सचिन दिवाण
हिटलरच्या व्ही-२ क्षेपणास्त्रांचे तंत्रज्ञान मिळवण्यात अमेरिकेपाठोपाठ सोव्हिएत युनियनचा फायदा झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस अमेरिकेनंतर लगेचच सोव्हिएत सैन्य जर्मनीतील पीनमुंड येथील व्ही-२ क्षेपणास्त्र प्रकल्पात पोहोचले. त्यांनी उरलेसुरले शास्त्रज्ञ आणि क्षेपणास्त्रांचे सुटे भाग हस्तगत केले.
तत्पूर्वीही सोव्हिएत युनियनमध्ये अग्निबाण तंत्रज्ञानावर संशोधन सुरू होते. त्यात मॉस्को ग्रुप फॉर स्टडी ऑफ रिअॅक्शन मोशन यांसारख्या क्लबचे योगदान मोठे होते. सर्गेई कोरोलेव्ह हे या क्लबचे संस्थापक सदस्य होते. त्यांची गुणवत्ता हेरून लाल सेनेचे मार्शल मिखाईल तुखाचेव्हस्की यांनी त्यांना रॉकेट रिसर्च इन्स्टिटय़ूटमध्ये कामाची संधी दिली. तुखाचेव्हस्की यांना या तंत्रज्ञानाच्या लष्करी वापरात रस होता. त्यांच्यासह सर्गेई कोरोलेव्ह आदी अग्निबाण तज्ज्ञ यावर काम करत होते. मात्र १९३७ नंतर अशा अनेक संशोधकांवर सोव्हिएत सर्वेसर्वा स्टालिनची मर्जी फिरली. अनेक लष्करी अधिकारी आणि संशोधकांना नुसत्या संशयावरून गुलाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छळछावण्यांत पाठवण्यात आले. तेथे काही वर्षे काढून सर्गेई कोरोलेव्ह यांची मुक्तता झाली. कोरोलेव्ह यांनी व्हलेंटिन ग्लुश्को यांच्यासारख्या तंत्रज्ञांच्या मदतीने सोव्हिएत अंतराळ संशोधन आणि अग्निबाण कार्यक्रम पुन्हा सुरू केला. त्याला जर्मन व्ही-२ तंत्रज्ञानाची जोड मिळाली.
१९५० पर्यंत सोव्हिएत युनियनच्या रॉकेटमध्ये ९०,००० किलो थ्रस्ट उत्पन्न करण्याची क्षमता आली होती. त्या तुलनेत अमेरिकी रेडस्टोन रॉकेट ३५,००० किलो थ्रस्ट उत्पन्न करत असे. कोरोलेव्ह यांच्या नेतृत्वाखाली सोव्हिएत आर-७ सेम्योर्का रॉकेट तयार झाले. त्यात पाच रॉकेट मोटर्स एकत्र बसवण्यात आल्या होत्या. याच आर-७ रॉकेटवरून सोव्हिएत युनियनचे सुरुवातीचे उपग्रह प्रक्षेपक आणि क्षेपणास्त्रे विकसित करण्यात आली.
सोव्हिएत युनियनने ४ ऑक्टोबर १९५७ रोजी स्पुटनिक-१ हा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडला. त्यासाठी हेच आर-७ रॉकेट वापरण्यात आले होते. १२ एप्रिल १९६१ रोजी युरी गागारीन यांनी वोस्तोक-१ यानातून अवकाशात भरारी मारली. ते पहिले अंतराळवीर बनले. या उड्डाणासाठी वापरलेले प्रक्षेपकही आर-७ रॉकेटवरूनच विकसित केले होते.
याच आर-७ रॉकेटवरून सोव्हिएत युनियनची सुरुवातीची एसएस-१ स्कुनर, एसएस-२ सिब्लिंग, एसएस-३ शायस्टर, एसएस-४ सँडेल, एसएस-५ स्कीआन, एसएस-६ सॅपवूड, एसएस-७ सॅडलर आदी क्षेपणास्त्रे तयार करण्यात आली.