सचिन दिवाण
दुसऱ्या महायुद्धात जर्मनीच्या पडत्या काळात व्ही-१ आणि व्ही-२ क्षेपणास्त्रे, तसेच मेसरश्मिट-२६२ जेट विमाने देशाला तारतील, असा हिटलरचा विश्वास होता; पण तो फोल ठरला. १९४५ सालापर्यंत जर्मनीची सर्वत्र पीछेहाट होत होती. पूर्वेकडून सोव्हिएत युनियनने मुसंडी मारली होती, तर पश्चिमेकडून अमेरिका, ब्रिटनचे सैन्य बर्लिनच्या रोखाने आगेकूच करत होते.
या तिन्ही देशांना हिटलरच्या व्ही-२ क्षेपणास्त्रांमध्ये खूप स्वारस्य होते. त्यासाठी पीनमुंड येथील क्षेपणास्त्र प्रकल्पापर्यंत सर्वात आधी पोहोचण्याची शर्यत लागली होती. ती अमेरिकेने थोडक्यात जिंकली. त्यानंतर २४ तासांत तेथे रशियन सैन्य पोहोचले. त्यांनी उरलेले शास्त्रज्ञ आणि सुटे भाग नेले. ब्रिटिशांच्या हाती फारसे काही लागले नाही. जगातील सुरुवातीची अनेक क्षेपणास्त्रे मूळ जर्मन व्ही-२ क्षेपणास्त्रांवरून विकसित केली गेली आहेत.
अमेरिकी सैन्याचे कर्नल (नंतर मेजर जनरल) होल्गर टॉफ्टॉय यांच्या पथकाला व्ही-२ चा खजिना मिळाला. त्यांना १०० व्ही-२ क्षेपणास्त्रांची जुळणी करता येतील इतके सुटे भाग आणि १२० जर्मन शास्त्रज्ञ अमेरिकेत आणण्याची आज्ञा मिळाली. त्यात वर्नर व्हॉन ब्राऊन आणि वॉल्टर डॉर्नबर्गर यांचाही समावेश होता. वास्तविक ब्राऊन हे हिटलरच्या एसएस संघटनेचे सदस्य आणि डॉर्नबर्गर लष्करी अधिकारी होते; पण त्यांचे क्षेपणास्त्र तंत्रज्ञानातील ज्ञान पाहता त्यांच्या गुन्ह्य़ांकडे दुर्लक्ष केले गेले. अमेरिकेने ऑपरेशन पेपरक्लिपच्या अंतर्गत या शास्त्रज्ञांना तसेच १७ जहाजे भरून व्ही-२ चे सुटे भाग अमेरिकेत आणले. वर्नर व्हॉन ब्राऊन यांच्या नेतृत्वाखाली हंट्सविले, अलाबामामधील रेडस्टोन आर्सेनल येथे आर्मी बॅलिस्टिक मिसाइल एजन्सीची स्थापना करण्यात आली.
यातून अमेरिकेने रेडस्टोन नावाचे अग्निबाण आणि क्षेपणास्त्रे विकसित केली. त्याची फ्लोरिडातील केप कॅनाव्हरेल येथून १९५३ साली चाचणी घेण्यात आली. ५ मे १९६१ रोजी रेडस्टोन प्रक्षेपकामधूनच अमेरिकेचे पहिले अंतराळवीर अॅलन शेपर्ड यांनी अंतराळात उड्डाण केले. मात्र हा प्रक्षेपक फारसा शक्तिशाली नव्हता. त्यातून शेपर्ड यांनी अंतराळात १८६ किमी उंचीवर प्रवास केला.
रेडस्टोनचा वापर क्षेपणास्त्रे बनवण्यासाठीही केला गेला. त्यातून तयार झालेले रेडस्टोन क्षेपणास्त्र अमेरिकी सेनादलांत १९५८ ते १९६४ या काळात वापरात होते. ते २८६० किलो स्फोटकांसह ३२३ किमीपर्यंत मारा करू शकत असे. त्यावरूनच पुढे अमेरिकेने ज्युपिटर-सी हा अग्निबाण विकसित केला.
sachin.diwan@expressindia.com