सचिन दिवाण
आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबर युद्धभूमीचे यांत्रिकीकरण (मेकॅनायझेशन ऑफ बॅटलफिल्ड) होऊ लागले आहे. सैनिकांसाठी धोकादायक असलेली अनेक कामे यंत्रांच्या किंवा यंत्रमानवाच्या मदतीने पार पाडली जात आहेत. कृत्रिम उपग्रह, संगणक, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, इंटरनेट यांच्या वापरातून युद्धभूमीचे अधिक प्रभावी व्यवस्थापन (बॅटलफिल्ड मॅनेजमेंट) करता येत आहे. त्यासाठी अनेक व्यवस्था तयार होत आहेत.
युद्धात सैन्याचे प्रभावी नेतृत्व करण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी सेनापतींना भोवतालच्या क्षेत्राची क्षणाक्षणाला बदलणारी योग्य माहिती (रिअल टाइम सिच्युएशनल अवेअरनेस) मिळणे गरजेचे असते. त्यासाठी पूर्वी छापिल नकाशे आणि टेहळणी करणारी सैनिकी पथके उपलब्ध होती. आता सीमेवरील शत्रूच्या हालचाली टिपण्यासाठी अनेक प्रकारचे संवेदक (सेन्सर्स) उपलब्ध आहेत. ही इलेक्ट्रॉनिक उपकरणे जमिनीत पुरुन ठेवता येतात. त्यांच्या आसपासच्या ठरावीक परिघातील शत्रूच्या अस्तित्वाच्या खुणा टिपतात आणि विविध प्रकारे त्याची सूचना संगणकीकृत नियंत्रण कक्षाला देतात. सिस्मिक सेन्सर भूकंपाची जमिनीतील कंपने टिपण्यासाठीच्या यंत्रांसारखे काम करतात. ते शत्रूसैनिकांच्या चालण्याने जमिनीत निर्माण होणारी हलकीशी कंपनेही टिपतात. चुंबकीय संवेदक (मॅग्नेटिक सेन्सर) त्यांच्या जवळपासच्या भागातून जाणारी वाहने, शस्त्रे, औजारे आदी धातूच्या वस्तूंची सूचना देतात. रासायनिक संवेदक (केमिकल सेन्सर) वाहनांचा धूर टिपतात. त्या धुरातील हायड्रोकार्बन घटकांचे पृथक्करण करून शेजारून गेलेले वाहन पेट्रोलवर चालणारे होते की डिझेलवर हेदेखिल ओळखू शकतात. इतकेच नव्हे तर शत्रूसैनिकांनी जमिनीवर लघुशंका केल्यास त्यातील रासायनिक घटकांचा वेध घेऊन नियंत्रण कक्षाला संदेश पाठवतात. त्यामुळे सीमेवर सतत खडा पहारा न ठेवताही टेहळणी करणे शक्य झाले आहे. उष्णतावेधी उपकरणे (थर्मल इमेजर्स) आणि अंधारात पाहता येण्यासाठीची उपकरणे (नाइट व्हिजन डिव्हायसेस आणि इन्फ्रारेड इमेज इन्टेसिफायर्स) यांच्या मदतीने रात्रीच्या वेळीही कारवाया करणे शक्य झाले आहे.
टेहळणी करणारी विमाने आणि ड्रोन, हेरगिरी करणारे उपग्रह, शक्तिशाली रडारच्या मदतीने हवाई टेहळणी करणारी आणि हल्ल्याची आगाऊ सूचना देणारी विमाने (एअरबोर्न अरली वॉर्निग अँड कंट्रोल सिस्टिम – अव्ॉक्स), उपग्रहांवर आधारित ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम (जीपीएस) यांच्या माध्यमातून युद्धभूमीवर क्षणाक्षणाला घडणारे बदल सेनापतींना ताबडतोब कळतात. मोबाइल फोन, सॅटेलाइट फोन, संगणक, इंटरनेट अशा साधनांद्वारे संपर्कव्यवस्थेत कमालीची सुधारणा झाली आहे. अशा प्रकारे युद्धआघाडीवरील सैनिक, त्यांचे फिल्ड कमांडर्स, त्यामागील फळीत असणारे वरिष्ठ अधिकारी आणि अखेर राजकीय नेतृत्व यांच्यात सतत संपर्क होत असतो. तसेच क्षेपणास्त्रे, लढाऊ विमाने, रणगाडे, तोफखाना आणि युद्धनौका संगणकीकृत यंत्रणेद्वारे नियंत्रित करता येतात. त्यामुळे युद्धाशी संबंधित निर्णय घेणारे आणि प्रत्यक्ष कारवाई करणारे सर्व घटक संपर्कयंत्रणेच्या एका जाळ्यात प्रभावीपणे गुंफलेले असतात. कमांड, कंट्रोल, कम्युनिकेशन, कम्प्युटर्स अँड इंटेलिजन्स (गुप्त माहिती) या घटकांवर आधारित ‘सी४आय’ यांसारख्या बॅटलफिल्ड मॅनेजमेंट सिस्टिम (युद्धभूमी व्यवस्थापन व्यवस्था) वापरल्या जात आहेत. त्यातून नेटवर्क-सेंट्रिक वॉरफेअर आणि रेव्होल्युशन इन मिलिटरी अफेअर्स (आरएमए) अशा संकल्पना आकारास येत आहेत. त्यांनी भविष्यातील युद्धभूमीचा ताबा घेण्यास सुरुवात केली आहे.
sachin.diwan@ expressindia.com