सचिन दिवाण sachin.diwan@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगातील पहिला अणुहल्ला ६ ऑगस्ट १९४५ रोजी जपानच्या हिरोशिमा शहरावर झाला असला तरी त्यामागे अनेक वर्षांचे संशोधन आणि औद्योगिक प्रगती होती. अणूवर जगात अनेक ठिकाणचे शास्त्रज्ञ संशोधन करत होते. अल्बर्ट आइनस्टाइन यांनी १९०५ साली त्यांच्या सापेक्षवादाच्या विशेष सिद्धांतात (थिअरी ऑफ स्पेशल रिलेटिव्हिटी) असे म्हटले की, वस्तुमान आणि ऊर्जा या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून पदार्थाचे वस्तुमान आणि ऊर्जा यांच्यात परस्पर रूपांतर होत असते. त्यातून त्यांचे E= mc2  हे प्रसिद्ध  समीकरण तयार झाले.

त्याच दरम्यान नील्स बोहर या शास्त्रज्ञाने अणूचे अंतरंग शोधून काढले. प्रोटॉन असलेल्या केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन फिरत असतात असे सांगितले. जेम्स चॅडविक यांनी १९३२ मध्ये न्यूट्रॉनचा शोध लावला. अणूच्या विखंडनातून प्रचंड ऊर्जा बाहेर पडू शकते असे तोवर माहिती झाले होते. त्यासाठी इटलीतील शास्त्रज्ञ एन्रिको फर्मी यांनी युरोनियमच्या केंद्रकावर न्यूट्रॉनचा मारा करून पाहिला. याच पद्धतीने जर्मन शास्त्रज्ञ ऑटो हान आणि फ्रिट्झ स्ट्रासमन यांनी १९३९ साली अणूचे विखंडन करण्यात यश मिळवले.

या काळापर्यंत युरोपमध्ये दुसऱ्या महायुद्धाचे ढग जमू लागले होते. जर्मनीतही अणूवर संशोधन सुरू होते आणि हान व स्ट्रासमनचे संशोधन वापरून अणुबॉम्ब बनवता येईल असा शास्त्रज्ञांचा कयास होता. या शास्त्रज्ञांमध्ये प्रामुख्याने ज्यूंचा भरणा होता. अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या नाझी राजवटीला कंटाळून त्यातील अनेक आघाडीचे ज्यू शास्त्रज्ञ अमेरिकेत आश्रयाला निघून गेले. त्यात आइनस्टाइन, फर्मी, लिओ झिलार्ड आदींचा समावेश होता. युरेनियम-२३५ या समस्थानिकाच्या केंद्रकावर मंदगती न्यूट्रॉनचा मारा केला की त्याचे विखंडन होते आणि त्यातून आणखी दोन न्यूट्रॉन बाहेर पडतात. त्याने पुढे विखंडन होत राहून श्रंखला अभिक्रिया सुरू होते आणि अणुस्फोट घडवता येतो हे लक्षात आले होते. या स्पर्धेत जर्मनी पुढे जाऊ नये म्हणून आइनस्टाइनच्या नेतृत्वाखाली अनेक शास्त्रज्ञांनी अमेरिकी अध्यक्ष फ्रँकलीन रूझवेल्ट यांना पत्र लिहून अणुबॉम्ब बनवण्यासाठी राजी केले.

त्यातून अमेरिकी लष्कराचे मेजर जनरल लेस्ली ग्रोव्ह्ज आणि शास्त्रज्ञ जे. रॉबर्ट्स ऑपनहायमर यांच्या नेतृत्वाखाली १९४० च्या दशकात मॅनहटन प्रकल्पाचा जन्म झाला. अमेरिकी अणुबॉम्ब बनवण्याच्या प्रकल्पाचे हे सांकेतिक नाव होते. त्या अंतर्गत ओक रिज, लॉस अलामॉस, शिकागो, हॅनफर्ड आदी ठिकाणी विविध प्रयोगशाळा आणि अणुभट्टी आदी सुविधा उभारण्यात आल्या. बघता बघता त्याचा व्याप इतका वाढला की १९४५ पर्यंत अमेरिकेने त्यावर २ अब्ज डॉलर (आजच्या हिशेबाने २२ अब्जहून अधिक डॉलर) खर्च केले. त्या काळात अमेरिकेतील वीज उत्पादनापैकी १० टक्के वीज या कामी खर्च होत होती. बॉम्बसाठी युरेनियम-२३८ मधून युरेनियम-२३५ हे समस्थानिक वेगळे करून शुद्ध करण्याचे आव्हान होते. त्यासाठी अवाढव्य यंत्रणा उभारण्यात आली. त्यासह प्लुटोनियम-२३९ च्या भंजनातूनही अणुबॉम्ब बनवता येतो हे लक्षात आले. अखेर १९४५ मध्ये बॉम्बसाठी पुरेसे शुद्ध युरेनियम गोळा झाले. बॉम्बचे डिझाइन तयार होऊन त्याची निर्मिती झाली. १६ जुलै १९४५ रोजी न्यू मेक्सिकोतील अलामोगोरडो वाळवंटात ‘ट्रिनिटी’ या सांकेतिक नावाखाली ‘गॅजेट’ या पहिल्या अणुबॉम्बची यशस्वी चाचणी पार पडली.