मानवाला अमरत्व प्रदान करण्याच्या प्रयत्नांतून जन्माला आलेले रसायन सर्वाधिक माणसांचा जीव घेण्यास कारणीभूत ठरावे हा केवढा विरोधाभास! शेकडो वर्षांपासून माणसाला अमरत्वाचे आणि सोन्याचे आकर्षण आहे. माणसाला अमर बनवण्यासाठी आणि अन्य धातूंचे सोन्यात रूपांतर करण्याच्या हेतूने जगभरात शेकडो वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. हे प्रयोग पद्धतशीर संशोधन म्हणावे अशा स्वरूपाचे नव्हते. अनेक जणांनी, वेगवेगळ्या काळात, ठिकठिकाणी विविध प्रयोग केले. तसे प्रयोग करणाऱ्यांना ‘अल्केमिस्ट’ किंवा ‘किमयागार’ म्हणत आणि या एकत्रित प्रयत्नांना ‘अल्केमी’ म्हणून संबोधले जाते. असेच प्रयत्न करत असताना चीनमधील किमयागारांनी साधारण नवव्या शतकात (इ.स. ८५०) गंधक (सल्फर), कोळशाची पूड (चारकोल) आणि पोटॅशियम नायट्रेट (सॉल्टपीटर) ही रसायने एकत्र केली. त्यांच्या ज्वलनातून अमरत्वाचे औषध सापडेल असा त्यांचा होरा होता. पण झाले भलतेच. या मिश्रणाचा स्फोट झाला. काळ्या रंगाची ही भुकटी ब्लॅक पावडर किंवा गनपावडर म्हणून ओळखली जाऊ लागली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चीनमधील साँग घराण्याच्या शासकांच्या काळात ११ व्या शतकात (१०४० ते १०४४) झेंग गाँगलियांग याने ‘वुजिंग झोंग्याओ’ (कम्प्लिट इसेन्शिअल्स फ्रॉम द मिलिटरी क्लासिक्स) नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात सर्वप्रथम गनपावडरचा फॉम्र्युला लिहिण्यात आला. इंग्लिश तत्ववेत्ता रोजर बेकनच्या १३ व्या शतकातील लिखाणातून तो युरोपीय लोकांना माहीत झाला. त्यानुसार ७५ टक्के पोटॅशियम नायट्रेट (सॉल्टपीटर), १५ टक्के कोळशाची पूड (चारकोल) आणि १० टक्के गंधक (सल्फर) असे मिश्रण केले जाते. त्यातील सल्फर आणि चारकोल इंधनाचे काम करतात तर सॉल्टपीटर ऑक्सिडायझरची भूमिका निभावते. गनपावडर हे ‘लो एक्स्प्लोझिव्ह’ प्रकारचे स्फोटक आहे. म्हणजे पेटवल्यानंतर ते ध्वनीच्या वेगापेक्षा कमी (सबसॉनिक) वेगाने जळून जाते. इंग्रजीत त्याला ‘डिफ्लॅग्रेशन’ म्हणतात. त्याउलट जी ‘हाय एक्स्प्लोझिव्ह’ असतात त्यांचा पेटवल्यानंतर स्फोट (डिटोनेशन) होतो आणि स्वनातीत म्हणजे ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेगाच्या (सुपरसॉनिक) लहरी किंवा कंपने निर्माण होतात आणि त्यांनी जास्त नुकसान होते.

सुरुवातीला गनपावडरचा वापर चीनमध्ये शोभेच्या दारुकामासाठी आणि फटाक्यांसाठी केला गेला. मात्र इस. १००० च्या आसपास तिचा वापर विध्वंसक कामांसाठी होऊ लागला. त्यातून सुरुवातीचे प्राथमिक अवस्थेतले अग्निबाण, तोफा, बंदुका आणि बॉम्ब बनवले गेले. चीनच्या साँग घराण्याच्या शासकांनी ११३२ साली डिआनच्या वेढय़ात जिन लोकांविरुद्ध सर्वप्रथम गनपावडरचा लष्करी वापर केला. मध्य आशियातील मंगोल आणि पश्चिम आशियातील मुस्लीम शासकांच्या माध्यमातून त्यांचा जपान, भारत आणि युरोपमध्ये प्रसार झाला. भारतात  गनपावडरवर आधारित शस्त्रांचा वापर बेळगाव, दीव, तंजावर, ढाका, विजापूर, मुर्शिदाबाद आणि कालिकतच्या लढायांमध्ये झाला होता.

या एका स्फोटक रसायनाने जगाचा इतिहास बदलला. जुने युद्धतंत्र मोडीत निघाले. युरोपीय देशांनी गनपावडरवर आधारित शस्त्रांमध्ये बरीच सुधारणा केली. त्यातून त्यांना जगाच्या अन्य प्रदेशांतील लोकांवर आणि त्यांच्या जुन्या शस्त्रांवर कडी करता आली. यातूनच युरोपीय साम्राज्यवाद आणि वसाहतवाद पसरण्यास मदत झाली. मृत्यूला हुलकावणी देण्याच्या हेतूने शोधलेल्या रसायनाने मानवाला मृत्यूच्या अधिक जवळ नेले होते.

sachin.diwan@expressindia.com