‘ब्रूटस, यू टू..?’ असे रोमन सम्राट ज्युलियस सीझर याच्या तोंडून अखेरचे शब्द उमटले ते त्याचा मित्र आणि रोमन सिनेटर ब्रूटस याने अन्य सरदारांच्या साथीने सीझरच्या शरीरात खंजीर खुपसला तेव्हा. जगाच्या इतिहासात तो प्रसंग आणि ते शब्द कायमचे नोंदले गेले आहेत. मात्र इतक्या ऐतिहासिक घटनेच्या मागे होते ते एक लहानसे पण प्रभावी शस्त्र.. खंजीर (डॅगर). त्या प्रसंगात जो खंजीर वापरला तो रोमन ‘प्युजिओ’ या प्रकारचा होता.
खंजीर हा तलवारीपेक्षा लहान पण आकाराने साधारण तसाच शस्त्रप्रकार. अटीतटीच्या प्रसंगी स्वसंरक्षणाचे किंवा प्रसंगी लपून हल्ला करण्याचे हत्यार म्हणून त्याचा वापर होत असे. त्याच्या लहान आकारामुळे तो अंगरख्यात लपवणे सहज शक्य होत असे. हातघाईच्या लढाईत खंजिरासारख्या शस्त्रांना अत्यंत महत्त्व आहे. प्रतापगडावरील भेटीत अफझलखानाने शिवाजी महाराजांच्या पाठीत केलेला पण चिलखतामुळे हुकलेला खंजिराचा वार सर्वपरिचित आहे. त्यानंतर शिवाजींनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी वापरलेली वाघनखे हादेखील खंजिराचाच एक सुधारित प्रकार मानला जातो.
खंजिरांचे देशोदेशी अनेक प्रकार पाहायला मिळतात. त्यात खंजीर, कटय़ार, जंबिया, बिचवा, गुप्ती अशा शस्त्रांचा समावेश होतो. युरोपमध्ये रेपियर तलवारीच्या काळात तशाच आकाराचे पण आकाराने लहान रुंदीला बारीक, अणुकुचीदार ‘स्टिलेटो’ नावाचे खंजीर वापरले जात. याच स्टिलेटो खंजिरावरून आजच्या महिलांच्या उंच टाचांच्या चपलांचा (हाय हिल्स) एक प्रकार बनलेला आहे. त्यात टाचेचा भाग खूप उंच आणि तळाला टोकदार असतो. हा प्रकारही ‘कटय़ार काळजात घुसली’ याची प्रचीती देणाराच असतो.
कटय़ार आणि कटार यात थोडासा फरक आहे. कटारीचे पाते लांबट त्रिकोणी असते आणि तिची मूठ इंग्रजीतील कॅपिटल ‘एच’ (H) या अक्षराच्या आकाराची असते. महिला आणि पुरुषांसाठी वापराच्या कटारी वेगवेगळ्या असत. पुरुषांच्या कटारीचे पाते थोडे जास्त रुंद असे. महिलांच्या कटारी अरुंद असत. कटार हा मूळचा अरबी शस्त्रप्रकार आहे. तर कटय़ारीचे पाते काहीसे बाकदार असते आणि तिची मूठ दंडगोलाकार असून बरेचदा सजवलेली असते. बिचव्याचे पाते इंग्रजी ‘एस’ (S) अक्षरासारखे दुहेरी वळणाचे असे आणि त्याची मूठ शक्यतो लांबट कडय़ासारखी (loop) असते.
जंबिया हा मूळचा येमेनमधील शस्त्रप्रकार असून त्याचे पाते मुठीकडे सरळ आणि पुढे टोकाला वळलेले असते. त्याच्या मुठीला ‘सैफानी’ असे म्हणतात आणि ती गेंडय़ाच्या शिंगापासून आणि म्यान लाकडापासून बनवतात. भारतात ‘माडू’ नावाचे एक खंजिरासारखे हत्यार असे. त्यात मध्ये मूठ असून त्याच्या दोन्ही बाजूंना काळविटाची टोकदार शिंगे जोडलेली असत. हे शस्त्र फिरवताना दोन्ही बाजूंनी खुपसता येत असे.
याशिवाय भारतातील शिखांचे कृपाण हादेखील खंजिराचाच एक प्रकार. त्याला शीख धर्मात खूप महत्त्वाचे स्थान आहे. ते स्वसंरक्षणाचे हत्यार म्हणून वापरले जाते. आधुनिक काळातही बंदुकीच्या पुढे लावले जाणारे संगीन (बायोनेट किंवा बेनट) हाही खंजिराचाच सुधारित अवतार. एखादे ठाणे सर करताना किंवा खंदकात उतरून हातघाईची लढाई करताना त्याचा योग्य वापर होतो. नेपाळच्या गोरखा सैनिकांकडून वापरली जाणारी कुकरी (नेपाळी भाषेत खुकुरी) हादेखिल खंजिराचाच एक प्रकार मानला जातो. तो स्वतंत्रपणे हाताळण्याचा विषय आहे.
sachin.diwan@expressindia.com