रणगाड्यांच्या इतिहासाचा मागोवा घेताना युद्धात वापरले जाणारे रथ रणगाड्यांचे आद्य रूप मानता येईल. पंधराव्या शतकात लिओनार्दो द विन्सी याने रणगाडय़ाची संकल्पना मांडली होती. पंधराव्या शतकात झेक सेनानी जान झिस्का याने चिलखती गाड्यांमध्ये तोफा बसवून गाडीच्या बाजूला असलेल्या छिद्रांमधून तोफा डागण्याची व्यवस्था केली. अशा चिलखती गाडय़ा वापरून त्याने अनेक युद्धे जिंकली. पण त्याच्या मृत्यूनंतर विसाव्या शतकापर्यंत ही संकल्पना मागे पडली.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला वाहन उद्योगात अनेक प्रयोग होत होते आणि त्यातून शेतीसाठी धातूचे अखंड ट्रॅक्स असलेल्या ट्रॅक्टरचा उदय झाला होता. ही यंत्रणा ‘कॅटरपिलर’ नावाने ओळखली जायची. तिचा वापर करून वाहनाला तोफ जोडून रणगाडय़ासारखे प्राथमिक शस्त्र बनवण्याची कल्पना फ्रेंच तोफखान्यातील कॅप्टन लेवावासूर याने १९०३ मध्ये मांडली होती. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील बेंजामिन होल्ट याने १९०३ ते १९०७ या काळात कॅटरपिलर ट्रॅक्टर विकसित केला होता. पहिल्या महायुद्धाच्या (१९१४ ते १९१८) सुरुवातीला लष्करी सेनानींना या यंत्रात रस वाटू लागला. त्यांनी खाचखळग्यांनी आणि चिखलाने भरलेल्या भूभागात अवजड तोफा ओढून नेण्यासाठी आणि साधनसामग्रीची वाहतूक करण्यासाठी होल्टच्या कॅटरपिलर ट्रॅक्टरचा वापर केला. त्यातून सुरुवातीच्या रणगाड्यांच्या विकासाचा मार्ग प्रशस्त झाला. ब्रिटिशांच्या रॉयल आर्मी सव्र्हिस कोअरने १९१६ पर्यंत अशा १००० होल्ट कॅटरपिलर ट्रॅक्टरचा वापर युद्धभूमीवर केला होता.
फ्रान्सनेही अशाच प्रकारे होल्टच्या कॅटरपिलर ट्रॅक्टरचा वापर केला. याच दरम्यान फ्रान्समध्ये जीन बॅप्टिस्ट एस्टिएन, एम. फ्रॉट आदींनी अशाच प्रकारचे प्रयोग चालवले होते. त्यातून फ्रॉॅट-लॅफली लँँडशिप, ऑब्रियट-गॅबेट फोट्र्रेस, श्नायडर सीए-१ अशा प्राथमिक स्वरूपाच्या रणगाड्यांची प्रारूपे (प्रोटोटाइप्स) साकारली. ब्रिटनमध्येही त्याच धर्तीवर प्रयत्न होत होते. मे १९१५ मध्ये खंदक आणि काटेरी तारांची कुंपणे पार करू शकेल असे ट्रायटन ट्रेंच क्रॉसर यंत्र तयार झाले.
याच काळात विंस्टन चर्चिल यांनी ब्रिटनमध्ये रणगाडा संशोधनाला चालना दिली. ३ डिसेंबर १९१५ रोजी ब्रिटनमध्ये ‘लिटल विली’ नावाचा पहिला रणगाडा तयार झाला. आजच्या आधुनिक रणगाड्यांचे हेच मूळ स्वरूप होते. मात्र त्याची खंदक पार करण्याची क्षमता पुरेशी नव्हती. त्याच्या संरचनेत बदल करून वॉल्टर गॉर्डन विल्स यांनी साधारण अंडाकार रचना बनवली. त्याचे नाव ‘हिज मॅजेस्टीज लँडशिप सेंटिपेड’ किंवा ‘मदर’ असे होते. ‘बिग विली’ किंवा ‘मार्क १’ नावाने ओळखला गेलेला आणि प्रत्यक्ष युद्धात वापरला गेलेला हाच तो पहिला रणगाडा.
जर्मनी आणि रशियातही याच काळात रणगाडय़ावर संशोधन सुरू होते. जर्मनीत १९१८ साली ‘ए ७ व्ही’ या रणगाडय़ाची निर्मिती केली गेली. पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस त्यापैकी काही रणगाडे युद्धात वापरण्यात आले.
रशियात वासिली मेंडेलीव या इंजिनिअरने १९११ ते १९१५ या काळात रणगाडय़ाचे बरेच सुधारित प्रारूप बनवले. अलेक्झांद्र पोरोखोवशिकोव याने रचना केलेला ‘वेझ्देखोद’ आणि लेबेदेंको याने रचना केलेला ‘झार टँक’ हे रशियाचे सुरुवातीचे रणगाड्यांचे प्रयोग होते. रणगाडय़ावर होत असलेले संशोधन गुप्त राखण्यासाठी ‘टँक’ हे नाव वापरले गेले आणि रणगाडय़ाला ते कायमचे चिकटले.
sachin.diwan@ expressindia.com