व्हिएतनाम युद्ध खऱ्या अर्थाने हेलिकॉप्टरचे युद्ध होते. या युद्धापर्यंत लढाऊ हेलिकॉप्टरचा विकास झाला होता आणि त्यांचा युद्धभूमीवर सर्रास वापर होत होता. हे युद्ध अमेरिकेच्या बेल यूएच-१ इरोक्वाय ‘ह्य़ुई’, बेल एएच-१ कोब्रा, ह्य़ूज ओएच-६ कायूज आदी हेलिकॉप्टरनी गाजवले.

दुसऱ्या महायुद्धानंतर फ्रेंच इंडोचायनाची उत्तर व्हिएतनाम, दक्षिण व्हिएतनाम, कंबोडिया आणि लाओस या चार देशांत विभागणी होऊन त्यांना स्वातंत्र्य मिळाले. मात्र साम्यवादी नेते हो-ची-मिन्ह यांच्या नेतृत्वाखालील उत्तर व्हिएतनामला फाळणी मान्य नव्हती आणि त्यांनी उत्तर व दक्षिण व्हिएतनामच्या एकीकरणासाठी संघर्ष पुकारला. त्यात उत्तर व्हिएतनामच्या बाजूने सोव्हिएत युनियन, तर दक्षिण व्हिएतनामच्या बाजूने अमेरिका युद्धात उतरली. अमेरिकेने १९६२ पासून व्हिएतनाममध्ये हळूहळू हेलिकॉप्टर तैनात करण्यास सुरुवात केली आणि अखेर १९७५ साली सायगावमधून माघार घेईपर्यंत व्हिएतनाममध्ये अमेरिकेची एकूण १२,००० हेलिकॉप्टर्स तैनात होती. त्यात १९७० साली अमेरिकी हेलिकॉप्टर्सची संख्या सर्वाधिक म्हणजे ४००० इतकी होती. त्यात २६०० हेलिकॉप्टर्स बेल यूएच-१ इरोक्वाय ‘ह्य़ुई’ या प्रकारची होती. अमेरिकेने व्हिएतनाममध्ये ५००० हून अधिक हेलिकॉप्टर्स, २,१९७ हेलिकॉप्टर्स वैमानिक आणि २,७१७ कर्मचारी गमावले.

‘व्हिएतनाम हेलिकॉप्टर पायलट्स असोसिएशन’च्या आकडेवारीनुसार त्या युद्धात बेल यूएच-१ इरोक्वाय या हेलिकॉप्टरनी एकूण ७५,३१,९५५ तास, तर बेल एएच-१ कोब्रा हेलिकॉप्टरनी ११,१०,७१६ तास उड्डाण केले. यामध्ये ही हेलिकॉप्टर्स क्वचितच जमिनीपासून ४५८ मीटर (१५०० फूट) पेक्षा अधिक उंचीवर उडत होती. म्हणजेच अधिकांश वेळ त्यांनी कमी उंचीवरून शत्रूच्या मशीनगन, तोफा आणि क्षेपणास्त्रांचा मारा सहन करत उड्डाण केले. बेल यूएच-१ हेलिकॉप्टरनी ५ लाख मोहिमा राबवून ९ लाखांहून अधिक जखमी सैनिकांना रुग्णालयात पोहोचवले. जखमींना युद्धभूमीवरून रुग्णालयात पोहोचवण्याचा वेळ एक तासाहून कमी असल्याने अनेकांचे प्राण वाचले. ही हेलिकॉप्टर्स नसती तर अमेरिकेला कंबोडिया आणि लाओसबरोबरील १२८७ किमी लांब सीमेच्या रक्षणासाठी तिप्पट सैन्य तैनात करावे लागले असते.

बेल यूएच-१ हे प्रामुख्याने ‘युटिलिटी हेलिकॉप्टर’ होते. त्याचा सैन्य आणि रसदसामग्रीच्या वाहतुकीसाठी वापर झाला. सैनिकांनी त्यांना ‘ह्य़ुई’ असे टोपणनाव दिले होते. १९५२ नंतर त्यांची निर्मिती प्रक्रिया सुरू झाली आणि व्हिएतनाममध्ये ७००० हून अधिक ‘ह्य़ुई’ तैनात केली गेली. ते ताशी २०४ किमीच्या वेगाने ४ स्ट्रेचर किंवा ८ सैनिकांना ३८३ किमी अंतरावर वाहून नेऊ शकत असे. त्यांच्यावर मशीनगन, रॉकेट्स आणि क्षेपणास्त्रे बसवून लढाऊ भूमिकेतही वापर केला गेला.

sachin.diwan@ expressindia.com