर क्षेपणास्त्राच्या मुख्य इंधनाचे ज्वलन होऊन त्याला गती मिळते. क्षेपणास्त्राच्या यशस्वी प्रक्षेपणासाठी या गॅस जनरेटरचे कार्य अत्यंत महत्त्वाचे असते. ही प्रणाली आपले काम करण्यात अयशस्वी ठरली तर अनेक यंत्रणांचा स्फोट होऊ शकतो. त्यामुळे त्यात ९९.९९७ टक्के अचूकता राखली आहे. ते तंत्रज्ञान पुण्यातील हाय एनर्जी मटेरिअल्स रिसर्च लॅबोरेटरीने (एचएमईआरएल) विकसित केले आहे.
शौर्य घनरूप इंधनावर आधारित, दोन टप्प्यांचे (स्टेजेस) क्षेपणास्त्र आहे. शौर्यची खासियत म्हणजे त्याचा प्रवासमार्ग (ट्रॅजेक्टरी) संमिश्र (हायब्रिड) आहे. तो पूर्णपणे बॅलिस्टिक क्षेपणास्त्रासारखा नाही. बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना एकदा रॉकेटने गती दिली की तोफगोळ्यासारखी वक्राकार (इलिप्टिकल) मार्गाने प्रवास करतात. तो मार्ग मध्ये बदलता येत नाही. त्यामुळे बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या प्रवासमार्गाचा अंदाज बांधता येतो आणि त्यानुसार त्यांना पाडण्यास मदत होते. मात्र शौर्य क्षेपणास्त्र सुरुवातीला बॅलिस्टिक क्षेपणास्त्राप्रमाणे उंचावर भिरकावले जाते आणि नंतर ते क्रूझ क्षेपणास्त्राप्रमाणे वातावरणात ग्लायडरसारखा प्रवास करू शकते. म्हणजेच ते प्रवासादरम्यान त्याचा मार्ग बदलू शकते. शौर्य ध्वनीच्या साधारण ६ पट वेगाने (माक ६) प्रवास करते आणि वाटेत मार्ग बदलू शकते. त्यामुळे ते पाडण्यास अत्यंत अवघड आहे.
शौर्यच्या दिशादर्शनासाठी (नेव्हिगेशन अँड गायडन्स) रिंग लेझर जायरोस्कोपचा वापर केला आहे. हे तंत्रज्ञान अत्यंत उच्च दर्जाचे आणि संवेदनशील असून ते कोणताही देश भारताला देण्यास तयार नव्हता. त्यामुळे ते देशांतर्गत विकसित करण्यात आले आहे. डीआरडीओच्या रिसर्च सेंटर इमारत (आरसीआय) या केंद्रात ते तयार करण्यात आले आहे.
भविष्यातील युद्धात शत्रूवर वरचष्मा मिळवण्यासाठी हायपरसॉनिक वेगाने हल्ला करणाऱ्या शस्त्रांना खूप महत्त्व असणार आहे. प्रचंड वेग आणि मार्ग बदलण्याची क्षमता यामुळे ती पाडण्यास अवघड आहेत आणि लक्ष्यावर खात्रीशीरपणे हल्ला करू शकतात. ती वापरून शत्रूवर पहिल्या टप्प्यात झंझावाती हल्ले करता येतात. त्यामुळे सेनादलांच्या भात्यात शौर्य क्षेपणास्त्राचे स्थान मोलाचे आहे.
sachin.diwan@ expressindia.com